श्वसनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी आपली फुफ्फुसं निरोगी असणं आवश्यक आहे. एकीकडे करोनापासून बचाव म्हणून मास्क घातल्यामुळे अनेकांना श्वास कोंडल्यासारखं वाटतं तर दुसरीकडे प्रदूषणामुळे अनेकांना श्वास घेताना त्रास होतो. फुफ्फुसांचं आरोग्य जपायचं असेल तर कशा प्रकारे काळजी घेणं आवश्यक आहे, याची माहिती आजच्या लेखातून घेऊ या.
मास्क एक, फायदे अनेक
- मास्क घातल्याने करोनाच्या विषाणूंपासून बचाव होण्याची शक्यता वाढतेच, शिवाय हवेतील प्रदूषण आणि खास करून धुलिकणांपासूनसुद्धा आपलं संरक्षण होतं.
- मास्क तीन स्तरांचा असेल तर उत्तम. मास्क वापरताना तुमचं नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलं जाणं आवश्यक आहे.
- कापडाचे ३-४ मास्क तयार करून ते आळीपाळीने वापरू शकता.
- मास्क पारदर्शी नसावा. अशा मास्कमुळे शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांपासून आपला बचाव होतो. पण, हवेतील प्रदूषणांपासून अशा प्रकारचे मास्क आपलं संरक्षण करू शकत नाहीत.
- रुमाल किंवा ओढणी वापरून करोना पसरवणाऱ्या थेंबांपासून आपला बचाव होऊ शकतो. पण, प्रदूषणापासून आपला बचाव करण्यासाठी त्यांचा फारसा उपयोग होणार नाही.
घरातील हवा ठेवा स्वच्छ
घराच्या खिडक्या बंद ठेवा. घरामध्ये मेणबत्ती, लाकूड, धूप किंवा उतबत्ती जाळणं टाळा. वेळोवेळी ओल्या फडक्याचा वापर करून घर स्वच्छ करा. प्रदूषण जास्त असल्यास दिवसातून तीन ते चार वेळा घर ओल्या फडक्याने पुसा. जेणेकरून, धोकादायक धुलिकणांपासून घराचं संरक्षण होईल. बाहेर जर खूप जास्त प्रदूषण असेल तर घराचे दरवाजे, खिडक्या शक्य तेव्हा बंद ठेवा.
या बाबींची विशेष काळजी घ्या
- एसीचा वापर करणं टाळावं. पंख्याचा वापरसुद्धा आवश्यकतेनुसारच करावा.
- अनेकजण झोपताना खिडक्या उघड्या ठेवतात. त्यामुळे बाहेरची थंड हवा घरात येऊन खोलीचं तापमान कमी होऊ शकतं.
- सकाळी उठल्यावर कोमट पाण्यानं गुळण्या करा. त्यानंतर मोहरीच्या तेलानं गुळण्या करा. त्यामुळे हिरड्या मजबूत होतात. तसंच संसर्गापासून बचाव होण्यास मदत होते.
- पाणी आणि तेलाने गुळण्या केल्यावर पाच ते दहा मिनिटांनी १०-१५ मिनिटांपर्यंत अनुलोम-विलोम आणि कपालभाती करू शकता.
बाहेरून आल्यावर…
जर बाहेरून आल्यावर कोणाला घशामध्ये खवखव जाणवत असेल किंवा थोडा खोकला येत असेल तर एक ग्लास दुधामध्ये पाव चमचा हळद, दोन ते तीन तुळशीची पानं, २-३ लवंग, अर्धा इंच दालचिनी, २-३ काळ्या मिऱ्या टाकून उकळून घ्या. मधुमेह नसल्यास साखर किंवा गूळ सुद्धा वापरू शकता. दहा मिनिटं उकळल्यावर हा काढा गरम असतानाच प्या.
-
बाहेर जाताना
- सध्या थंडी कमी जाणवत असली तरीही बाहेर जाताना तुमचं शरीर पूर्ण झाकलं जाईल असे कपडे घाला.
- बाहेर जाताना नाकपुड्यांना मोहरी किंवा तिळाचं तेल लावा.
शरीरामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता असल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये सकाळी ९ ते १२ या वेळेत ३०-३५ मिनिटांसाठी आणि उन्हाळ्यामध्ये सकाळी ८ ते ११ या वेळेत ३० ते ३५ मिनिटांसाठी सूर्यप्रकाशात उभं राहणं फायदेशीर ठरेल.
– योग आणि व्यायाम- दररोज सकाळी २० ते २५ मिनिटं योग आणि व्यायाम करणं फायदेशीर ठरतं.
संकलन- राहुल पोखरकर, ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी & Maharashtra Times