हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपळगाव कुटे येथील सोनाजी योगाजी आहेर यांनी एका होलिस्टीन गायीपासून सुरुवात केलेला दूध व्यवसाय त्यांच्या सातत्य आणि कष्टाच्या जोरावर आता २६ होलिस्टीन गायींपर्यंत पोहचला आहे. मागील अकरा वर्षापासून त्यांनी या व्यवसायात सातत्य ठेवल्याने त्यांना दूध विक्रीतून महिन्याकाठी एक लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळत आहे. त्यांची दोन्ही मुलंही याच दुध व्यवसायात स्थिरावले आहेत.
केवळ साडेतीन एकर जमीन असून देखील शेतीला पूरक दूध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आजवर लक्षावधी रुपयांचा नफा कमावल्याने या परिसरातील शेतकरी त्यांचा आदर्श घेवू लागले आहेत. –
पिंपळगाव कुटे हे गाव परभणी वसमत रोडवरील झिरोफाटा येथून पश्चिम दिशेला ५ किमी तर याच रस्त्यावरील भारती कॅम्प पासून साडेतीन किलोमीटरवर आहे. येथील शिवाराची जमीन काळी कसदार सुपीक आहे. येथील शेतकरी ऊस, हळद, गहू, रब्बी ज्वारी, हरभरा ही पिके घेत असतात. सिंचनासाठी बोअर, विहीरींची सोय असून त्यास चांगले पाणी असल्यामुळे चहूकडे बारमाही बागायती पिके बहरलेली दिसतात. येथीलच अल्पभूधारक शेतकरी सोनाजी आहेर व त्यांची मुले रामेश्वर व गजानन या तिघांनी मात्र ईतर बागायती पिके न घेता दूध हा शेतीपूरक व्यवसाय सुरु करुन यात मोठी प्रगती केली आहे. त्यांना पिंपळगाव शिवारातील गट क्रमांक ३१६,३१७ मध्ये १ हेक्टर ४० आर जमीन आहे. शेतीत बोअरवेल आहे. त्यास भरपूर पाणी असते. जमीन काळी कसदार आहे. या जमीनीत वडील सोनाजी हे पूर्वी पारंपरिक पद्धतीने पिके घेत होते. पण त्यातून खर्च जाता पैसे उरत नव्हते. त्यामुळे त्यांनी २००९ ला एक होलिस्टिन जातीची दूभती गाय खरेदी करुन दूध व्यवसायास सुरुवात केली आणि त्यात चांगला फायदा दिसू लागल्याने दूधाची रुची निर्माण होवून दरवर्षी गायींची संख्या वाढवून दूध धंद्यात विस्तार केला.
एका गायीपासून २६ गायीपर्यंत मजल
सोनाजी आहेर यांनी अगोदर दूध व्यवसाय करण्यासाठी दोन म्हशी आणल्या होत्या त्यावेळी गावातच सहकारी दूध डेअरीचे संकलन केंद्र होते. तेथे म्हशीच्या दूधाला दर कमी मिळायचा. शिवाय म्हैस संकरित गायीच्या तूलनेत कमी दूध देते. त्यामुळे म्हैशीचा दूध धंदा बंद करुन वर्षे २००९ ला नगरमधील लोणी बाजारातून एक होलिस्टिन गाय विकत आणून दुध व्यवसाय सुरु केला. ही गाय दोन्ही वेळचे मिळून १५ लिटर दूध देत असे. दोन वर्षे एका गायीचे दूध विक्री करुन चांगला नफा मिळत गेल्याने २०११ ला तिन होलिस्टिन (८० टक्के संकरीत) गायी केल्या व त्यापुढे आज अखेर २६ दूधाळ गायी व ७ कालवडी, १४ वासरे आणि एक गिर गाय असे मिळून लहान मोठे ४७ जनावरापर्यंत पशुधन त्यांच्या गोठ्यात आहे.
गोठा निर्मीती
दूधाळ गायी, कालवडी, वासरे, होलिस्टिन वळू या जनावरांच्या संगोपनासाठी त्यांनी एक ३० बाय ८० व एक १५ बाय १०० फूट अकाराचे दोन सर्व सोयीयुक्त अद्ययावत असे लोखंडी एंगल वरती टिन पत्रे या पध्दतीने गोठे बांधले आहेत. तसेच गोठ्या शेजारी स्वतः व गड्यांना राहण्यासाठी पक्क्या खोल्यांचे बांधकाम (फार्म हाऊस) बांधलेय. गोठ्यात चारा खाण्यासाठी लांबीची गव्हाण, गोमूत्र जाण्यासाठी छोटे नाल, पिण्याच्या पाण्याचा हौद, लाईट अशा अन्य सुविधा आहेत. यासाठी त्यांना १४ लाख रुपये खर्च आला.
