मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जाते. महाराष्ट्र राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली असून यात देखील वार्षिक 6 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता कधी मिळणार ?, याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली होती. मात्र, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे.
या योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 26 ऑक्टोंबर रोजी शिर्डी येथील एका कार्यक्रमादरम्यान वितरण करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची उपस्थिती असणार आहे.
1720 कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता
राज्यात शेतकरी लाभार्थ्यांची संख्या एकूण 93.07 लाख इतकी आहे. यासाठी राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता दिली आहे. दरम्यान, राज्यातील एकूण 85.60 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता मिळाला होता. मात्र कृषी विभागाच्या अभिलेख तपासणी नंतर राज्यातील लाभार्थ्यांची संख्या 93.07 लाख एवढी झाली आहे.
चार शेतमजुरांचे काम आता एकचजण करणार… इलेक्ट्रिक बुल। Electric bull।
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी काय ?
ही योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनसारखीच आहे.
राज्य सरकार या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देईल.
शेतकऱ्यांच्या खात्यावर दर तीन महिन्याला केंद्र सरकारकडून 2 हजार रुपये जमा होतात.
याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता राज्य सरकार देखील दर तीन महिन्याला 2 हजार रुपये जमा करेल.
यानुसार वर्षाला केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.
सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.