मुंबई (प्रतिनिधी) – नुकसानीचे पंचनामे झालेल्या राज्यातील दहा लाख शेतकर्यांना विमा कंपन्यांकडून दिवाळीपूर्वीच पैसे अदा करायला हवेत, अशी तंबी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी संबंधित विमा कंपनींच्या प्रतिनिधींसोबत नुकत्याच घेतलेल्या बैठकीत दिली. कृषीमंत्र्यांनी दिलेल्या या तंबीमुळे शेतकर्यांच्या खात्यांवर विमा कंपनींकडून लवकरच रक्कम जमा होणार असल्याने संबंधित शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील 34 लाख 52 हजार शेतकर्यांच्या पूर्वसूचना शासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातील केवळ 10 लाख शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे आतापर्यंत पुर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत राज्यात काम करणार्या सहा कंपन्यांच्या प्रतिनिधींची कृषी मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत नुकतीच बैठक घेेतली. या बैठकीला कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले ऑनलाईन सहभागी झाले होते. कृषी आयुक्त धीरजकुमार, सांख्यिकी विभागप्रमुख विनयकुमार आवटे तसेच राज्यात काम करणार्या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. राज्यात ठिकठिकाणी जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती. ज्यात अनेक शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यातील बहुतांश शेतकर्यांनी पीक विमा काढलेला होता. यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील 84 लाख शेतकरी सहभागी झाले. त्यापैकी 33 लाख 52 हजार शेतकर्यांनी नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांकडे दावा दाखल केला असून त्यातील 10 लाख शेतकर्यांच्या नुकसानीचे अधिकृत पंचनामे पूर्ण झाले आहेत.
सहानुभूतीने पहाण्याचे आवाहन
बैठकीत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पंचनाम्यांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री भुसे यांनी विमा कंपन्यांच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने 973 कोटीचा हप्ता दिला असून केंद्राचे देखील 893 कोटी रूपये जमा झाले आहेत. शेतकर्यांचेही दोन टक्क्यांप्रमाणे काही कोटी रूपये जमा झाले आहेत, असे असताना विमा कंपन्यांकडून किरकोळ कारणे पुढे करीत जुजबी कागदपत्रांची कमतरता दाखवून शेतकर्यांचे दावे नाकारले जातात. वास्तविक, शेतकरी कंपनीला किंवा शासनाला फसवायचे म्हणून दावा दाखल करीत नाहीत तर त्यांचे नुकसान झालेले असल्याने मदतीची अपेक्षा करीत आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांकडे सहानुभूतीने पाहून त्यांचे दावे मंजूर करावेत, असे सांगितले. दिवाळीपूर्वी शेतकर्याच्या बँक खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे. त्यासाठी हवे तर कर्मचारी वाढवावे लागतील तर वाढवा असेही मंत्री भुसे यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना ठणकावून सांगितले. आपत्ती क्षेत्र मोठे असेल तर सामूहिक पंचनामे करून दावा प्रकरणे तयार करावीत अशीही सूचना मंत्री भुसे यांनी या बैठकीत केली. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकर्यांप्रती मंत्री भुसे यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे विमा कंपन्यांकडून शेतकर्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळण्याची आशा आहे.