मुंबई : Biparjoy… शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आतुरतेने वाट पाहत असलेला मान्सून काहीसा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 8 ते 10 जूनपर्यंत कोकण-मुंबईत आणि मग 16 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज असलेल्या मान्सूनला आडवा आलाय तो बिपरजॉय! आपल्या मान्सूनच्या वाटेत आडवा आलेला हा ‘बिपरजॉय’ आहे तरी कोण, ते आम्ही आपणास सांगणार आहोत.
अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलचे लोकार्पण। Agroworld Youtube। 👇
https://youtu.be/S4CCOSr9G9Q/
यंदाचा मान्सून आता लांबतोय तो एका चक्रीवादळामुळे दक्षिणपूर्व अरबी समुद्रात काल हे चक्रीवादळ तयार झाले. त्याच्या प्रभावाखाली पुढील 24 तासांत याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे. स्कायमेटच्या दाव्यानुसार, हे वादळ उत्तर-पूर्व दिशेने ओमान किंवा येमेनकडे रवाना होऊ शकते. प्रारंभिक हालचाल आणि वळण यानुसार ते देशाच्या पश्चिम किनार्यासह उत्तरेकडे सरकू शकते.
याच चक्रीवादळाला बिपरजॉय असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक चक्रीवादळाला एक नाव दिले जाते. त्यानुसार, बिपरजॉय हे बांगलादेशने दिलेले नाव आहे. जागतिक हवामान संघटनेच्या मानकानुसार, हवामान अंदाजातील देशादेशांमधील गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला एक नाव देण्यात येते. बिपरजॉय हा बांगला शब्द आहे. त्याचा अर्थ आहे विध्वंसक किंवा विनाशकारी.
सर्वसाधारणपणे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना प्रादेशिक स्तरावरील नियमांनुसार नावे दिली जातात. हिंदी महासागर क्षेत्रासाठी, 2004 मध्ये चक्रीवादळांचे नाव देण्याच्या सूत्रावर सहमती झाली. या प्रदेशातील आठ देश – बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड – सर्वांनी मिळून काही नावांची एक यादी तयार केली आहे. जेव्हा-जेव्हा समुद्रात एखादे चक्रीवादळ विकसित होते, तेव्हा अनुक्रमाने या यादीतील नाव त्या वादळाला दिले जाते.
चक्रीवादळाची नावे लक्षात ठेवण्यास आणि उच्चारण्यास सोपी अशाच पद्धतीने निवडली जातात. ही नावे आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त नसतात. सर्व देशांच्या संमतीने चक्रीवादळाच्या नावांची यादी तयार होते. ही नावे वेगवेगळ्या भाषांमधून निवडली जातात जेणेकरून वेगवेगळ्या प्रदेशातील लोक त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतील. चक्रीवादळाची नामकरण पद्धती कालांतराने विकसित होत गेली. सुरुवातीच्या वर्षांत, वर्णमालेच्या प्रत्येक अक्षराला नेमून दिलेल्या नावासह, नावे वर्णक्रमानुसार निवडली गेली. तथापि, ही प्रणाली गोंधळात टाकणारी आणि लक्षात ठेवण्यास कठीण असल्याचे आढळले. त्यामुळे मग आधी ठरविलेल्या यादीनुसार नावांची सध्याची प्रणाली सुरू करण्यात आली.
सन 2020 मध्ये 169 नावांसह चक्रीवादळांच्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या मध्ये 13 देशांतील प्रत्येकी 13 नावांचा समावेश होता. यापूर्वी म्यानमार देशाने नाव दिलेले तोक्ते हे विनाशकारी चक्रीवादळ आले होते. येमेनचे मोचा हेही अनेकांना स्मरणात असेल. यापुढील चक्रीवादळ निर्माण झाले तर त्याला भारताने दिलेले “जय” हे नाव असेल. पाकिस्तानचे गुलाब, कतारचे शाहीन, श्रीलंकेचे आसानी, थायलंडचे सितरांग अशी चक्रीवादळाची अनेक अनोखी नावे असतात. भारताच्या नावात आकाश, गती तर बांगलादेशाच्या नावात निसर्गाही होते.