धुळ्यातील दुष्काळग्रस्त भागात सुरेश भदाणे यांचा प्रयत्न
उमेदीच्या काळात खस्ता खाल्लेल्या दुसाणे (ता.साक्री, जि.धुळे) येथील सुरेश भदाणे यांनी आता निर्यातक्षम बटेरपालनाचा व्यवसाय उभा केला आहे. प्राथमिक अवस्थेत असलेल्या या व्यवसायाला उद्योगाचे रूप देण्याचा त्यांचा मानस आहे. साधारण शंभर चौरस फूटाच्या जागेचा वापर करून महिन्याला 20 हजार रुपये उत्पन्न देणारा हा उद्योग असल्याचे भदाणे सांगतात. इतरांना या व्यवसायासाठी ते प्रोत्साहित करत आहेत.
साक्री (धुळे) पासून 27 व निजामपूर पासून 18 किलोमीटर अंतरावर दुसाने हे माळमाथ्यावरचे गाव. बरड, हलक्या प्रतीची येथील जमीन. पाऊसमान कमीच त्यामुळे कोरडवाहू कापूस, बाजरी हीच मुख्य पिके. गावाच्या वरच्या बाजूला फोफादे धरण असले तरी विहिरींना पाण्याचा फारसा स्रोत नाहीच. परिणामी पाऊस चांगला झाला तरच खरिपाची पिके येणार. त्यामुळे बदलत्या सामाजिक व्यवस्थेत कुटुंबाच्या उदरनिर्वाहा पुरते देखील उत्पन्न शेती व्यवसायातून मिळत नसल्याने अनेकांनी रोजगारासाठी शहरे गाठली. ज्यांनी उच्चशिक्षण घेतले त्यांना चांगली नोकरी मिळाली पण, अल्प शिक्षितांची मात्र रोजगारासाठी वणवण सुरू झाली. काहीजण शेतीला जोडधंदा शोधू लागले. कोणी गायी, म्हशी पालन करू लागले, तर कोणी शेळीपालन. अनेकांनी शेड उभारून कुक्कुटपालन सुरू केले. काहींणी चारचाकी वाहन घेऊन प्रवासी व मालवाहतूक सुरू केली. दुसाण्याचे सुरेश भदाणे त्यापैकीच एक.
मृत्युच्या दाढेतून परतले
दहावी नापास सुरेश भदाणे यांची बेरोजगारी ते लाखो रुपये गुंतवणुकीच्या व्यवसाय उभारणी पर्यंतची कथा मोठी रोचक आहे. अत्यल्प शिक्षणामुळे मिळेल ते काम करण्याची मनाची तयारी करून त्यांनी मुंबई गाठली. तेथे एका स्टीलचे ग्लास निर्मिती करणार्या कारखान्यात ते काम करू लागले. एके दिवशी अपघात होऊन ग्लासचा पत्रा उडाला व डोक्यात घुसला. उपचार करणार्या डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून त्यांना वाचविले. एकदा मृत्यूशी सामना झाला असल्याने ती नोकरी सोडून त्यांनी आपले गाव गाठले. काही दिवस गावीच काढले. रोजगारा शिवाय घरी राहणे शक्यच नव्हते, म्हणून मग एका मित्राच्या मदतीने दमन येथील एलीकोन फार्मा या कंपनीत हेल्परचे काम मिळाले. तेथे काम करता करता वेगवेगळ्या मशीन्सचे ऑपरेटिंग शिकून घेतले. त्याचा फायदा पुढील आयुष्यात झाला.
