स्टोरी आऊटलाईन…
- पाच शेळ्यांपासून सुरु केलेले 50 शेळ्यांवर पाहचले.
- कुर्बानीच्या बोकडांच्या स्वतंत्र संगोपनातून मिळतो घसघसीत नफा.
- सोयाबीनच्या खुराकामुळे शेळ्या-बोकडांची खुलते अंगकांती.
अकरा वर्षे रायगड जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून नोकरी करता करता आठवड्यातून एकदा गावाकडे फेरी मारुन श्यामसुंदर पाटील शेती करायचे. शेतीचा हा लळाच त्यांना शेळीपालनाकडे आकर्षित करायला कारणीभूत ठरला. सध्या पंन्नास शेळ्यांचा कळप त्यांच्याकडे असून खर्चवजा जाता वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळत आहे. ईदच्या कुर्बानीच्या बोकडांची करून देखील त्यांना अधिकचा नफा मिळतो.
वाकटुकी (ता. धरणगाव, जि. जळगाव) हे श्यामसुंदर पाटील यांचे गाव. बारावीनंतर त्यांनी कृषी पदविका संपादन केली. यानंतर एका पेस्टिसाईड कंपनीत मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून नोकरी देखील केली. त्यानंतर जळगाव तालुक्यातील डिकसाई येथील कृषी विद्यालयात 5 वर्षे बीनपगारी नोकरी केली. वर्ष 2003 पर्यंत रोजगारासाठी धडपड सुरू होती. यानंतर सोनवद परिसरात 50 एकर शेती भाडेतत्वावर करायला घेतली. कापूस, तीळ, ज्वारी ह्या पिकांपासून खर्च वजा जाता 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली. अशातच वर्ष 2005 मध्ये ग्रामसेवक म्हणून त्यांची निवझ झाली. यामुळे भाडेतत्वावरची शेती त्यांनी सोडली. रायगड जिल्ह्यात त्यांना ही नोकरी करावी लागली. नोकरी करत असताना शनिवार-रविवारी गावी येऊन ते शेती देखील करु लागले. त्यांच्याकडे वडिलोपार्जित अडीच एकर शेती होती. यानंतर त्यांनी शेती खरेदी केली आणि 15 एकर झाली. या कालखंडात वर्ष 2013 मध्ये 6 एकर डाळिंबाची लागवड केली. एक ीकडे शेती विकसित करणे सुरू असतांनाच त्यांनी शेळीपालनाला सुरुवात केली. नोकरी करताना शेतीसाठी आठवड्यातून गावाकडे येणेजाणे त्रासदायक ठरू लागले. बदली करून गावाकडे परतण्याची त्यांची मनिषा 2016 साली पूर्ण झाली. अकरा वर्षांनंतर रायगड जिल्ह्यातून सरळ जळगाव जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांना शेतीसोबतच शेळीपालनाकडे अधिक लक्ष देता येऊ लागले आहे.
पाच शेळ्यांपासून सुरवात
शेतीला जोड व्हावी म्हणून शेळीपालन करायचे श्यामसुंदर पाटील यांनी ठरवले. वर्ष 2012 सालीच त्यांनी धरणगावच्या आठवडे बाजारातून 5 गाभण शेळ्या व 1 बोकडाची खरेदी केली. वर्षातून दोन वेतांमुळे शेळ्यांची संख्या वाढत गेली. बोकड विकायचे आणि मादी करडांचे पालन करायचे हे धोरण ठेवले. दरवर्षी आता ते 45 ते 55 बोकडांची विक्री करतात. त्यातून त्यांना खर्च वजा जाता सुमारे अडीच ते तीन लाख रुपये नफा राहतो.
कुर्बानीच्या बोकडांचे संगोपन
पाटील यांनी शेळीपालनाचे दोन भाग केले आहेत. त्यासाठी दोन वेगवेगळे गोठे तयार केले आहेत. कुर्बानीच्या बोकडांसाठी वेगळा व इतर शेळ्या, लहान करडे व बोकडांसाठी वेगळा असे गोठे आहेत. दरवर्षी 2 ते 3 महिने वयाचे लहान बोकड ते बाजारातून खरेदी करतात. वर्षभर संगोपन करुन ते 14 ते 16 महिने वयाचे बोकड बकरी ईदला विकतात. त्यात त्यांना खर्च वजा जाता दुप्पट नफा होतो. 2 ते 3 महिन्याचा लहान बोकड दोन ते अडीच हजारात खरेदी करतात. वर्षभरच्या संगोपनासाठी अडीच हजार रुपये खर्च येतो. वर्षभरानंतर हा बोकड किमान 10 ते 15 हजार रुपये किंमतीला विकला जातो. त्यापासून त्यांना सुमारे अडीच लाख रुपये उत्पन्न मिळते.
बोकडांचे खच्चीकरण
बाजारातून खरेदी केलेल्या दोन अडीच महिन्याच्या व सात ते आठ किलो वजनाच्या बोकडाचे पशुवैद्यकाकडून काळजीपूर्वक खच्चीकरण केले जाते. खच्चीकरणात बोकडाच्या इंद्रियाला जखम होणार नाही याची काळजी घेतली जाते. खच्चीकरण दोन ते अडीच महिन्याच्या बोकडाचे केले पाहिजे. अधिक वयाच्या बोकडाचे खच्चीकरण आरोग्याला घातक सिद्ध होते. या बोकडांचे 12 ते 14 महिन्यांच्या संगोपनानंतर सुमारे 35 ते 45 किलो वजन होते. वजनानुसार बोकडाला किंमत मिळते.
देखण्या बोकडांना मागणी
शेळीपालन करतांना सुरुवातीपासूनच श्यामसुंदर पाटील यांनी कुर्बानीचे बोकडपालन करण्याचा निर्णय घेतला होता. ईदच्या कालखंडात अशा बोकडांना चांगली किंमत मिळत असल्याने फायदा निश्चित असतो. बोकड देखणा, चमक असलेला असावा. दाढी असलेल्या बोकडाला अधिक मागणी असते. तसेच जुळे, एकसमान रंगाच्या जोडीला किंमत जास्त मिळते. तोंडावर अगर शरीराच्या कोणत्याही भागावर चंद्रासारखी खूण असेल तर त्या बोकडाला अधिक मागणी असते. यावर्षी त्यांनी 46 बोकडांचे संगोपन केले होते. एप्रिल महिन्यातच त्यांच्या 35 बोकडांना घरबसल्या मागणी झाल्याने व ईदच्या काळात मिळतो तो दर त्यांना मिळाल्याने तेव्हाच त्यांनी ते विकले. सरासरी एका बोकडापासून 10 हजार रुपये त्यांना मिळाले.
खाद्य, आरोग्य व्यवस्थापन
कुर्बानीचे बोकड व इतर शेळ्यांचे गोठे वेगवेगळे असले तरी त्यांना रानात चराईसाठी एकत्र सोडले जाते. पावसाळ्यात मात्र कुर्बानीचे बोकड रानात सोडले जात नाहीत. त्यांना गोठ्यातच संपूर्ण आहार दिला जातो. कोरड्या चार्यात हरभरा, सोयबीन, भुईमुगाची काड, तूर, मूग, उडिदाच्या शेंगांची टरफले खाऊ घातली जातात.
पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी टब ठेवण्यात आले आहेत. शेळ्यांना सर्व हंगामात स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. पीपीआर व घटसर्प (फुफ्फुसदाह) हे शेळ्यांमध्ये येणारे गंभीर आजार. आरोग्यबाबत पाटील म्हणाले की, एकदा माझ्या काही शेळ्या आजारी पडल्या व उपचार करुनही मरण पावल्या. रोग कोणता हे स्थानिक वैद्यकीय अधिकार्यांना उमजले नाही. त्यावेळी सेवानिृत्त पशूशंवर्धन उपसंचालक (धुळे) डॉ. के.आर. पाटील यांनी योग्य निदान करून हा फुफ्फुसदाह म्हणजे घटसर्प असल्याचे संगितले. त्यानुसार उपचार केल्याने शेळ्या बचावल्या. या सर्व आजारांवर आता लस उपलब्ध असल्याने आता अल्पदरात लसीकरण केले जाते. त्यामुळे हे आजार येतच नाहीत. तरीही काही शेळ्या आजाराला बळी पडल्यास तात्क ाळ पंचायत समितीच्या पशुवैद्यकांकडून उपचार करण्यात येतात. योग्य काळजी घेतल्यास, योग्यवेळी लसीकरण करुन घेतल्यास शेळ्यांचा मृत्यूदर अत्यल्प म्हणजे फक्त 5 टक्के असतो.
शेळ्या, बोकडांची निगा
शेळ्यांच्या कांतीला चकाकी असेल, शेळ्या सुदृढ असतील तर व्यापारी घरबसल्या चांगल्या दराने शेळ्या खरेदी करायला येतात. त्यासाठी देखभाल व खुराक महत्वाचा असतो. श्यामसुंदर पाटील आपल्या शेळ्यांना महिन्यातून एकदा धुऊन काढतात. चमकदार कांतीसाठी सोयाबीन खाऊ घालतात. संपूर्ण वर्षभर पुरेल इतका मका ते भरुन ठेवतात. दररोज सुमारे शंभर ते दोनशे ग्रॅम प्रति शेळ्यांना ते हा मका खाऊ घालतात. गोठ्यांमध्ये गोचीड व उवानिर्मुलनासाठी ‘टाटा सेंट्री’ ह्या पावडरची पाण्यात मिसळून फवारणी उपयुक्त ठरते. ज्या मोकळ्या आवारात शेळ्या असतात तेथेही फवारणी करण्यात येते. आठवड्यातून एकदा शेळ्या गोठ्यात नसतांना ही फवारणी होते.
