गेल्या 23 वर्षापासून जैन इरिगेशन समूहाने पांढऱ्या कांद्याची करार शेतीची सुरुवात केलेली आहे. आता गेल्या 9 वर्षापासून जवळपास आपण 2 सीजनमध्ये करार शेती करतो, एक खरीप आणि दुसरा रब्बी. त्यात खरीप हा पावसाळी कांद्यात मोडला जातो, त्याची सुरुवात जुलै-ऑगस्ट महिन्यात पेरणीपासून होते. जो रब्बीचा हंगाम आहे, त्यात ऑगस्ट-सप्टेंबरपासून पेरणीला सुरुवात होते.
पूर्वी लोकं म्हणजे शेतकरी पारंपरिक पद्धतीने बियाणे टाकून रोपे तयार करायचे, रोप तयार झाल्यानंतर त्याची पूर्ण लागवड म्हणजे मजुरांचा खूप मोठा प्रश्न असायचा. दिवसेंदिवस शेतकऱ्यांना ऊद्भवणारा हा प्रश्न जैन इरिगेशनने विचारात घेतला. मग एक बैल जोडी चलित अशा एका यंत्राची निर्मिती केली. त्या यंत्राद्वारे आज आपण जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसोबत करार शेती करत आहोत खास करून आपण पांढऱ्या कांद्याचेच करार शेती करतो.
150 दिवसात तयार होणारी कांदा व्हरायटी
या कांद्याचा जो कालावधी आहे, तो कांदा पेरणीपासून असतो. त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता की, पेरणी केलेल्या कांद्याला जास्त दिवस लागतात. हा कांदा जास्त दिवस घेतो यात तथ्य नाही. तर असे काही नाहीये, कारण की आधी 50 ते 60 दिवस जे रोप तयार करायला लागतात, ते शेतकरी मुळात विचारातच घेत नाहीत. तो जर आपण विचार केला, तर 150 दिवसात आमची जी व्हरायटी आहे, ती तयार होते. त्या व्हरायटीच्या रब्बीच्या कांद्याला दीडशे दिवस लागतात, आता ही शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर गोष्ट आहे. याचा जरा आपण विचार करायला हवा.
कांद्यासाठी हमी भाव योजना, शेतकऱ्यांना नुकसान नाही
मुळात ही हमी भाव योजनाच आहे. कांद्याचा हमी भाव या शेतकऱ्यांना दिला जातो. उत्पादन कितीही आले तरी हमीभावाने त्यांना उत्पादनाच्या प्रमाणात पैसा मिळणार आहे. जळगाव आणि धुळे जिल्ह्यात त्या मार्केटला त्या दिवशी जर भाव जास्त असेल तर, शेतकऱ्याला आपण सरासरी भावापेक्षा वाढीव भाव देतो. याच्यात एक फायदा आहे की, मार्केटमध्ये केव्हाही एकदम भाव कमी झाले तर अशा केसमध्ये शेतकरी थोडा नाराज होतो. अपेक्षित उत्पादन जरी येत असले, पण पैशांमध्ये जर मोजायचे म्हटले तर मग नफा कमी होऊन जातो. पर्यायाने मग शेतकरी थोडा त्या पिकापासून लांब जातो.
कांद्याचे भाव वाढले तरी शेतकऱ्यांना लाभ मिळणार
जैन समूहाच्या या कांदा करार शेती योजनेत शेतकऱ्याला भाव वाढले तरी ते भेटणार आहेत आणि भाव कमी झाले तरी हमी भाव भेटणार आहे.
कांद्याबरोबरच टोमॅटो, हळदीचीही करार शेती
आता आपण कांद्याच्या बाबतीत बोलत होतो, पण कंपनी केल्या तीन वर्षापासून टोमॅटो आणि हळद या पिकावरसुद्धा करार शेती करायला लागलेली आहे. टोमॅटोची आपल्याकडे एक उत्तम अशी व्हरायटी आहे, जेणेकरून सरासरी उत्पादन वाढू शकेल. खास करून शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर त्याला मांडवाची गरज नाही. विनामांडव म्हणजे मल्चिंग आणि ड्रिप इरिगेशनवर लागवड करून टोमॅटोचे एकदम विक्रमी उत्पादन शेतकरी सहजपणे घेऊ शकतात.
अधिक उत्पादन कसे काढता येईल, यासाठी जैन इरिगेशनने जैन ग्रामसेवक ही संकल्पना सुरू केली आहे. आदरणीय भंवरलालजी भाऊ यांनी खास करून ही संकल्पना रुजवली. जैन ग्रामसेवक हा मुळात शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याला शेतकी प्रशिक्षण शिक्षण असून त्याला कंपनीकडून ट्रेनिंग दिले जाते. तो शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन विनामूल्य मार्गदर्शन करतो.

जैन कंपनी आता आणणार देशी कांदा हार्वेस्टर
यासोबत कंपनी शेतकऱ्यांना ड्रीप, रेनकोट, स्प्रिंकलर या सिंचनाच्या पद्धती उपलब्ध करून देते, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि खर्च कमी होईल. आतापर्यंत आम्ही कांदा करार शेती खूप जवळून फोकस करत होतो, त्याचा पुढचा आमचा टप्पा आहे हे कांदा हार्वेस्टर ! आमच्या कंपनीचे जे व्यवस्थापक आहेत, ते त्यावर आता लक्ष केंद्रीत करत आहेत. कांदा हार्वेस्टर कंपनीच्या विचाराधीन असून लवकरच ते शेतकऱ्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.
अवघ्या चार महिन्यात लाखाचे उत्पन्न अन् फिक्स भाव
जळगाव, भुसावळ, रावेर, चोपडा, अमळनेर तालुक्यात व इतरत्रही आता इतर बरेच शेतकरी हा टोमॅटो लागवड करत आहेत. 120 दिवसात म्हणजे अवघ्या चार महिन्यात लाखाच्या घरात उत्पादन देणारी आपली टोमॅटोची व्हरायटी आहे. त्याच्यात आपली हमी भावापेक्षाही फिक्स भावाची शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना आहे. हळदमध्ये आपली हमीभाव योजना आहे. हळद आपण कंपनीत रोपे तयार करतो. आता येत्या काही महिन्यामध्ये शेतकऱ्यांना हळदीचे, अद्रकची रोपे देऊन तसेच काही प्रमाणात मिरचीचे रोप देऊन ते सुद्धा करार शेतीत समाविष्ट करून घेणार आहोत.
– गौतम देसर्डा
सिनिअर मॅनेजर,
जैन इरिगेशन सिस्टीम, जळगाव.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- उन्हाळ्यात ‘या’ पिकाची लागवड करून मिळवा बंपर कमाईची संधी
- “आयएमडी”कडून आज ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; तुमच्या भागातील हवामान आज कसे असेल ते जाणून घ्या