प्रतिनिधी/अकोला
कोणत्याही व्यवसायात चढउतार येतात कठीण प्रसंग येतात तसेच कुक्कुट पालन व्यवसायातही येतात. पण कठिण प्रसंगी जे हिमत सोडत नाहीत असेच कुक्कुट पालक यशस्वी होतात असे प्रतिपादन विदर्भातील यशस्वी कुक्कुट उद्योजक व अमृता हैचरिजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शरद भारसाकळे यांनी केले. ते शेतकरी, पशुपालक, बेरोजगार, इत्यादी घटकांपर्यंत कुक्कुटपालन व्यवसायातील अद्यावत ज्ञान प्रसारित करण्याकरिता कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला मार्फत दिनांक १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर यादरम्यान आयोजित राज्यस्तरीय पाच दिवसीय ऑनलाईन “व्यावसायिक कुक्कुट पालन प्रशिक्षण” कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा डॉ अनिल भिकाने हे होते. याप्रसंगी डॉ.भिकाने यांनी प्रशिक्षणार्थ्याना मार्गदर्शन करतांना कोरोना मुळे भारतीय बाजारपेठेत मांस व अंडी यांची भरपूर मागणी वाढली असून कुक्कुटपालन व्यवसायात स्वयंरोजगारनिर्मितीची चांगली संधी असल्याचे सांगितले. ऑनलाईन माध्यमातून सतत पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात संस्थेतील तज्ज्ञ प्राध्यापकांनी कुक्कुटपालनातील विविध घटकांवर प्रशिक्षार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन व शंकां-निरसन केले. तसेच या कार्यक्रमात अमरावती येथील दिवसाकाठी नव्वद हजार अंडी उत्पादन घेणारे यशस्वी कुक्कुटपालक श्री. रवींद्र मेटकर यांनीही समारोप प्रसंगी प्रशिक्षार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. या ऑनलाईन प्रशिक्षणात महाराष्ट्रभरातून ७६ स्त्री पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी उत्सफुर्त सहभाग नोदंविला. सदर प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजनाकरिता डॉ.सतीश मनवर, विभाग प्रमुख, कुक्कुटपालन शास्त्र विभाग आणि प्रशिक्षण समन्वयक डॉ. मंगेश वडे, सह-समन्वयक डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. दिलिप बदुकले यांनी विशेष प्रयत्न केले.
















