मुंबई : विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊया मागेल त्याला विहीर योजनेसाठी किती अनुदान मिळेल ?, या योजनेची पात्रता काय तसेच अर्ज कुठे करता येईल ?.
शेती पिकाच्या सिंचनासाठी बहुतांश शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही आणि यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हे नुकसान होऊ नये म्हणून शेती पिकांच्या सिंचनासाठी विहिरीमधून पाण्याची उपलब्धता केली जाते. राज्य शासनाने हा विचार करून राज्यात विहीर अनुदान योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतात शेती पिकांच्या सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता व्हावी, हा मागेल त्याला विहीर योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच शेती क्षेत्राकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे. शेतातील पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखणे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक साह्याची राशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या साह्याने जमा केली जाते.
अर्जासाठी आवश्यक पात्रता
ज्या शेतकऱ्याला लाभ घ्यायचा आहे तो शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभासाठी 0.20 हेक्टर शेत जमीन शेतकऱ्याकडे असायला हवी. शेतजमिनीची कमाल मर्यादा सहा हेक्टर पर्यंत गृहीत धरली जाते. जॉब कार्ड असायला हवे. शेतकऱ्याचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असला पाहिजे. नवीन विहिरीचे ठिकाण हे जुन्या विहिरीपासून 500 फूट अंतरावर असायला हवे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणे कडून पाण्याची उपलब्धता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठीचा अर्ज कुठे करावा ?
ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्यांचे अर्ज त्यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जमा करायचे आहेत. हा अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत ग्रामसभेचा प्रस्ताव घेईल. त्यानंतर ग्रामपंचायत कडील हा अर्ज मंजूर करण्यासाठी बीडीओकडे सादर केला जाईल.