प्रतिनिधी/मुंबई,
उत्तर भारतात दाटून आलेल्या अंधाराने लहरी हवामानाचा अंदाज आला होता. त्या बदललेल्या हवेची झळ महाराष्ट्रालाही जाणवणार अशी चिन्हं आहेत. वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे राज्याच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात विदर्भात विजांसह वादळी पाऊस होऊ शकतो. पश्चिम विदर्भावर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून (१२ मार्च) पुढे दोन-तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या पावसाबरोबर वादळी वारे आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो.
उन्हाची तीव्रता अजून वाढणार
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासूनच वातावरण तापू लागलं होतं. मार्चमध्ये तर पहिल्या आठवड्यातच पारा चाळिशीला टेकला आणि अचानक थंडी गायब होऊन झळा सुरू झाल्या. या अशा ढगाळ वातावरणामुळे थोडी काहिली कमी होण्याची शक्यता असली, तरी हा दिलासा पुरेसा नाही. उन्हाचा तडाखाही वाढण्याची शक्यता आहे. राज्यात तापमानात वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली
या ठिकाणी पावसाची शक्यता
प्रामुख्याने अकोला जिल्हा आणि पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल. पश्चिम विदर्भावर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून पुढे दोन-तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या पावसाबरोबर वादळी वारे आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो. त्यामुळे आकाशात ढगांची गर्दी दिसली तर शक्यतो उघड्या शेतावर कामाला जायचं टाळा, असा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातही सायंकाळनंतर ढगांची गर्दी होऊ शकते. रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र, पुणे, नगर या भागातही वातावरण ढगाळ राहू शकतं.