पुणे : हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4 हजार 210 गावे तसेच विदर्भामधील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशी एकूण 5 हजार 142 गावांमध्ये सहा वर्ष कालावधीत जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने सुमारे रुपये चारशे कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी एकूण 600 कोटी रुपये अतिरिक्त निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झाला आहे.
असा झाला शासन निर्णय
सन 2021-22 या वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना रुपये सहाशे कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या रुपये सहाशे कोटी निधी चे कोषागारातून आहरण व वितरण या करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
या संकेतस्थळावर मिळेल सविस्तर माहिती
प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांनी 33- अर्थसहाय्य उद्दिष्ट शीर्षखाली खर्च झालेल्या रकमांचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करावे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.