मुंबई (प्रतिनिधी) – शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढविण्यात आली असून आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील. यावर्षांपासून ‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश करण्यात आला असून काही पुरस्कारांचे निकष बदलण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
राज्य शासनामार्फत सन १९६७ पासून कृषिक्षेत्रातील विविध पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, जिजामाता कृषिभुषण पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार, सेंद्रिय शेती पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार व शेतिनिष्ठ या पुरस्कारांचा समावेश आहे.
कृषिमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांसाठीचे पात्रतेचे निकष बदलण्याबरोबरच त्यांची संख्या वाढविण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये तरुण शेतकऱ्यांना वाव देणेसाठी नव्याने ‘युवा शेतकरी पुरस्कार’ व उत्तम काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी ‘उत्कृष्ट कृषि संशोधक’ पुरस्काराचा समावेश केला आहे. पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल करून निवड आणि शिफारशी बाबतच्या कार्यपध्दतीत सुधारणा आणि एकसुत्रीपणा येण्यासाठी बदल करण्यात आल्याचे कृषीमंमत्र्यांनी सांगितले.
यापूर्वी कृषी विभागामार्फत एकूण ६३ पुरस्कार देण्यात येत होते. त्यात काही पुरस्कारांची संख्या वाढवून नव्याने ३६ पुरस्कारांची वाढ करण्यात आली असून आता ९९ पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागातून व सर्व जिल्हयातुन शेतकरी निवडले जातील याची खबरदारी घेण्यात आली आहे.
एकूण पुरस्कार संख्या
पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार १,
जिजामाता कृषिभुषण पुरस्कार- ८,
वसंतराव नाईक कृषिभुषण – ८
सेंद्रिय शेती पुरस्कार ८,
उद्यान पंडीत पुरस्कार ८,
शेती मित्र पुरस्कार ८
शेतीनिष्ठ पुरस्कारा ४०
सेवारत्न पुरस्कार ९
युवा शेतकरी पुरस्कार ८
उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार १