प्रदर्शनात फक्त पहिल्या दिवशी भाजीपाला बियाणे मिळणार मोफत.. ; नोंदणीधारकांना लकी ड्रॉद्वारे अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी…
जळगाव ः कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या सहा वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्या अॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील शिवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे शुक्रवारी (11 मार्च) उद्घाटन होईल. 11 ते 14 मार्च दरम्यानचे हे कृषी प्रदर्शन मोफत असून शेतकर्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
https://www.facebook.com/248604182011773/posts/1808202696051906/
कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेले नव्हते. त्यामुळे शेतकर्यांना या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता लागून होती. 11 ते 14 मार्च या चार दिवसांच्या कालावधीत होणारे हे कृषी प्रदर्शन खान्देशातील शेतकर्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. तब्बल चार एकरच्या परिसरात 220 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, सर्व शासकीय विभाग, बँक, प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती मिळेल. प्रदर्शनात मजूर टंचाईवर पर्याय ठरेल अशी पिके तसेच कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स असणार आहेत. याशिवाय नामवंत ठिबक कंपनींसह बियाणे, खते, किटकनाशके तसेच निविष्ठा उत्पादकांचे स्टॉल्सही राहणार आहे. सोबतच दूध काढणी यंत्र, विविध आकारातील शेततळ्यांची माहिती तसेच त्रिस्तरीय मत्स्यपालन शेतकर्यांना पाहता येईल. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, र्हायनोमॅट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स प्रायव्हेट लिमीटेड व गोदावरी फाऊंडेशनचे हृदयालय हे सहप्रायोजक आहेत.
ड्रोन ठरणार शेतकर्यांचे आकर्षण…
केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतातील पिकांवर किटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनच्या वापराला परवानगी दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनात प्रत्यक्षात पिकांवर ड्रोनद्वारे कशी फवारणी करता येते, हे शेतकर्यांना पाहता येणार आहे. त्यामुळे ड्रोनने शेती पिकांवर होणारी फवारणी हे या कृषी प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. प्रदर्शन तसेच ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक मोफत आहे.
शेतकर्यांची मोफत आरोग्य तपासणी
प्रदर्शनस्थळी भेट देणार्या शेतकर्यांची गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. यात नाक, कान, घसा, डोळे, हृदयरोग व रक्त तपासणीसह विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येईल. याच बरोबर टुडी इको याची देखील दोन दिवस तपासणी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी भाजीपाला बियाणे मिळणार मोफत
प्रदर्शनात फक्त पहिल्या दिवशी प्रत्येक नोंदणीधारक शेतकर्याला निर्मल सीड्सतर्फे विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे दहा ग्रॅम बियाण्याचे पाकीट मोफत दिले जाणार आहे. शेतकर्यांनी या आधुनिक कृषी यंत्र व अवजारे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.