देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारीवरील मजूर आत्महत्या करत आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) तयार केलेल्या अहवालातूनच हे भीषण, दुर्दैवी वास्तव समोर आले आहे. शेतकरी आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे.
दुष्काळ, नापिकी, पूर संकट तसेच शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणे अशा अनेक कारणांनी शेतकरी हताश, निराश झाले आहेत. आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यात 1,500 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बहुतांश शेतकरी गळफास लावून किंवा विष प्राशन करून मृत्यूला कवटाळत आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या
2022 मध्ये एकूण 1 लाख 70 हजार आत्महत्या झाल्या. 2021 मध्ये 1 लाख 64 हजार आत्महत्या नोंदविल्या गेल्या होत्या. त्या तुलनेत गेल्या वर्षी आत्महत्यांचे प्रमाण 4 टक्क्यांनी जास्त आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (37.6 टक्के), कर्नाटक (21.2 टक्के), आंध्र प्रदेश (8.1 टक्के) या राज्यात झाल्या. याखालोखाल, तामिळनाडूमध्ये 6.4 टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये 5.7 टक्के आत्महत्या झाल्या.
असंघटित क्षेत्रातील आत्महत्यांपैकी 33% शेती क्षेत्रात
NCRB अहवालानुसार, गेल्या वर्षी 2022 मध्ये भारतात दररोज 114 रोजंदारी कामगार तसेच 31 शेतकरी आणि शेतमजूरांनी आत्महत्या केल्या आहेत. असंघटित क्षेत्रातील पुरुषांच्या एकूण 41,433 आत्महत्यांपैकी 33 टक्के आत्महत्या रोजंदारी मजूर, शेतकरी आणि शेतमजूर यांचा आहे. त्यापैकी 30,143 (26.4 टक्के) रोजंदारीवर होते. शेती क्षेत्रात गुंतलेल्यांनी 11,290 आत्महत्या (6.6 टक्के) केल्या आहेत, त्यापैकी 5,207 शेतकरी आणि 6,083 शेतमजूर आहेत.
असंघटित क्षेत्रातील पुरुष वैफल्यग्रस्त
गेल्यावर्षीच्या देशातील एकूण आत्महत्यांपैकी 30,143 म्हणजे 33% रोजंदारी मजूर, 5,207 शेतकरी आणि ६6,083 शेतमजूर आहेत. आत्महत्यांच्या एकूण ओझ्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा 6.6% आणि रोजंदारी मजुरांचा 26.4% आहे. एकूण 41,433 आत्महत्या असंघटित क्षेत्रातील पुरुषांनी केल्या आहेत. NCRB अहवालानुसार, “कौटुंबिक समस्या” आणि “आजार” ही आत्महत्येची प्राथमिक कारणे आहेत.
महिला शेतकरीही करताहेत आत्महत्या
या वर्षभरात महिला वर्गात 208 शेतकरी, 611 शेतमजूर आणि 3,752 रोजंदारी कामगारांच्या आत्महत्या झाल्या. आत्महत्येने मरण पावलेल्यात 40,894 (23.9 टक्के) मॅट्रिक किंवा माध्यमिक स्तरापर्यंत शिकलेले आहेत, तर 30,810 (18 टक्के) प्राथमिकहून जास्त शिकलेले आहेत. एकूण संख्येपैकी कॉलेज शिक्षित 15.9 लोकांचा समावेश होता, तर 14.5 टक्के प्राथमिक शिक्षित आणि 11.5 टक्के निरक्षर होते. आत्महत्येमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांचे प्रमाण 5.2 टक्के आहे.
आत्महत्या रोखल्याचे सरकारी दावे तथ्यहीन
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, 58.2 टक्के लोकांनी गळफास लावून घेतला, 25.4 टक्के लोकांनी विष प्राशन केले तर 5 टक्के लोकांचा बुडून मृत्यू झाला. प्रख्यात कृषी तज्ज्ञ देविंदर शर्मा यांनी शेती क्षेत्रातील चिंताजनक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “सरकार आणि संबंधित अधिकार्यांकडून फक्त दावे केले जातात. मात्र, कृषी संकट गंभीरपणे कायम आहे. धोरणकर्त्यांनी शेतीच्या उत्पन्नाची तळागाळातून स्थिती ओळखण्याची गरज आहे. शेती क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राजकीय वचनबद्धतेची आवश्यकता आहे.”