मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चोपण गावात गजानन उर्फ सुरेश खिरटकर या शेतकऱ्याने विष प्रशान करत आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे 9 एकर शेतीतील पीक उद्ध्वस्त झाल्याने हवालदिल झालेल्या खिरटकर यांनी नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. दरम्यान, राज्यात गेल्या महिनाभरात शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.(Maharaashtra Farmer Suicide)
मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यातील ही तेरावी शेतकरी आत्महत्या आहे. गेल्या महिनाभरात विदर्भात जवळजवळ 40 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक 60 हून अधिक शेतकरी आत्महत्या मराठवाडा विभागात नोंदविल्या गेल्या आहेत.
शेतकरी आत्महत्या : सरकारी आकडेवारी
सरकार दरबारी शेतकरी आत्महत्या आकडा तुलनेने कमी दाखविला जात आहे. त्यानुसार, मराठवाडा 54, विदर्भात 36 तर खानदेशातील जळगावात सहा शेतकरी आत्महत्या नोंद आहेत. विदर्भात यवतमाळ 13, बुलडाणा 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 5, चंद्रपूर 3 आणि भंडारा 2 अशी सरकारी दफ्तरात शेतकरी आत्महत्या नोंद आहे.
राज्यात दररोज चार शेतकरी आत्महत्या
गेल्या काही दिवसात राज्यात सरासरी दररोज चार शेतकरी आत्महत्या होत असल्याचे भयाण वास्तव आहे. एकीकडे, कृषी दिनानिमित्ताने एक जुलै रोजी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’चा पहिला संकल्प जाहीर केला. तरीही शेतकरी आत्महत्या सत्र थांबताना दिसत नाही.
कृषी खात्याचा कारभार वाऱ्यावरच
खरीप हंगामाची पेरणी आता संपुष्टात येत आहे. मात्र, गेला दीड महिना राज्याला कृषी मंत्री नाही. राज्यात आधीच अस्मानी संकट आले असताना कृषी खात्याचा कारभार अजूनही वाऱ्यावरच आहे. या काळात औरंगाबाद, बीड, यवतमाळमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या नोंद झाल्या आहेत. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठीच्या बळीराजा चेतना अभियान आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन या दोन्ही योजना लालफितीत अडकून पडल्या आहेत.
तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे
अतिवृष्टीमुळे आज शेतकरी त्रासून गेला आहे. अतिवृष्टी सुरु झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ही सरकारच्यादृष्टीने शरमेची बाब असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे. राज्यात फक्त दोन जणांचे मंत्रीमंडळ अस्तित्वात असून मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन तात्काळ अधिवेशन घ्या, अशी मागणी पत्राद्वारे केली असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.
कोकण वगळता सर्वत्र शेतकरी आत्महत्या
राज्यात गेल्या तीन वर्षांत कोकण विभाग आत्महत्यामुक्त झाला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भासह खानदेशात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. 19 मार्च 1986 रोजी राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या घटना नोंद झाली. त्यानंतर राज्यभरात गेल्या 35 वर्षांत 50 हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
युक्रेन-रशिया युद्धामुळे जग अन्न संकटाच्या फेऱ्यात!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न काही पिकांनी खरोखरच केले दुप्पट!
Comments 1