मुंबई : आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व सकारात्मक पाऊल उचलले आहे. विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलत असताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे, यात बदल करून किमान 96 तास इतकी मुदत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती दिली आहे.
तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |
बऱ्याचदा अतिवृष्टी सारख्या संकटाच्या काळात वीज पुरवठा खंडित असणे, इंटरनेटची सुविधा बंद असणे, मोबाईल नेटवर्क नसणे अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत या सुविधा पूर्ववत व्हायला काही कालावधी लागतो. त्यामुळे 72 तासांच्या आत नुकसानीची माहिती देण्यास बरेच शेतकरी असमर्थ ठरतात, अशावेळी या कालावधीत आणखी काही तासांची वाढ देण्यात यावी, अशी प्रकारची मागणी दोन्ही सभागृहातील बऱ्याच सदस्यांनी देखील केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत धनंजय मुंडे यांनी हा कालावधी किमान 96 तास केला जावा, याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा विधानपरिषदेत केली.
शेतकऱ्यांना एक हजार रुपये पीक विमा निश्चित मिळेल
खरीप हंगाम 2022 मधील काही पिक विमाधारक शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. यावर धनंजय मुंडे यांनी सविस्तर उत्तर देत खरीप हंगाम 2022 ची संपूर्ण आकडेवारी सभागृहासमोर मांडली. सदर हंगामात एकूण विमाधारक शेतकऱ्यांना 3180 कोटी इतकी पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 3148 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे; तसेच उर्वरित शेतकऱ्यांची विम्याची रक्कम ही 1000 रुपये पेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कमीत कमी एक हजार रुपये मिळावा अशी शासनाची भूमिका आहे. त्यावर उपाय म्हणून यापुढे शेतकऱ्यांना विम्या पोटी मिळणारी रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यात उर्वरित रक्कम राज्य शासन देईल व शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा हा निश्चित मिळेल, अशी घोषणाही धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली.