नेहा बाविस्कर
मिरची हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि मूल्यवान पीक आहे. विविध प्रकारच्या लोणचे, भाज्या, मसाले, सॉस आणि चटणी यामध्ये मिरचीचा महत्त्वाचा रोल असतो. महाराष्ट्र हे मिरची उत्पादनातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे, आणि येथे विविध प्रकारांच्या मिरच्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. महाराष्ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र आहे. मिरचीचे पीक सर्वाधिक धुळे, जळगाव, नंदुरबार, नागपूर, अमरावती, पुणे, चंद्रपूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी घेतले जाते. भारतातील प्रमुख मिरची उत्पादक राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका, ओडिसा, तमिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश होतो.
जमीन
मिरची विविध प्रकारच्या जमिनीत उगवू शकते, जसे की वाळूमिश्रित मातीपासून जड मातीपर्यंत. मात्र, मिरचीसाठी सर्वोत्तम माती ती आहे जी चांगल्या प्रकारे निचरा होणारी, हलकी, सुपीक आणि ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असलेली असावी. हलक्या जमिनीत जड मातीपेक्षा चांगल्या दर्जाची फळे मिळतात. मिरची पिकासाठी 6 ते 7 pH स्तर असलेली जमीन आदर्श मानली जाते. पावसावर आधारित लागवडीसाठी काळी माती उपयुक्त ठरते कारण ती ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता ठेवते. तसेच, सिंचनासाठी डेल्टाईक माती आणि वाळूमिश्रित मातीसारख्या चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनी अधिक योग्य मानल्या जातात.
कालावधी व हवामान
उन्हाळी मिरचीची लागवड मुख्यतः जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते, कारण या काळात हवामान उबदार असते आणि मिरची पिकासाठी अत्यंत योग्य असतो. मिरचीच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी 25°C ते 35°C या दरम्यानचे तापमान अनुकूल मानले जाते. उन्हाळ्याच्या हंगामात चांगल्या निचऱ्याची क्षमता असलेल्या जमिनीत मिरचीचे उत्पादन उत्तम होते. या कालावधीत लागवडीच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात आर्द्रता आवश्यक असते, परंतु जास्त ओलसरपणा किंवा सतत पाणी साचल्यास झाडांच्या मुळांना हानी पोहोचू शकते.
उत्तम जाती
पुसा ज्वाला, पंत सी – १, संकेश्वरी ३२, मुसाळवाडी याशिवाय अग्निरेखा, फुले सई, फुले ज्योती, आणि जी-4 या जाती अत्यंत उपयुक्त मानल्या जातात. हेक्टरी १ ते दीड किलो बियाणे वापरावे.
खते वापरण्याचे मार्गदर्शन
१. पूर्वमशागत खते:
शेणखत : 10-12 टन प्रति हेक्टर वापरावे.
सेंद्रिय खते : कंपोस्ट/गांडुळखत 2-3 टन प्रति हेक्टर वापरावे.
२. रासायनिक खते:
लागवडीनंतर:
नायट्रोजन : 50 किलो/हेक्टर
फॉस्फरस : 25 किलो/हेक्टर
पोटॅशियम : 25 किलो/हेक्टर
वाढीच्या टप्प्यावर : 15-20 दिवसांच्या अंतराने नायट्रोजन खत द्यावे.
३. फवारणीसाठी:
युरिया (1-2%) किंवा झिंक सल्फेट (0.5%) फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन :
उन्हाळ्यात पिकांना दररोज 5-7 मिमी पाण्याचा पुरवठा आवश्यक असतो. उन्हाळ्यात पाण्याची गरज जास्त असते. त्यावर ठिबक सिंचन हा एक उत्तम उपाय आहे. तसेच जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक किंवा सेंद्रिय मल्चिंगचा वापर करावा. पाणी साठवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करावा.
रोग व कीड नियंत्रण
मिरची मर रोग :
हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.
उपाय : या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा धानुका कंपनीचे धनुका एम 45, डायथेन एम 45 यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.
भुरी रोग :
भूरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.
उपाय : भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 10 लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या पिकावर 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
फूलकिडे :
हेक्टरी किटक आकाराने अतिशय लहान म्हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हेक्टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्या अंतराने 8 मिलीमिटर टाटा कंपनीचे माणिक, ॲसेटामाप्रिड 20% एस.पी. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मावा :
हेक्टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्यामुळे नविन पालवी येणे बंद होते.
उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली सिंजेंटा कंपनीचे एकालक्स, क्विनोलफॉस 25 ई. सी. टक्के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी व उत्पादन
हिरव्या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडीच महिन्यांनी सुरु होते.
पूर्ण वाढलेल्या व सालीवर चमक असलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह १० दिवसांच्या अंतराने करावी.
साधारपणपणे हिरव्या मिरच्यांची तोडणी सुरु झाल्यानंतर ३ महिने तोंडे सुरू राहातात.
अशा प्रकारे ८ ते १० तोडे सहज होतात. वाळलेल्या मिरच्यांसाठी त्या पूर्ण पिकून लाल झाल्यावरच त्यांची तोडणी करावी.
जातीपरत्वे (बागायती) हिरव्या मिरच्यांचे हेक्टरी ८० ते १०० क्विंटल उत्पादन मिळते.
वाळलेल्या लाल मिरच्यांचे उत्पादन ९ ते १० क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्पादन ६ ते ७ क्विंटल
![](https://i0.wp.com/eagroworld.in/wp-content/uploads/2024/03/Agroworld-Artwork_page-0001.jpg?resize=737%2C1024&ssl=1)