दुधाळ जनावरांना वावरण्यासाठी मुक्तसंचार गोठा
सकाळ संध्याकाळ दूध काढून झाल्यावर दुभत्या गायींना मुक्तसंचार गोठ्यात सोडले जाते. त्याठिकाणी पडलेले सर्व शेण तेथेच राहू दिले जाते. हे शेण वाळून भुगा होवून मुक्तसंचार गोठा मऊ होतो. यामुळे जनावरांना बसण्यासाठी नरम आसन होते. त्यातील वाळलेले शेण चार महिने अंतराने काढले जाते. हा मुक्तसंचार गोठा १५० बाय ३०० फूट अकाराचा असून त्या भोवती लोखंडी जाळी बसवलेली आहे. सकाळी संध्याकाळी चारा दिल्यांनतर व दूध धारा काढणे वेळी गायींना गोठ्यातील गव्हाणीवर बांधले जाते. त्यानंतर पडलेले शेण आणि ईतर कचरा काढून गोठ्याची स्वच्छता करतात.
बारमाही हिरव्या चाऱ्याची व्यवस्था
सर्व जनावरासह दुभत्या गायींच्या बारमाही हिरव्या चा-याची सोय व्हावी यासाठी २० आर ऊस,एक एकर गजराज गवत, २० आर मेथी घास, एक एकर ज्वारी हा चारा लावगड असतो. चारा पिकांना कोणताही रासायनिक खत न देता शेणखताचा वापर करतात त्यामुळे चारा विषमुक्त असतो. तसेच सुक्या चा-यात हरबरा कोंडा, सोयाबीन गुळी, गव्हाचा भरडा, सरकी पेंड, गोळी पेंड, शिवाय हिरवा पोष्टीक मका , गहू हायड्रोपोनिक्स चारा तयार करुन दिला जातो.
खाद्याचे व्यवस्थापन
गजराज गवत, ऊस, ज्वारी, मेथी घास, कडबा हा चारा कुटी यंत्राणे बारीक करुनच देतात. तसेच सकाळ सायंकाळी सरकी पेंड, गोळी पेंड, भरडा, हायड्रोपोनिक्स मका, गहू चारा दुभत्या गायींच्या गरजेप्रमाणे दिला जातो.
परिसर निरोगी राहण्याकरिता तूलशी लागवड
दूध गोठा, लगतचे फार्म हाऊस परिसर निरोगी राहवे याकरिता मुक्तसंचार गोठ्या लगत लांबणी पट्टा तूळशीची लागवड करण्यात आली आहे. तूलशी वृंदावनाचे महत्त्व आयुर्वेदात आहे. तूळशीमुळे जनावरांना आरोग्य लाभते असा त्यांचा अनुभव आहे.
गोबरगॅसच्या स्लरीचा वापर पिकासाठी
शेतात स्वयंपाकासाठी गोबरगॅसची बांधणी केली आहे. रोज पंधरा माणसांचा स्वयंपाक होईल एवढी उर्जा या गोबरगॅस मधून तयार होते. याकरिता लागणारे शेण वापरुन उरलेल्या शेण स्लरीचा वापर गवत व पिकांना करतात. या शेणस्लरीच्या वापराने सध्या त्यांचे गहू, ऊस, गवत ही पीके जोमदार येवून विषमुक्त चारा तयार होतो. पिक तजेलदार राहते. उत्पादनातही दुपटीने वाढ होते.
दुग्धव्यवसाय सबंधी ईतर शेतक-यांना मार्गदर्शन
सोनाजी आहेर यांचा मोठा मुलगा रामेश्वर यांचे बि.ए.ए.टी.डी. डि फार्मसी शिक्षण होवूनही त्याने कुठे नोकरी न करता आपल्या वडिलोपार्जित दूग्ध व्यवसायात करीयर करण्यास सुरुवात केली. शिक्षणाचा उपयोग शेतीत करुन कोणतेही प्रशिक्षण न घेता अनुभवावरुन दूग्ध व्यवसाया विषयी माहिती अवगत झाली. होलिस्टिन गाय, वळू, वासरे, कालवड, गीर, गाय या दूधाळ जनावरासबंधी त्यांना बरीच माहिती व अनुभव प्राप्त होवू लागल्याने ते दूग्ध व्यवसाय करणाऱ्या ईतर शेतक-यांना वेळोवेळी मोफत मार्गदर्शन करतात. जेणेकरून अनेक शेतकरी या दूध व्यवसायाकडे वळतील असा त्यांचा उद्देश असतो.