रात्रीची ती मोबाईल रिंग…
दमन येथे चांगल्या पगाराच्या नोकरीत स्थिर झालेल्या सुरेश भदाणे यांच्या दैवाचे चक्र असे काही फिरले की, ती नोकरी सोडून त्यांना पुन्हा गावी परतावे लागले. एक सर्वोत्तम मशीन ऑपरेटर असल्याने दुबईत जाऊन भरपूर पगाराची नोकरी करण्याचे स्वप्नही तिथेच विरले. दुबईला जाण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव केली पण, दुबईचे बोलावणे काही आले नाही. त्यातच दमणची नोकरी सोडावी लागली. गावाकडे येवून कर्ज काढून टेम्पो घेतला व प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. अपघाताच्या मालिकेने घेरल्याने धंदा तर बुडालाच कर्जामुळे शेतही गहान पडले आणि सुरू झाला सावकारांचा पैशांसाठी तगादा. त्यातून सुटका होत नाही तोच मल्टीलेवल मार्केटिंगने घेरले. प्रगतीची स्वप्नपुर्ती होणार तोच कंपनीने गाशा गुंडाळला. आता तर गावात तोंडही दाखवायला जागा उरली नाही. शेतात काम येईना. तशातही पिकावर फवारणी करण्याचे काम करून बघितले. पाचव्या सहाव्या पंपाला खांद्याची कातडी सोलवटून निघाली. आपल्याला शेतीची कामेही येत नाहीत. मग आता करायचे काय? आत्महत्या! हाच एक मार्ग दिसला. घरातील सगळेच झोपेच्या अधीन असतांना मृत्युला कवटाळावे असा निश्चय केला. तोंडात विषारी औषध टाकणार तोच फोनची रिंग वाजली… फोन दमनहून होता. ‘आपने जो नोकरी के लिए दुबई मे आवेदन किया था वह मंजूर हो गया है’ त्यावेळी रात्रीचे 10 वाजून 29 मिनिटे झाली होती. फोनच्या त्या एका रिंगने सुरेश भदाणे यांचे आयुष्य पार बदलून गेले.
दुबईत नोकरीची संधी
दमण येथे नोकरीस असतांनाच परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची तयारी सुरू केली होती. दुबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, तर आपण आर्थिक प्रगती करू, अशी स्वप्ने ते रंगवू लागले. परंतु, याच कालखंडात संकटांच्या मालिकांनी त्यांना दमन सोडावे लागले. दमनहून परत आल्यावर रोजगारासाठी अनेक वाटा शोधल्या. पण अपयश काही पाठ सोडीना. अशातच एके दिवशी दुबईला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. मशीन ऑपरेटिंगचा अनुभव कामी आला. दुबईत अधिकाधिक वेळ काम करून पैसा मिळविला. प्रमोशन मिळत गेले, पगार वाढत गेला. त्या पैशातून गावाची गहाण ठेवलेली शेते सोडवली, भावाबहिणीची धडाक्यात लग्ने केली.
वॉटर प्लँट सुरू केला
दुबईत नोकरी करीत असतांनाच भदाणे यांनी गावात भागीदारीत अॅक्वा वॉटर प्लँट टाकला. त्यावेळी दुसाने परिसरात असा व्यवसाय नसल्याने त्यातून चांगला फायदा होऊ लागला. वर्षभरातच भागीदाराने अंग काढून घेतल्याने स्वबळावर तो व्यवसाय सुरू ठेवला. लहान भाऊ या व्यवसायात रमला असतांना या प्लँटला लागूनच कोंबडीपालन व शेळीपालन सुरू केले. कोंबड्यांच्या गिरीराज, वनराज, पाथर्डी, फायटर, कडकनाथ अशा वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्यांचे संगोपन केले. चार महिन्यांच्या संगोपनानंतर पैसे मात्र फारच थोडे रहात. यापासून फायदा मुळीच होत नसल्याने वर्षभरातच गोटफार्म व पोल्ट्रीफार्म बंद केले.
बटेर पालनाची प्रेरणा
दुबईत नोकरी करता करता त्या देशात बटेर (लाव्हरी तितर) पक्षांना मोठी मागणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथल्या आठ-दहा वर्षांतील वास्तव्यामुळे बटेर पालनाची कल्पना मिळाली. बटेरची विक्री केल्यास चांगला पैसा मिळू शकतो याची खात्री त्यांना झाली आणि गावी परतल्यावर आधुनिक तंत्राचा वापर करून अद्ययावत बटेर पैदास व संगोपन सुरू केले.
बटेर पालनाचा अभ्यास
बकर्या, कोंबडी पालनात फारसा फायदा नाही हे लक्षात आल्यामुळे भदाणे यांनी बटेर संगोपनाचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी राज्यभर ठिकठिकाणच्या बटेर फार्मला भेटी दिल्या. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील ज्यांनी हा व्यवसाय यशस्वी केला त्यांचे अनुभव ऐकले व ज्यांनी फार्म बंद केला त्याची कारणे काय ते जाणून घेतले. सगळी माहिती मिळवून मग बटेर पालनाचा निर्णय घेतला. मोठ्या प्रमाणात बटेर पालन करण्यासाठीचे पक्षी जवळपास कुठेच मिळेनात. ते मिळाले केरळात, बिहारमध्ये. सुरवातीला फक्त शंभर पक्षी आणले. कारण हा व्यवसाय नाजूक पक्षांचा होता. त्यापासून अंडे मिळू लागेपर्यंत धीर धरला. अंड्यांपासून पुन्हा पक्षी तयार करणे व विकणे हाच मुख्य हेतू असल्याने हैचरिज मशीनची गरज निर्माण झाली. हैदराबाद येथून मशीन आणून शंभर-दोनशे असे पक्षी तयार करून विकले. मागणी वाढू लागली तसा व्यवसाय विस्ताराचा निर्णय घेतला. उट्टीकुट्टी येथून मोठे मशीन आणले. आता पक्षी विकणे बंद करून वाढवायचे असा निर्णय घेतला. सुरवातीच्या काळात जमिनीवर पक्षी संगोपन सुरू केले. पक्षाने अंडे दिले की त्याला माती लागायची त्यामुळे हैचारिंजला अडचण यायची त्यामुळे पिल्ले अपंग जन्मायची. त्यामुळे पिल्लांसाठी पिंजरे केले.
इतर शेतकर्यांना प्रोत्साहन
या व्यवसायातून फक्त स्वतःची प्रगतीच न साधता परिसरातील शेतकर्यांनाही सोबत घेऊन त्यांना बटेर पालनासाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय भदाणे यांनी घेतला आहे. जे शेतकरी लाव्हरी (बटेर) पालन करण्यासाठी उत्सूक असतील त्यांना ते नुकतेच जन्मलेले पक्षी देणार असून पूर्ण वाढलेले पक्षी शेतकर्यांकडून खरेदी करण्याची हमी घेत आहेत. सध्या धुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना ते पिल्ले देणार आहेत. कुक्कुटपालनाप्रमाणे एकावेळी 5 हजार किंवा 10 हजार पिल्ले ते देणार नाहीत. तर एकावेळी एका शेतकर्याला फक्त 1 हजार पक्षी देणार आहेत. त्यासाठी फक्त दहा बाय दहा फूट एवढीच जागा लागेल. या जागेवर पत्र्याचे छोटेशे शेड उभे करावे, त्याला आजूबाजूने बारिकजाळी लावावी जेणेकरून मुंगुस आदीपासून ते सुरक्षित राहू शकतील. 1 हजार पक्षांच्या देखभालीसाठी एक स्वतंत्र माणसाची गरज नाहे. बटेर संगोपन करणार्यांना भदाणे 1 दिवसापासून ते 1 आठवड्यापर्यंतचे पक्षी देणार आहेत. 1 दिवसाचा पक्षाची किमत प्रती पक्षी 14 रुपये तर 1 आठवड्याच्या पक्षाची किंमत 20 रुपये आहे. तसेच पक्षांना लागणारे सर्व खाद्य ते पुरवणार आहेत. 40 ते 45 दिवसात एक बैच निघते. पिल्ले, खाद्य आणि देखरेख असा प्रती पक्षी खर्च 30 रुपये होतो. 180 ते 200 ग्रॅम पक्षाला 50 रुपये किंमत मिळते. अशाप्रकारे एका पक्षामागे 20 रुपये निव्वळ नफा राहतो, म्हणजेच एक ते दीड महिन्यात हजार पाक्षांमागे शेतकरी 20 हजार रुपये कमवू शकेल.
