निलेश बोरसे, नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बोरपाडा हे अवघ्या दोन हजार लोकसंख्येचे गाव. रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने येथील लोक सुरत, नाशिक येथे रोजगाराच्या शोधात जातात. परंतु, गावातच काहीतरी उत्पन्नाचे साधन निर्माण करता येईल का, याचा शोध गावातील काही तरुण घेत होते. त्यात इंदास गावित या उच्चशिक्षित तरुणाने सहा शेतकर्यांचा गट स्थापन करुन गावातील तलावात पिंजरा पध्दतीने मत्स्यपालन करण्यास सुरवात केली. यासाठी त्यांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदान व प्रशिक्षणही मिळाले. यामुळे या तरुणांच्या शेतकरी गटाने पिंजरा पध्दतीतून यशस्वीपणे मत्स्यपालन करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी गावातील तलावात तरंगते सहा पिंजरे लावले असून यातून त्यांना गेल्या हंगामात सुमारे तीन लाखांचा निव्वळ नफा मिळाला. या शेतकरी गटाने गावातच रोजगाराचा मार्ग शोधल्याने अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला आहे. परिणामी, यातून गाव विकासालाही चालना मिळण्यास मदत होत आहे.
नवापूर तालुक्यातील बोरपाडा येथील लोक शेतीवर अवलंबून होते. परंतु, धरणात शेतजमिन गेल्याने येथील लोकांवर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मिळेल ती मोलमजुरी करण्याची वेळ लोकांवर आली. मात्र, त्यातूनही समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने तरुणांनी रोजगारासाठी सुरत, नाशिकचा रस्ता धरण्यास पसंती दिली. त्यामुळे बहुतांश कुटूंबे रोजगारासाठी स्थलांतरीत झाली आहेत. मात्र, गावातच राहुन रोजगार निर्मितीला चालना देता येईल काय, याचा शोधही या गावातील काही सुशिक्षित तरुण घेत होते. त्यात इंदास दावल्या गावित (33) हा तरुण उच्चशिक्षित म्हणजे एमए, नेट, सेट झाला असल्याने त्याने शासकीय योजनांची माहिती घेणेही सुरु ठेवले होते. अशातच त्यांना आदिवासी विकास विभागातर्फे शेतकर्यांच्या गटाला पिंजरा पध्दतीच्या मत्स्यपालनासाठी अनुदान मिळत असल्याची माहिती मिळाली. शिवाय बोरपाडा गावालगत मध्यभागी मोठा रायंगण तलावही आहे. त्यामुळे इंदास गावित याने सहा जणांचा शेतकरी गट तयार केला. त्या गटात स्वतःसह दिलीप भिलक्या गावित (50), दिलीप इमानजी गावित (35), काशिराम उतर्या पावरा (28), प्रियंका संदीप गावित (28), सारताबाई पंतू गावित (44) यांना घेतले.
अन् मत्स्यशेती केला निर्धार!
आदिवासी विकासविभागातर्फे पिंजरा पद्धतीच्या मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. भारतीय संविधान अनुच्छेद 275 (1)अंतर्गत आदिवासी शेतकर्यांना मत्स्यपालनासाठी पिंजरे पुरविणे, ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याचा लाभ नंदुरबार जिल्हयातील काही आदिवासी तरुणांनी घेतला असून त्यांनी प्रत्यक्ष मत्स्यपालनास सुरवातही केली आहे. या योजनेची माहिती इंदास गावित यांच्या शेतकरी गटाने घेतली. बोरपाडा गावालगतच रायंगण हा तलाव आहे. या तलावात वर्षभर पाणी असते. त्यामुळे या तलावात मत्स्यपालनासाठी त्यांनी सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय यांच्या कार्यालयात संपर्क साधला. या कार्यालयाच्या वतीने त्यांना पिंजर्यातील मत्स्यपालना विषयी माहिती मिळाली आणि यासदस्यांनी मत्स्यपालनाचा निर्धार केला.
येथून मिळाले प्रशिक्षण!
इंदास गावित यांच्या गटातील सदस्यांना नंदुरबारच्या मत्स्य व्यवसाय कार्यालयातर्फे आय. सी. ए. आर. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थासी. आय. एफ. ई. वर्सोवा, मुंबई येथे प्रशिक्षण देण्यात आले. पिंजर्यामध्ये मत्स्य बीज टाकून त्यांचे संगोपन कसे करावे, माश्यांचे चारा नियोजन, पिंजर्यांची स्वच्छता कशी करावी, लहान मासे व त्यांना झालेले आजार कसे ओळखावेत, याबाबत सखोल माहीती या प्रशिक्षणात देण्यात आली. प्रशिक्षणानंतर तलावात तरंगते सहा पिंजरे लावण्यात आले. या पिंजर्यांसाठी बाहेरुन कच्चे साहित्य आणून ते जागेवरच बनवून घेण्यात आले.
23 लाखांचे मिळाले अनुदान!
मत्स्य पालन व्यवसायासाठी इंदास गावित यांच्या सहा जणांच्या शेतकरी गटाला केजकल्चर अर्थात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन व्यवसायासाठी तरंगते सहा पिंजरे, मत्स्य बीजबोटुकली, खाद्य, बिगर यांत्रिकीबोट, यांत्रिकी बोट व प्रशिक्षणासाठी एकूण 23 लाख 66 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदूरबार कार्यालया मार्फत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मत्सपालनाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, मत्स्यपालन करताना त्याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेणेही महत्वाचे ठरते, त्यामुळे या शेतकर्यांना गटाला प्रशिक्षणही देण्यात आले.
अपयशातून घेतला धडा!
