प्रतिनिधी / पुणे
मार्च अखेर राज्यातून अवकाळी पावसाने पाय काढता घेताच कोकण, गोवा आणि विदर्भात उष्णतेची लाट आली. वाढती उष्णता डोकेदुखी ठरली आहे. यात अवकाळी पावसाच्या इशाऱ्याने अजून चिंता वाढविली आहे. दरम्यान, या आठवड्याच्या शेवटी राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात शनिवार ते सोमवारी अवकाळी पाऊस होऊ शकतो आणि या काळात तापमानही ४१ अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे. भारत मौसम विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १० एप्रिल १२ एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो.
महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान चाळीस अंशांपुढे गेल्याने जनता हैराण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर-मध्य महाराष्ट्रात देखील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसत आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तापमान ४२ अंशांपर्यंत पोहचले. भारत मौसम विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १० एप्रिल १२ एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो. तर राज्यात काही भागात ८ एप्रिलपासूनच अवकाळी पावसाचे ढग जमणार असल्याने वातावरण काहीसे ढगाळ असेल. याच काळात विदर्भावर मात्र उष्णतेची लाट प्रभावी राहील. ९ एप्रिल रोजी विदर्भात सर्वप्रथम अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. दरम्यान, अवकाळी पाऊस व गारपीट झाली तर रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. सध्या रब्बीतील हरभरा, मका, सुर्यफुल, ज्वारी, दादर, कांदा, भुईमूग या पिकांची काढणीची कामे सुरु आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
याठिकाणी आहे पावसाचा अंदाज
एका खासगी हवामान संकेतस्थळावर दिलेल्या अंदाजानुसार, एप्रिलमध्ये सर्वाधिक उष्णता असेल आणि याच काळात महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपिटीचीही शक्यता असेल. ९ एप्रिलपर्यंत वाढत्या उष्णतेनंतर खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा या पट्टयात १० एप्रिलपासून अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे .