उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही म्हणून निराश होऊन प्रणालीला नावे न ठेवता वडिलोपार्जित शेतात ज्ञानाचा वापर करून शेतीतून पैसा व नावलौकिक कमावता येतो हे एम. ए., बी.एड. झालेल्या सुरेश काळे यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले. वर्षातून दोन वेळेस फुलकोबीची शेती करून ते दरवर्षी किमान तीन लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावतात.
सुरेश काळे यांचे शिक्षण बीएस्सी, एम.ए. इंग्रजी व बी. एड. झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी नोकरीची प्रतीक्षा केली. पण यश आले नाही. त्यातून खुचून न जाता त्यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसायात उतरायचा निर्णय घेतला. त्यांची शेती वडीगोद्री ता.अंबड जि.जालना येथे वडिलोपार्जित जवळपास 14 एकर जमीन आहे. वडील पूर्वीपासून शेती करतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर शेतीमाल विकण्यासाठी विविध बाजारपेठेत जाणे, तेथील वातावरण, आर्थिक उलाढाल, याची माहिती होती. हीच शिदोरी घेऊन त्यांनी वाटचाल सुरु केली. 84/85 पासून वडील फुलकोबीची शेती करत होते. त्याचा अनुभव घेत सुरेश यांनी फ्लावर शेती सुरु करताना यंत्र वापर सह आधुनिक तंत्र वापर सुरु केला. जायकवाडी कालव्याला लागून त्यांची शेती आहे. 8 एकर वडिलोपार्जित, तर 6 एकर शेतातील उत्पन्नावर घेतली आहे. शेतात एक विहीर, एक बोरवेल व एक 25 द 25 मीटरचे शेततळे आहे. घरी आई, वडील, दोन भाऊ व बहिण असा परिवार आहे एक भाऊ ट्रॅक्टरची दुरुस्तीची कामे करतो, तर एक भाऊ व बहिण शिकत आहेत.
शेतीच्या एकूण क्षेत्रापैकी 8 एकर क्षेत्र कपाशी लागवडीखाली असते. चार एकर मोसंबी लागवड केली आहे. या मोसंबी बागेतील दोन ओळीतील जागेत ते कोबीची शेती करतात. मोसंबीतील अंतर 14 द 12 फुट आहे. यांच्या मधोमध 2 द 2 फुटाची जागा काढून त्यामध्ये पिक घेतले जाते. दरवर्षातून दोनदा हे पिक घेतात पावसाळी पिक घेताना अनेक धोके असतात पण चांगला भाव मिळून पैसा होतो, तर हिवाळी उत्पन्नावेळी बाजारात आवक जास्त असते, त्यामुळे भाव मिळत नाही, जुलै 18 मध्ये त्यांनी आनंद कंपनीच्या हलचल या वाणाची लागवड केली. तत्पूर्वी बी कोकोपिटमध्ये टाकून रोप तयार केले. रोप लागवडीपूर्वी शेतात शेणखत मिसळून घेतले होते. त्यानंतर 2 गोणी 10:26, एक गोणी युरिया टाकून जमिनीलगत सरी काढून त्यावर रोप लावले. कीड रोग येण्यापुर्वी काळजी म्हणुन रोप लागवडीनंतर दर 15 दिवसांनी एक फवारणी घेतली जात असे. त्यासाठी अवांता, टाटा टाकोनी या औषधींचा वापर केला. 15 लिटर च्या पंपात 5 मि.ली. औषध टाकून फवारणी केली जात असे. हलचल ही लवकर येणारी जात असल्यामुळे 60 दिवसानंतर पिक काढणीस आले.
जवळपास 300 गोणी (पोते) उत्पादन निघाले. एका गोणीत 15 ते 17 किलो माल बसतो. त्यानुसार 12 टन उत्पादन मिळाले. वाडीगोद्री, अंबड, शहागड अशा जवळच्याच आठवडी बाजारात ही कोबी विकली. साधारणपणे 300 ते 500 रु. प्रती गोणी दर मिळाला. तसे प्रत्येक पोते 20 किलोचे असते पण त्यातील पाल दोन- तीन किलो भरतो. आठवडी बाजारात बोली लावून माल विकला जातो, व्यापार्यास माल विकल्यास पैसा कमी मिळतो. दोन एकर वरील कोबीपासून एकरी 20 ते 22 हजार रु.खर्च वजा जाता जवळपास एकरी एक लाख रु. फायदा मिळाला. असे दोन लाख रु. फक्त दोन महिन्यात मिळाले. शिवाय दुय्यम दर्जाचे 20 ते 25 गोणी माल झाला होता त्याचे पैसें वेगळे. फुलकोबीची शेती यशस्वी करण्यासाठी गोलटगावचे केशवराव साळुंके यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते, यासाठी पैसा द्यावा लागत नाही, कारण ते सुरेश काळे यांचे मामा आहेत. त्यांच्यामुळे या शेतीतील बारकावे माहिती झाले, असे काळे सांगतात.
दुसरे कोबी पिक उत्पादनासाठी जमिनीचा फेरपालट केला. कारण एकाच जमिनीत वारंवार हे पिक घेता येत नाही. त्यांची जमीन एकदम काळी असून सततच्या मशागतीमुळे व योग्य खत व्यवस्थापनामुळे जमिनीचा पोत चांगला झाला आहे. दुसर्या पिकासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 3 द 8 फूट आकाराचे गादी वाफे त्यात दोन घमेले शेणखत व तीन किलो डी.ए.पी.टाकून स्नोबाल जातीचे बियाणे बुरशीनाशकाची प्रक्रिया करून गादी वाफ्यात टाकले. सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात दोन ओळीत 2.5 द 1.5 फूट अंतरावर रोपांची लागवड केली. लागवडीपूर्वी रोपांची मुळे बुरशीनाशकाच्या द्रावणात व नंतर शेण गोमुत्र द्रावणात बुडवून लागवड केली. या काळातील पिकाचा पक्व होण्याचा कालावधी जास्त असतो त्यामुळे खताचे प्रमाण जास्त ठेवावे लागते. लागवडी पूर्वीपासून दीड दीड गोणी डि. ए. पी. तीन वेळेस तर दीड गोणी युरिया लागवडीवेळी दिला. हिवाळ्यात कीड रोग प्रमाण कमी असते तरीही कीडरोग नियंत्रणासाठी तीन फवारण्या केल्या. कोबीवर पडणारी अळी पानाच्या मागे असते. त्यामुळे लवकर लक्ष्यात येत नाही. पण पानावर चट्टे पडलेले दिसले की, अळीचा प्रादुर्भाव झाला असे अनुभवावरून समजते, त्यावर तत्काळ उपाययोजना करता येते.
या हंगामातील माल 85 ते 90 दिवसानंतर तोडणीस येतो. तर पावसाळी हंगामापेक्षा उत्पादनही जास्त मिळते पण पाणीही जास्त द्यावे लागते. या काळातील कोबी गड्डा तीन ते चार किलो पर्यंत भरतो, मात्र बाजारात भाव कमी असतो कारण आवक जास्त असते. या हंगामातील उत्पन्न 450 पोते मिळाले सरासरी भाव 300 रु. मिळाला. त्यातून एकरी 22 हजार रु खर्च वजा जाता एकरी 1.25 लाख रु. मिळाले. बाजारात विक्रीसाठी जाणारा माल हा पांढरा असेल तर चांगला भाव मिळतो, त्यामुळे सुरेश लक्ष ठेऊन असतात.