निर्यातमक्षम बटेर
लाव्हरी हा वन्यजीव असल्याने त्याला पाळण्यावर बंदी आहे. आम्ही जे बटेर पालन करतो ते लाव्हरी व तितरचे हायब्रीड आहे. ते जापानी ब्रीड असून वनविभागाने त्याच्या संगोपनाचे व निर्यातीचे प्रमाणपत्र सुरेश भदाणे यांना मिळाले आहे. अशाप्रकारे निर्यातक्षम बटेर पालनाचा परवाना असलेला भदाणे यांचा राज्यातला हा एकमेव प्लँट आहे. भदाणे यांच्याकडे बटेर विक्रीचा परवाना असल्याने संगोपन करणार्यांना मात्र परवान्याची गरज नाही.
बटेरचे खास खाद्य
कोंबडीला जे खाद्य लागते त्यापेक्षा वेगळे खाद्य बटेर पक्षाला लागते. ते बाजारात सहज उपलब्ध आहे. भदाणे गोदरेज कंपनीचे खाद्य पक्षांसाठी वापरतात. जंगली गावरान लाव्हरीत असलेले सगळेच गुणधर्म बटेरमध्ये आहेत. त्याची शास्रीय पद्धतीने चिकित्सा केल्याचे भदाणे यांनी सांगितले. चवीच्या बाबतीतही बटेर कुठेच कमी पडत नाही. भरपूर मांस असल्याने एक बटेर 180 ते 400 ग्रॅम वजनाचे होते. भदाणे यांच्या या बटेर फार्मवर सध्या अंडी, पिल्ले व पूर्ण वाढ झालेले असे सुमारे 50 हजार पक्षी आहेत. 11 डिसेंबर 2018 पासून भदाणे यांनी व्यवसायाचा प्रारंभ केला आहे. भाऊ योगेश व सतीष पाटील यांचे त्यांना सहकार्य मिळते. लवकरच हा उद्योग अनेकांच्या रोजगाराचे साधन म्हणून ओळखले जाईल असा विश्वास सुरेश भदाणे यांनी व्यक्त केला.
बटेरची विष्ठा उत्तम खत
बटेरचे खाद्य अतिशय उच्च प्रतीचे कॅल्सियम, प्रोटीनयुक्त असते त्यामुळे बटेरची विष्ठा पिकांसाठी फारच उत्तम खत ठरते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव स्वतः भदाणे यांनी घेतला आहे. त्यांनी आपल्या शेतातील 20 गुंठे क्षेत्रात मेथीचे उत्पादन घेतले असून त्याला खत म्हणून बटेरची विष्ठा टाकली आहे. या व्यतिरिक्त कोणतेही खत व फवारणी त्यांनी केलेली नसून उत्तम प्रतीच्या मेथीचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. या 20 गुंठ्यात त्यांना दोनच महिन्यात 70 हजारांचे उत्पन्न मिळाले.
प्रतिक्रिया
कमी खर्चात बटेर पालन उद्योग
कमी जागेत, कमी खर्चात एक दीड महिन्यात पैसे देणारा हा प्रकल्प असून धुळे जिल्ह्यातील माझ्या तरुण शेतकरी मित्रांपर्यंत मला तो न्यायचा आहे. शेतकर्यांना जोडधंदाच करायचा असेल तर बटेर पालनाचा करावा. मी शेतकर्यांना एक दिवस ते एका आठवड्याचे पिल्ले देईन. खाद्यही पुरवेल, त्यांनी पक्षी वाढवावे. मी बटेर निर्यात करणार आहे. निर्यातीत चांगला पैसा असल्याने लवकरच या व्यवसायातून भरभराट होईल असे वाटते.
- सुरेश काशिनाथ भदाणे,
रा.दुसाने, ता.साक्री, जि.धुळे.
मो.नं.7888148523