उन्हाळी भुईमूग उत्पादनाची सुत्रे
भुईमूग हे राज्यातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. पोषणमुल्याच्या दृष्टीने विचार केल्यास त्यामध्ये अंड्यापेक्षा 2.5 पट जास्त प्रथिने असतात. मागील काही वर्षापासून त्याचा उपयोग हा तेलापेक्षा मिठाई, बेकरी, खारेदाणे इ. पदार्थ तयार करण्यास होत आहे. तसेच मागील 10 ते 15 वर्षाचा अभ्यास केल्यास महाराष्ट्रातील ह्या पिकाच्या क्षेत्रात घट होत आहे. उन्हाळी हवामानात स्वच्छ सुर्यप्रकाश तसेच किडी व रोगाचा कमी प्रादुर्भाव ह्यामुळे हे पीक लागवड करणे फायदेशीर व सुलभ जाते. तेव्हा या गरीबाच्या काजुचे उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन घेण्याकरिता, काही महत्वाच्या सुत्राविषयी जाणून घेऊ या. 1. योग्य जमिनीची निवड :- भुईमूग पिकाला मध्यम ते हलकी परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने हवा व पाणी यांचे योग्य प्रमाणात संतुलन राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मुळाची चांगली वाढ होऊन आ-या सुलभ रितीने जमिनित जाण्यास तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी मदत होते. 2. वेळेवर पेरणी :- भुईमूग हे पीक उष्ण व समीशोतोष्ण कटिबंधात येत असल्याने या पिकास साधारणत: 27 ते 300 से. तापमान आवश्यक असते. चांगली उगवण व भरपुर फुले येण्यासाठी 24 ते 280 सेल्सिअस तर भरपुर आ-यासाठी 19 ते 230 सेल्सिअस तापमान योग्य असते. त्याकरिता उन्हाळी भुईमूगाची पेरणी हिवाळ्यातील थंडी कमी होत असतांना साधारणत: जानेवारीच्या दुस-या पंधरवड्यात करावी. लवकर पेरणी केल्यास कमी तापमानामुळे चांगली उगवण होत नाही. उशीरा झाल्यास उन्हाने फुलगळ होऊन आ-यांची संख्या कमी होते आणि शेंगा चांगल्या पोसल्या जात नाही. पीक पाऊसात सापडते परिणामत: उत्पादनात घट होते म्हणून योग्य वेळी पेरणी करणे फार महत्वाचे आहे. ...