नेहमी नवनवीन प्रयोग करण्याची आवड असणारे सुरेशमुळे गेल्या दोन वर्षपासून डिसेंबरमध्ये कपाशी काढून त्या शेताची मशागत करून एक एकरवर टरबूज लागवड करतात. या वर्षी त्यांनी कपाशीच्या शेतात 4.5 द 1.5 फूट अंतरावर सरी काढून त्यावर ड्रीप नळ्या टाकून घेतल्या. सरी वरब्यामध्ये शेणखत व 12:32 हे खत मिसळून बेड ओलवून घेतले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नामधारी सीड्सचे एच- 20 हे बियाणे लागवड केले. यावर्षी थंडीचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे 60 टक्केच उगवण झाली. फळमाशी नियंत्रणसाठी कामगंध सापळे लावले याशिवाय आवश्यक त्या कीड रोगनुसार फवारण्या केल्या. शिवाय ड्रीपमधून विद्राव्य खतेही दिली. एका वेलीस तीन फळे ठेवली प्रती फळ 3 ते 5 किलोचे भरले. एकूण 12 टन फळ मिळाले. शेतातच 7 रु. किलो प्रमाणे व्यापार्यास विकले. 85 हजार रु. मिळाले. 25 हजार रु. खर्च वजा जाता नगदी 60 हजार रु. 90 दिवसात मिळाले.
यावर्षी दुष्काळी परिस्थती असल्यामुळे जायकवाडीचे पाणी फारसे मिळाले नाही तरीही 8 एकर क्षेत्रात कापसातून 75 क्विंटल कापूस, त्याचे चार लाख रु पेक्षा जास्त उत्पन्न तर कोबीचे दोन सिझनचे मिळून 5 लाख रु. टरबुजाचे 50 हजार असे जवळपास 10 लाख रु. चे उत्पन्न काढले. यात मोसंबीचा समावेश नाही. कारण ते अजुन तोडणीस आले नव्हते. म्हणजे दुष्काळी परिस्थिती असतानाही एखादा शेतकरी एवढे उत्पादन काढू शकतो. तर निसर्गाची साथ मिळाली तर हे उत्पन्न किती असेल. नव तरुण शेतकरी यांनी आदर्श घ्यावा. सुरेश काळे यांचे शेतात एक टुमदार मोठा बंगला आहे. एन. एच. बी.चा 16 लाख रु.चा प्रकल्प मंजूर झाला होता (2009-10) त्यातून एक विहीर, पाईपलाईन, ठिबक संच, ट्रक्टर त्यावरील अवजारे खरेदी केलेली आहेत. शेतात छोटे शेळीपालन केले असून 25 शेळ्या आहेत, दर वर्षी एक शेळीपासून दोन करडे मिळतात त्यातील फक्त नराचीच विक्री केली जाते. प्रती नग 4 ते 4.5 हजार रु. मिळतात. शिवाय शेळ्यापासून मिळणारे लेंडीखत वेगळे. कृषी विभागाशी त्यांचे चांगले संबंध असून मंडळ कृषी अधिकारी माणिक जाधव, कृषी पर्यवेक्षक रमेश चांडगे, सहा. कृष्णा गट्टूवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
2018 मध्ये सुरेश यांनी राजुरेश्वर फार्मर्स प्रोडुसर कंपनी रजिस्टर केली असून त्या अंतर्गत 12 शेतकरी गट स्थापन केले आहेत. प्रत्यक गटात किमान 15 सभासद असून एक महिलांचा गटही आहे. सर्व गटातील एक संचालक असे 15 सभासदांचे कंपनीत संचालक मंडळ आहे. त्याही दोन महिला आहेत. या अंतर्गत शेतकरी स्वावलंबी व्हावा म्हणुन प्रयत्न सुरु आहेत. कमी पाण्यावर यशस्वी शेती व जास्त उत्पन्न हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यांचा गट कार्य करतो आहे .
शेती करणार्याना सुरेश काळे सांगतात, पारंपारिक शेतीत बदल करून मार्केटचा अभ्यास करून शेतीत उतरले पाहिजे. आधुनिक शेतीचे अनुकरण करताना नियोजन व यांत्रिकीकरण गरजेचे आहे. काय पिकवतो यापेक्षा काय विकले जाते तेच पिकवावे किवा मी पिकवेन ते जास्त किमतीत विकून दाखवेन हि जिद्द ठेवली तर शेती कधीच नुकसानीचे ठरत नाही. निसर्गाचा समतोल तर दरवर्षी बिघडत आहेच पण त्यावर आम्ही नेहमीच मात करीत आलो आहोत, व करीत राहणार आहोत. शासनानेही आता शेतमालाचे भाव बांधून द्यावेत असे वाटते.