जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रासह भारतातही यंदा मुसळधार पाऊस आणि अळ्यांच्या हल्ल्याने कापसाचे उत्पादन 30 ते 50 टक्के घटल्याचे मानले जात आहे. जागतिक पातळीवरही गेल्या दहा वर्षानंतर वाढती मागणी आणि घटलेले उत्पन्न असे गणित पुन्हा निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा कापसाच्या भावात जबरदस्त तेजी राहण्याची शक्यता आहे. यंदाचे भाव आताच 7,500 च्या वर पोहोचले आहेत. त्यामुळे 1994 आणि 2011 नंतर यंदा कापसाचे दर सर्वाधिक राहू शकतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..
राज्यात 10 लाख गाठींहून कमी उत्पादन..
कापसाचे भाव यंदा सर्रासपणे किमान खरेदी मूल्यापेक्षा (एमएसपी) म्हणजे 6,025 पेक्षा जास्तच राहू शकतात. हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेशात आताच खासगी खरेदी ही 7,500 पेक्षा अधिक दराने सुरू आहे. यापुढेही याच पातळीच्या वर 7,500 ते 8,000 या दर पट्ट्यातच ही खरेदी सुरू राहू शकते. मागणीचा जोर वाढल्यास किंमती रु. 10,000 चा टप्पाही गाठू शकतात. सध्या सरकार दरबारी होत असलेल्या नोंदीच्या आधारे, कॉटन फेडरेशन आणि सीसीआय या संस्थांनी सुधारित अंदाज जाहीर केले आहेत. त्यानुसार, यंदा राज्यात 75 लाख गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला आहे. यापूर्वी 85 लाख गाठींचे उत्पादन जाहीर केले गेले होते. नव्या अंदाजासाठी सरकारी पंचनाम्यांचा आधार घेतला गेला आहे. मात्र, प्रत्यक्षात नुकसान पंचनाम्यांहून कितीतरी अधिक आहे.
कॉटन फेडरेशन व सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबरपासून सुरू होणार..
कॉटन फेडरेशनचे महाव्यवस्थापक जे. पी. महाजन यांनी मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात कापसाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मागणीबरोबरच देशांतर्गत मागणीही अधिक असल्याने कापसाला यंदा चांगला दर राहील, असे महाजन यांचा अनुमान आहे. त्यांनी सांगितले, की सरकारी कापूस खरेदी केंद्रे नोव्हेंबरमध्ये सुरू केली जाणार आहेत. कॉटन फेडरेशन राज्यभरात 70 तर सीसीआय विदर्भात 40 खरेदी केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी दोन्ही संस्थांनी मिळून राज्यात 15 लाख गाठींची खरेदी केली होती. मात्र, यंदा खासगी खरेदीचा जोर आणि अधिक भाव यामुळे सरकारी खरेदी कमी राहू सकते. गेल्या वर्षी कोरोना प्रतिबंधामुळे सरकारी खरेदी केंद्रांवर गर्दी होती.
कसे असेल कापसाचे गणित..?
*एक क्विंटल कापसापासून 34 किलो रुई व 64 किलो सरकी मिळते.
*15 सेंट एक पाउंड परळीचा भाव ( 1 बेल = 187 किलो रुई )
* 34 किलो रुईचे (187 × 34) = 6363
* 64 किलो सरकीचे 30 रुपये प्रति किलो प्रमाणे 1920 रुपये
* एक क्विंटल कापसाचे 6363 अधिक 1920 म्हणजेच 8250 एकूण
* प्रक्रिया खर्च व्यापारी नफा 1250 रुपये वजा केले तर सात हजार रुपये होतात.
टेक्सटाईल मिल्सकडून जोरदार मागणी
कॉटन एक्स्पर्ट आणि पंजाबमधील भटिंडा येथील विन्सम टेक्सटाईल मिलचे उपाध्यक्ष संजीव दत्ता यांच्या मते, कोरोनानंतर दोन वर्षांनी औद्योगिक उत्पादन आता सुरळीत होत आहे. त्यात भारतासह जगभरातील टेक्सटाईल क्षेत्रातून कापसाला जोरदार मागणी आहे. मोठा टेक्सटाईल उद्योग असलेल्या पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनामबरोबरच चीनमधून मागणीचा जोर अधिक आहे. स्पिंटेक्स युनियनचे कार्यकारी अध्यक्ष सुरेश कुमार गुप्ता यांनी देशांतर्गत कापसाची गरज आणि वाढीव मागणी पाहता, निर्यात तातडीने बंद करावी, अशी मागणी केली आहे. देशांतर्गत आणि परदेशातून मागणीचा जोर आणि घटलेले उत्पादन यामुळे कापसाचे भाव सध्याच्या खरेदीहून आणखी तेजीत येऊ शकतात, असे गुप्ता यांनी सांगितले.
चांगली माहिती दिली धन्यवाद