पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
जळगांव: राज्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या आणि उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस जरी चांगला असला तरी खरीपाला यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
काढणीस केलेले सोयाबीन,भात,कापूस,ज्वारी,मक्का, स्ट्राबेरी यासारखी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा अस्मानी संकटामुळे हिरावला गेला आहे. परीक्पक पिके भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे पिके तयार करून बाजारातून चार पैसे हाताशी आले तर दिवाळी सुखाची होईल या बळीराजाच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्याच बरोबर मका व ज्वारीचे पिक शेतकऱ्याच्या हातातून गेले आणि त्या पिकाचा चारा देखील शेतकऱ्याच्या जीत्राबाच्या तोंडातून गेल्याने यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळ काढणारी ठरणार असचं आज रोजी चित्र आहे.
पंचनाम्यांच्या अडचणी
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून, सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात जुंपल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होवू शकत नसल्याची स्थिती आहे. चार दिवसांपासून राज्यभर मु्क्काम ठोकून बसलेल्या परतीच्या पावसाने कहर केलाय. निवडणुकीचा काळ असल्याने अनेक ठिकाणच्या प्रचारसभांवर पावसाने पाणी फेरले. त्यातच आता शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे. मका, ज्वारी, सायाबीन, कापूस या पीकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वात जास्त जालना जिल्ह्यातील सातोना येथे १७४ तर लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे तब्बल १७० मिलिमिटर पाऊस झाला. आता निवडणुका असल्याने अधिकारी त्यात व्यस्त आहेत आणि त्यामुळेच पिकांच्या पंचनाम्यांच्या अडचणी येऊ लागल्या आहेत. 21 ऑक्टोबरला मतदान आाणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी आहे. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या आहेत. दरम्यान, या सर्व प्रक्रियेत प्रशासकीय यंत्रणा अडकल्याने परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कौफियत ऐकुन घेण्यासाठी कोणीही उपलब्ध नाहीये. त्यामुळे अस्मानी व सुलतानी अशा नेहमीच्या फेऱ्यात बळीराजा अडकला आहे.
हवामान अंदाज
काल हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या संकटात अजून भर टाकली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पावसासाठी पोषक असल्याने राज्यात वादळी वारे व मेघगर्जनेसह पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात वर्तविण्यात आली आहे. राज्यात जवळपास सर्व धरण १०० % भरलेले असल्याने शेतात जमा झालेले पाणी लवकर विसर्ग होत नाही, त्यामुळे तयार माल पूर्ण शेतात भिजत घातल्याची स्थिती आहे. हातात आलेला माल तर गेलाच आहे परंतु पुढच्या पेरणीसाठी रान तयार करायला सुद्धा आता उशीर होईल असे चित्र आज दिसत आहे.