शहादा : शेती इतके समृद्ध व शाश्वत क्षेत्र दुसरे कोणतेही नाही फक्त शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा परिणाम स्वरूप उत्पादन व उत्पादकता वाढवून आर्थिकदृष्ट्या त्यांचा चांगला फायदा होईल, असे प्रतिपादन शहाद्याचे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी केले. शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. प्रदर्शनाचा सोमवारी (ता. 13) समारोप आहे.
अ ॅग्रोवर्ल्डच्यावतीने शहादा येथील प्रेस मारुती मैदान येथे चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेती, दुग्धव्यवसाय, जल यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, दादासाहेब रावल उद्योग समुहाचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, निर्मल सिड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील, अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
भरभराटीसाठी मेहनत घ्या – रावल
कोरोनासारख्या काळात शेतकऱ्यांनी काम केले म्हणून नागरिकांना खायला मिळाले. शेतीला फार महत्त्व असून शेतकऱ्यांनी हिंमत ठेवली पाहिजे, व्यापारी बुद्धी शिकली पाहिजे. शेतीत भरभराटी मिळविण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे आवाहन दादासाहेब रावल उद्योग समुहाचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल यांनी केले. कृषी प्रदर्शनातून तंत्रज्ञान पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. तंत्रज्ञान विकसित, आत्मसात केले नाही तर शेती तोट्याची होवू शकते, असा सल्ला निर्मल सिडसचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांनी दिला.
यांचा झाला सन्मान
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी देखील शेती, दुग्धव्यवसाय, जल यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात गणेश गोविंद पाटील, देवराम धनगर पाटील, अमृत बाबुराव पवार, विनय अरविंद बोरसे, मोन्या हाण्या मावची, भानुदास भाऊराव पाटील यांना ॲग्रोवर्ल्ड कृषी ऋषी, सुवर्णा आणि प्रफुल्ल देसले, प्रवीण शिवाजीराव शेलार, उज्वल दिनेश पाटील, चेतन शंकर पाटील, रंजनाबेन अंबालाल पाटील, वंदना पाटील, कल्पना मोहिते, सारिका पाटील यांना ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला शेतकरी, ज्योती पावरा, निता खत्री, मंजुळा पाटील, निलेश्वरी चौधरी यांना ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला उद्योजिका, प्रमिला पाटील, डॉ. हिरालाल पाटील, राजेंद्र दहातोंडे, सावित्रीबाई महिला बचत गट, राधाकृष्ण बचत गट, नागेश्वरी शेतकरी गट गणेश हायटेक नर्सरी तर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलक्रांती करणाऱ्या कोळपांढरी, मानमोड्या आणि काथरदे खुर्द या गावांना ॲग्रोवर्ल्ड जलगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञान, यंत्र, नवनवीन वाणांची रोपे, मजुरीला पर्याय असणारी पिके, यंत्र, पिकांवर फवारणीसाठीचा ड्रोन, झटका मशीन, पपईची रोपे, विविध पिकांसाठीचे ब्लोअर हे शेतकऱ्यांचे प्रमुख आकर्षण ठरले.
ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर वंदना कोर्टीकर यांनी सूत्रसंचालन केले. जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, निर्मल सिड्स, ओम गायत्री नर्सरी, सिका ई- मोटर्स हे सहप्रायोजक आहेत.