विक्रांत पाटील
मुंबई – जीएसटी दरात कपात झाल्यानंतर 22 सप्टेंबर 2025 पासून ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणे खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. अशातच भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी आनंदाची बातमी आहे. रेटिंग एजन्सी आयसीआरएच्या अलीकडील अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात ट्रॅक्टर आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत जोरदार वाढ अपेक्षित आहे. ट्रॅक्टर विक्री 4-7% वाढेल, तर दुचाकी विक्री 6-9% दराने वाढण्याची अपेक्षा आहे.
वाढीमागील प्रमुख कारणे
शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी तसेच कंपन्या आणि डीलर्ससाठी हे वर्ष खूप सकारात्मक आहे, ज्याचा थेट परिणाम ट्रॅक्टर विक्रीवर होत आहे. चांगला पाऊस, ग्रामीण भागातील वाढलेले उत्पन्न, सणासुदीच्या काळातील मागणी आणि अलीकडील जीएसटी सुधारणा ही या वाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे मानले जाते.
ग्रामीण मागणीला मोठा आधार
यावर्षीचा मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहिला आहे. देशात दीर्घकालीन सरासरीपेक्षा 110% जास्त पाऊस झाला आहे. चांगल्या पावसामुळे शेतीच्या कामांना चालना मिळाली आहे आणि ग्रामीण मागणीला मोठा आधार मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच विक्रीत एकूण 11.7 टक्के वाढ झाली. ऑगस्टमध्ये किरकोळ विक्रीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत 30.1 टक्क्यांनी वाढ झाली, जी शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक भावना दर्शवते.
जीएसटी कपातीचे फायदे
ट्रॅक्टरवरील जीएसटी दर आता 12% वरून फक्त 5% इतका झाला आहे. यामुळे ट्रॅक्टर अधिक परवडणारे झाले आहेत आणि सणासुदीच्या काळात मागणी आणखी वाढेल. ट्रॅक्टरच्या किमतीत सरासरी ₹ 40,000 – ₹ 63,000 इतकी कपात झाली आहे. 35 HP ट्रॅक्टर ₹ 41,000, 45 HP ₹ 45,000, 50 HP ₹ 53,000 आणि 75 HP ₹ 63,000 इतके स्वस्त झाले आहेत.
जीएसटी कपात कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त – किरण बच्छाव
ट्रॅक्टर व इतरही कृषी यंत्रांवरील जीएसटीत 12% वरून 5% इतकी झाली. ही कपात कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार असून मजूर टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. सणासुदीच्या काळात ट्रॅक्टर विक्रेत्यांसाठीही ही कपात एक योग्यवेळी मिळालेली दिलासादायक भेट ठरणार आहे.
– किरण बच्छाव,
संचालक,
सातपुडा ऑटोमोबाईल, जळगाव
सणासुदीच्या काळात खरेदी वाढणार
GST कपात झाल्यानंतर देशभरासह राज्यातही ट्रॅक्टर बुकिंग आणि विक्रीत मोठी वाढ होत आहे. GST कपातमुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे सोपे झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी ट्रॅक्टर बुकिंगसाठी गेल्या दोन दिवसांत मोठी झुंबड उडाली आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात खरेदी वाढणार असून त्यासाठी बुकिंग आता जोरात सुरू आहे.
कृषी यंत्रांच्या मागणीतही वाढ
GST कपातीमुळे शेतीतील इतर कृषी यंत्रसामग्रीची खरेदीही वाढत आहे. कृषी यंत्रे तसेच ठिबक सिंचन प्रणाली, सिंचन उपकरणे, स्प्रिंकलर आणि नोझल विक्रीही वाढण्याची शक्यता आहे. कापणी आणि मळणी यंत्रसामग्री, ट्रॅक्टर आणि मागील ट्रॅक्टर व्हील रिम्स, ट्रॅक्टर सेंटर हाऊसिंग, बंपर, ब्रेक, गिअरबॉक्सेस आणि स्टीअरिंग व्हील यासारखे सुटे भागही स्वस्त झाल्याने कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळेल.
नवीन उत्सर्जन नियमांपूर्वी खरेदीचा जोर
1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन बीएस-VI उत्सर्जन नियमांपूर्वी खरेदीचाही जोर आहे. नवीन नियम लागू होण्यापूर्वी शेतकरी जुने मॉडेल खरेदी करण्यास प्राधान्य देऊ शकतात, ज्यामुळे विक्रीला अतिरिक्त चालना मिळेल.
दुचाकी उद्योगही तेजीत
ट्रॅक्टरसह दुचाकी बाजारपेठेसाठीही हे वर्ष चांगले ठरण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये, 18 लाख दुचाकीची विक्री झाली. जीएसटी कपातीमुळे वाहने अधिक परवडणारी झाली आहेत, ज्यामुळे दुचाकी वाहनांची मागणी वाढेल. त्यातून शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांना फायदा होईल इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्रीही सातत्याने वाढत आहे. ऑगस्टमध्ये दहा लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या. दुचाकी श्रेणीतील ईव्हीचा वाटा सुमारे 6-7 टक्क्यांवर स्थिर आहे.
एकूणच, आयसीआरए अहवाल ऑटो क्षेत्रासाठी सकारात्मक चित्र रंगवतो, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे आणि सरकारी धोरणे लक्षणीय योगदान देत आहेत. आगामी सणासुदीच्या हंगामात दोन्ही विभागांमध्ये विक्री नवीन उंचीवर पोहोचू शकते.