राज्यात रविवारपासून पुन्हा तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे. 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात ‘मिचाँग’ चक्रीवादळ धडकणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा (आयएमडी) अंदाज आहे. आधीच्याच पावसाने शेतीचे कोट्यवधींचे नुकसान झालेल्या उत्तर-मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. विदर्भात तर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे..
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता अती तीव्र होत असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होत आहे. परिणामी, रविवार 3 डिसेंबर ते मंगळवार, 4 डिसेंबर या तीन दिवसात देशभरात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे. विदर्भासह देशातील अनेक भागात हवामान खात्याने मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे
रविवारी वेग वाढून चक्रीवादळ ओलांडेल आंध्र प्रदेश
बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात तयार होणारे चक्रीवादळ रविवारी दक्षिण आंध्र प्रदेश ओलांडून जाईल. सोमवारी, 4 डिसेंबर रोजी वादळाचा वेग वाढून ते तामिळनाडूलगतच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यात आहे. त्यामुळे तामिळनाडूसह केरळ आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागाला अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसासोबतच दाट धुके आणि थंडीचे वातावरण
राज्याला गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशात हवामान विभागाने येत्या 24 तासात महाराष्ट्रातदेखील पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तविली आहे. येत्या 24 तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला गेला आहे. येत्या 3-4 दिवसात पावसासोबतच दाट धुके आणि थंडीचे वातावरण राज्यात राहील. तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित बहुतांश भागात हलक्या-मध्यम पावसाचा अंदाज आहे.
बुलढाणा, अकोला, अमरावतीसह वाशिममध्ये जोर
IMDने उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकेल. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाद्वारे दक्षतेच्या सूचना
आंध्र किनारा ओलांडताना चक्रीवादळाचा वेग 100 किमी प्रतितास पर्यंत पोहोचेल. त्यामुळे दक्षिण-मध्य भारताबरोबरच उत्तर प्रदेश, राजस्थानसह पंजाब-हरियाणातही पावसाची शक्यता आहे. दक्षिणेकडील किनारपट्टी क्षेत्रात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, तर उत्तर भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस पावसाचे असल्याने शेतकऱ्यांनी आपापल्या शेतमालाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशा सूचना कृषी विभागाद्वारे देण्यात आल्या आहेत.
चक्रीवादळाला म्यानमारने दिलेले मिचाँग नाव
चालू वर्षात बंगालच्या उपसागरातील हे चौथे तर हिंदी महासागरात तयार झालेले सहावे चक्रीवादळ असेल. सध्याच्या या चक्रीवादळाला म्यानमारने दिलेले मिचाँग हे नाव आहे. मिचाँग या शब्दाचा अर्थ सामर्थ्य आणि लवचिकता असा होतो.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- हिवाळ्यात होऊ शकते दुग्ध व्यवसायात नुकसान; गुरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी करा हे उपाय
- ग्रेन ड्रायर म्हणजे काय? शेतकरी सर्वात स्वस्त किंमतीला कोणते ग्रेन ड्रायर खरेदी करू शकतात?