पंन्नास शेळ्यांसाठी खर्चाचा ताळेबंद
चराई मजुराचे वार्षिक वेतन ः 60 हजार रु.
खुराक (मका 10 पोते): 14 हजार रु.
सोयाबीन 1 पोते ः 4 हजार रु.
कोरडा चारा ः 6 हजार रु.
लसीकरण व इतर उपचार ः 5 हजार रु.
इतर खर्च ः 5 हजार रु.
एकूण खर्च ः 98 हजार रु.
एकूण उत्पन्न ः 50 शेळ्यांपासून 4 लाख रु.
खर्च वजा जाता निव्वळ नफा ः 3 लाख रु.
कुर्बानीच्या बोकडांचा खर्चाचा ताळेबंद
2 महिन्याचे 40 बोकड
खरेदी ः 1 लाख रु.
संगोपन खर्च ः 1 लाख रु.
विक्री प्रतिबोकड सरासरी ः 12 हजार रु.
एकूण : 4 लाख 80 हजार रु.
खर्च वजा जाता उत्पन्न ः 2 लाख 80 हजार रु.
प्रतिक्रिया:
घटसर्प टाळण्यासाठी उपयायोजना करा
घटसर्प हा शेळ्यांवर येणार अतिशय घातक आजार. पावसाळ्याच्या सुवातीला दमट हवामानामुळे ह्या आजाराची लागण होते. या आजाराचे रोगजंतू घाणीमध्ये वाढतात. ’पाश्चुरेला मल्टिसोडा’ या जिवाणुमुळे हा आजार होतो. जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली म्हणजे या आजाराची लागण होते. झडीच्या दिवसात हा आजार मोठ्याप्रमाणात याला घटसर्प म्हणजेच फुफ्फु सदाह म्हणतात. यात फुफ्फुस बाधीत होऊन जनावराला श्वास घेणे अशक्य होते व योग्य उपचार न झाल्यास ते 24 तासाच दागवते. जनावरांना भयंकर ताप येतो, थंडीवाजून थरथर होते. तों डातून लाळ गळते, नाकातून चिकट स्त्राव पडतो, गळ्याला सुज येऊन श्वास घ्यायला त्रास होऊन गळ्यातून घर घर असा आवाज येतो. अशी जनावरे कळपातून वेगळे करावीत. गळ्याला निल गिरी मिक्ससारखे श्वास मोकळा होण्यासाठीचे औषध लावावे. अज्ञानापोटी लोक धुराची धुनी देतात. कार्बन डायऑक्साइडमुळे उलट त्रास वाढतो. व्हेसेडीन 20 ते 30 मि.ली. नसेतून द्यावे. तसेच डेक्सोना 5 ते 7 मि.ली. नसेतून द्यावे. इन्टासेफ एक ते दीड ग्रॅम मांसल भागात इंजेक्शन द्यावे. प्रतिबंधात्मक इलाज म्हणून दरवर्षी घटसर्प लस जून-जुलै महिन्यात कातडीखाली टोचून घ्यावी.
-डॉ. के.आर.पाटील,
सेवानिवृत्त जिल्हा उपसंचालक पशू संवर्धन विभाग,
मो.नं. 9422283188
अर्धबंदिस्त शेळीपालनाचा चांगला अनुभव
कमी जागेत व स्वतःची शेती नसली तरीही शेळीपालनाचा व्यवसाय करता येतो. शेळ्यांना फारसे आजार होत नसल्याने खर्च कमी लागतो. चराईसाठी एक माणूस पुरेसा असतो. मात्र दिवसातून किमान दोनदा आपण स्वतः शेळ्यांची पाहणी केली पाहिजे. प्रशिक्षण घेऊन स्थानिक किंवा सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही 50 शेळ्यांचे संगोपन केल्यास खर्च वजा जाता दोन ते अडीच लाख रुपये वार्षिक नफा मिळू शकतो. लेंडीखताचे अतिरिक्त उत्पन्न देखील मिळते. मी नोकरी आणि शेती व हा व्यवसाय सांभाळतो. अर्धबंदिस्त शेळीपालनाचा माझा अनुभव चांगला आहे.
- शामसुंदर पाटील,
रा. वाकटुकी, ता. धरणगाव, जि. जळगाव.
मो.नं. 7719955135