खिलारी बैलांचे संगोपन
दुभत्या गायी बरोबरच त्यांना खिलारी बैल संगोपन करण्याचा छंद आहे. या बैल जोडीने ते शेती मशागतीची कामे करतात. तसेच ते खिलारी बैलांचे छोटे वासरे विकत आणून त्याचे संगोपन करुन मोठे खिलारी बैल तयार करुन ईतर शेतक-यांना त्यांची विक्री करतात. यातून संगोपनाचा छंदही पूर्ण होतो आणि फायदा देखील मिळतो.
दूध विक्रीच्या उत्पन्नातून झाली मोठी प्रगती
गत अकरा वर्षांच्या दुग्धव्यवसायातून त्यांना लक्षावधी रुपयाचा नफा मिळाला आहे. या पैशातून शेतीत गोठे व फार्महाऊसची बांधणी केली तसेच गावात सुसज्ज, अद्ययावत सोयीयुक्त असे टुमदार घर बांधले आहे. यासाठी त्यांना ३२ लाख रुपये खर्च आला.
दररोजच्या दूध विक्रीतून मिळणारा नफा
सध्या त्यांच्याकडे दूध देणाऱ्या १४ गायी तर १२ गाभण आहेत. १४ गायीचे दोन वेळचे २५० लिटर दूध उत्पादन होते. या दूधास परभणी येथील जिल्हा सहकारी दूध डेअरीवर प्रती लिटर सरासरी २५ रु दर मिळतो.
त्यांच्याकडे असलेल्या होलिस्टिन दूधाळ गायी पासून दररोज २५० लिटर दूध निघते. त्या दूधाला २५ रुपये सरासरी लिटरला दर मिळतो.रोजच्या दूध विक्रीतून ६२५० रुपये येतात, तर त्यातून २९०० रु खाद्य व कामगार खर्च वजा जाता ३४०० रु दररोज निव्वळ नफा मिळतो. यातून महिन्याकाठी दर कमी अधिकनूसार १००००० (एक लाख रुपये) तर वर्षाला १२ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते आणि काही गायी खरेदी-विक्री तसेच शेण विक्रीतून सुध्दा वेगळा फायदा मिळतो. या दूग्ध व्यवसायासाठी दोन सालगडी नेमण्यात आले आहेत, त्यांच्यासह सौ.पार्वतीबाई सोनाजी आहेर, गजानन सोनाजी आहेर, सौ मुक्ताताई रामेश्वर आहेर, सौ निता गजानन आहेर हे कुटूंबिय देखील मदत करतात.
दुध व्यवसायात शेतकऱ्याचे अर्थकारण सुधारण्याची ताकत
प्रत्येक शेतक-यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूधाळ गायी पाळणे काळाजी गरज आहे. यातून घरी दूध तर मिळतेच, पण दूध विक्रीतून दररोज पैसा मिळतो, शेतीला शेणखत मिळते. पारंपरिक पिकाच्या उत्पन्नातून आर्थिक संकटे दूर होत नाहीत. मात्र दुध व्यवसायात शेतकऱ्याचे अर्थकारण सुधारण्याची ताकत आहे. आमच्या सर्व जनावरांपासून वर्षाकाठी ३० ट्राॅली शेणखत मिळते. यातून भरपूर नफा मिळतो. नव्याने दूध व्यवसाय करणा-या शेतक-यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी शासनाने नेहमी दूग्ध व्यवसाय सबंधी माहिती देण्याच्या कार्यशाळा घेतल्या तर त्याचा फायदा होईल. आम्ही आतापर्यंत एकाही रुपयाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही, की या व्यवसायाकरीता कुठे कर्ज घेतले नाही. हळू-हळू जी प्रगती करत आहोत ते केवळ दूध विक्रीच्या उत्पन्नातूनच. आता या पुढे आमचे १०० दूधाळ गायी वाढवण्याचे उदिष्ट आहे. या उदिष्टपूर्तीसाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न आहे. दूध व्यवसायासाठी पशूवैद्यक डॉ राहूल भुजबळ यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळते. त्यांच्यामुळे आज दूध धद्यात टप्याटप्याने प्रगती करीत आहोत.
रामेश्वर सोनाजी आहेर
पिंपळगाव कुटे, ता वसमत. जि हिंगोली.