प्रशिक्षण घेतल्यानंतर सन 2020-21 मध्ये पहिल्यांदाच इंदास गावित यांच्या शेतकरी गटाने सहापैकी एका पिंजर्यात 25 हजार पंकज जातीची बोटुकली सोडली. मात्र, यातील बहुसंख्य मत्स्यबीज मृत झाले. या पध्दतीने मत्स्यपालन करण्याचा प्रत्यक्ष अनुभव नसल्याने असे घडल्याचे इंदास गावित यांनी सांगितले. तसेच एका पिंजर्याची मर्यादा ही 15 हजार मत्स्यबीजाची असते. क्षमतेपेक्षा जास्त बोटुकली सोडल्याने पहिल्या हंगामात नुकसान झाल्याचेही त्यांनी मान्य केले. यातून धडा घेत त्यांनी आता यशस्वीपणे मत्स्यपालन करण्यास सुरवात केली आहे.
चालू हंगामात 9 टन उत्पादन!
इंदास गावित यांनी सांगितले की, सप्टेबर 2021 मध्ये एकूण सहा पिंजर्यां पैकी एकामध्ये 15 हजार पंकज जातीची बोटुकली सोडण्यात आली होती. सहा महिन्यानंतर म्हणजे मार्च 2022 मध्ये मस्य पालनातून साधारणत: नऊ टन उत्पन्न त्यांना मिळाले. त्यातून त्यांना खर्च वजा जाता 2 लाख 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. म्हणजेच मत्स्य व्यवसायामुळे गटातील प्रत्येक सदस्याला साधारण अंदाजे 50 हजार रुपयांपर्यंत नफा झाला. शिवाय या मिळणार्या उत्पनातून दरवर्षी प्रति पिंजरा 1 हजार रुपये प्रमाणे 6 हजार रुपयांचे वार्षिंक भाडे ग्रामपंचायतीला देण्यात येत असल्याने ग्रामपंचायतीला सुध्दा उत्पन्न मिळत आहे.
असे केले व्यवस्थापन!
सुरवातीला सहा पैकी एका पिंजर्यांत 15 हजार पंकज जातीची बोटुकली सोडल्यानंतर त्यांना दररोज खाद्य टाकण्यात येत होते. त्यातील मासे मोठे झाल्यावर इतर पाच पिंजर्यात टाकण्यात आले. मत्स्यबीजासाठी एकूण 75 हजार रुपयांचा खर्च आला. माश्यांसाठी साधारणत: 8 टन इतके खाद्यखरेदी करण्यात आले. त्यासाठी 55 हजार रुपये टना प्रमाणे एकूण 4 लाख 40 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. दिवसातून दोन वेळेस पिंजर्यातील मत्स्य बिजांना खाद्य देणे, पिंजर्यांची साफसफाई करण्याची काळजी सर्व सभासदांनी घेतली. पिंजर्यां मधील मासे 500 ग्रॅम ते 1 किलो वजनाचे झाल्यावर गावात व स्थानिक व्यापार्यांना 80 रुपये प्रती किलो दराने जागेवरच विक्री केली जाते. गटा मार्फत मासे विक्रीच्या व्यवहाराची दैनदिन नोंद ठेवण्यात येते.
रोजगार निर्मितीला मिळाली चालना !
तयार झालेले मासे खरेदी करण्यासाठी व्यापारी स्वता जागेवर येतात. शिवाय गावातील छोटे-मोठे विक्रेतेही स्वता येवून माल घेवून जातात. त्यामुळे यातून अप्रत्यक्षपणे अनेकांना रोजगार मिळाला आहे. शिवाय या व्यवसायातून गावात चलन-वलन फिरण्यासही मदत झाली आहे. इतकेच नव्हे तर इतर तरुणांनाही रोजगार निर्मिती करण्यासाठी नवी दिशा मिळण्यास मदत झाली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून कशा पध्दतीने रोजगार निर्मिती होवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून या शेतकरी गटाकडे पाहीले जात आहे.
भविष्यातील नियोजन!
भविष्यात आणखी चांगल्या पद्धती नेमत्स्यपालन व्यवसाय करून जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया गटातील सर्व लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच मत्स्य पालन व्यवसाय उपलब्ध करून दिल्याबद्दल एकात्मिक आदिवासी प्रकल्प नंदुरबार, मार्गदर्शक सहाय्यक आयुक्तमत्स्य व्यवसाय, नंदूरबार व केंद्रीय मत्स्य शिक्षणसंस्था, वर्सोवा या सर्वांचे लाभार्थ्यांनी आभार मानले आहेत.
माशांना मोठी मागणी
आम्ही पारंपारिक पध्दतीने शेती करत होतो. परंतु, धरणात शेतजमिनी गेल्या. त्यामुळे गावातील कुटुंबे विस्थापित झालीत. गावात दुसरे रोजगाराचे साधन नाही. अशावेळी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आमच्या शेतकरी गटाला पिंजरा पध्दतीच्या मत्स्यपालनासाठी अनुदान मिळाले. तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, नंदूरबार व केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, वर्सोवा यांच्याकडून प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आता पिजर्यांमधून मत्स्य उत्पादनास सुरवात झाली आहे. या माशांना मागणी आहे. त्यांची विक्री स्थानिक व्यापारी, विक्रेते व गावातील नागरिकांना केली जाते. परिसरातील ग्रामस्थांना ताजे व स्वस्त दरात मासे मिळतात.
– इंदास गावित, गट लाभार्थी, बोरपाडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार, मो.नं.8411847016
Good Solution : मजूर समस्येवर मात; तयार केला A1 इलेक्ट्रिक बैल
Bsc Agri or BTech Agri Engineering बीएससी ॲग्री की बीटेक ॲग्री इंजिनिअरिंग? कृषी पदवीसाठी कोणता पर्याय A-1 Best, ते जाणून घ्या…
Comments 1