पुणे (प्रतिनिधी) – राज्यात गेले काही दिवस धुमाकुळ घालणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. कोकणात आज (ता. १०) तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून, गुना, सतना, अंबिकापूर, परादीप ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्रात असलेली परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) निवळून गेलेली आहे. तर अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १०) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा “येलो अलर्ट” हवामान विभागाने दिला आहे.
पाऊस रविवारपासून पुन्हा वाढणार
मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत (ता.११) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. मध्य भारताकडे सरकताना ही प्रणाली तीव्र होणार असून, त्यामुळे रविवारपासून (ता.१२) पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.
(सौजन्य : हवामान विभाग)