मुंबई : केंद्र शासनाने शेतकर्यांसाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय कृषी बाजार अथवा किंवा ई-नाम योजनेत महाराष्ट्रातील तब्बल 12 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. याशिवाय २५७ शेती उत्पादक कंपन्यांचा देखील यात समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना देशातील कोणत्याही बाजारपेठेत शेतीमालाचे काय दर आहेत याची माहिती मिळणार आहे. एवढेच नाही तर शेतीमाल कोणत्या बाजारपेठेत विक्री करायचा हे देखील त्यांना ठरविता येईल. दरम्यान, या योजनेत महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असला तरी प्रत्यक्षात काही शेतकरीच या योजनेचा लाभ घेत आहेत.
२१ राज्यातील शेतकरी सहभागी
केंद्र सरकारच्या अहवालानुसार, अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टलमध्ये २५७ शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ), २० हजार ३३९ व्यापारी आणि महाराष्ट्रातील १६ हजार ५०४ कमिशन एजंट सहभागी झाले आहेत. राज्यातील ई-नाम नेटवर्कशी ११८ बाजार समित्या जोडल्या गेल्या असून त्यापैकी ७३ बाजार समित्या ऑनलाइन व्यवहार करीत आहेत. देशातील २१ राज्यांमधील शेतकरी या प्लॅटफॅार्मवर सामील झाले असून व्यवहार करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल २०१६ मध्ये २१ बाजार समित्यांचा यामध्ये सहभाग नोंदवून ‘ई-नाम’ पोर्टंल अॅपचा शुभारंभ केला होता. यामुळे शेतकरी कोणत्याही बाजार समितीमध्ये पिकांची नोंदणी करुन शेतीमाल विक्री करु शकणार आहे. येथे नोंदणी केली म्हणजे त्याच बाजार समितीमध्ये शेती माल विक्री करावा असे नाही. शेतीमाल विक्री करण्यापूर्वी शेतकरी कोणत्याही बाजारपेठेतील दराची माहिती घेऊन माल विक्री करु शकेल. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सुमारे २ हजार ७०० कृषी उत्पादन बाजार समित्या आणि ४ हजार उप बाजार समित्या या पोर्टलवर नोंद आहेत.
शेतकर्यांसाठी वेगवेगळे पर्याय
कृषी उत्पादनांसाठी ‘वन नेशन वन मार्केट’ सारखी यंत्रणा राबवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्याअनुषंगाने योजनेचे काम सुरु आहे. या योजनेंतर्गत शेतकरी आपली कृषी उत्पादने जवळच्या बाजारात ऑनलाइन विकू शकतील. तसेच व्यापारी शेतकऱ्यांना कुठूनही पैसे पाठवू शकतात. या माध्यमातून शेतकरी अनेक बाजारपेठा आणि अधिक खरेदीदारांपर्यंत पोहचणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून १५० कृषी उत्पादनांचा व्यवहार केला जात आहे. स्थापनेच्या वेळी केवळ २५ कृषी उत्पादनांचा व्यवहार झाला होता, ज्यात आता वाढ होत आहे. येणार्या काळात संपूर्ण देशातील शेतकरी यामध्ये जोडण्याचा केंद्र सरकारचा मानस असून त्या दृष्टीने काम सुरु आहे.
‘ई-नाम’ ॲप डाऊनलोड करावे
शेतकऱ्यांनद आपल्या मोबाईलवरील प्ले स्टोअरमध्ये जाऊन केवळ e-NAM असे नाव टाकून अॅप डाऊनलोड करायचे आहे. यानंतर त्यांना ते वापरत असलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला ज्या पिकांची माहिती उपलब्ध करुन घ्यावयाची आहे, ती पिके निवडायची आहेत. त्यानुसार नोंदणी करुन अॅपच्या मुखपृष्ठावर राज्य, जिल्हा हे निवडायचे असून त्यानंतर कृषी बाजार समितीची निवड करता येणार आहे. यामध्ये राज्यातीलच नव्हे तर देशातील बाजार समित्यांमध्ये एखाद्या पिकाचा काय दर सुरु आहे याची देखील माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचे स्वातंत्र असणार आहे. शिवाय शेती मालही देण्यात आलेल्या माहिती भरुन विकता येणार आहे.