पुण्याच्या दौंड तालुक्यातील एका शेतकरी जोडप्याने जांभळ्या वांग्यांच्या लागवडीतून लाखोंची कमाई केली आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत भाजीपाला पिकांतून चांगला नफा मिळवणाऱ्या या जोडप्याने एकरभर जांभळ्या वांग्यांच्या लागवडीसाठी २ लाख रुपये खर्च केले. त्यांना ५० टन उत्पादनाची अपेक्षा आहे. त्याचसोबत, शहरातील हॉटेल्समध्ये देखील ते आपल्या शेतातील ताज्या वांग्यांची पुरवठा करतात. शेतीत नवीन प्रयोग, योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या सहकार्याने यश मिळवता येते, हे जगताप कुटुंबाच्या यशाने सिद्ध केले आहे.
दौंड तालुक्यातील प्रशांत आणि प्रिया जगताप हे एक प्रेरणादायी शेतकरी जोडपे आहेत. त्यांनी आपल्या एक एकर जमिनीवर जांभळ्या वांग्याची लागवड करून एक नवा प्रयोग सुरू केला आहे. शहरातील हॉटेल्समध्ये प्रचंड मागणी असलेल्या या वांग्याची किंमत बाजारात १५ ते २५ रुपये प्रति किलो दराने आहे. इतर वांग्यांच्या तुलनेत त्याची चव वेगळी असल्यामुळे, त्याची मागणी सातत्याने वाढत आहे.
प्रशांत आणि प्रिया जगताप यांनी त्यांच्या शेतीत २ लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यांना ५० टन उत्पादनाची अपेक्षा आहे. सध्याच्या बाजारभावानुसार, त्यांना आठ लाख रुपयांचा नफा मिळवता येईल. दौंड तालुका ऊस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, मात्र जगताप कुटुंबाने भाजीपाला शेतीतही आपला ठसा उमठवला आहे. त्यांच्या १९ एकर शेतात त्यांनी उसासोबत पालेभाज्या आणि फळांच्या बागा देखील लावल्या आहेत. यापूर्वी, त्यांनी नारायणगाव येथे ३,२०० जांभळ्या वांग्याच्या रोपांची विक्री ७ रुपये प्रति रोप दराने केली होती. योग्य व्यवस्थापन आणि सिंचनाच्या उत्तम व्यवस्थेने, या शेतकरी जोडप्याला चांगला नफा मिळवता आला आहे.
दर तीन दिवसांनी सरासरी १.५ ते २ टन उत्पादन निघते
१ डिसेंबरपासून वांग्याची कापणी सुरू झाली आणि दर तीन दिवसांनी सरासरी १.५ ते २ टन उत्पादन मिळत आहे. आतापर्यंत १० कापण्या पूर्ण झाल्या असून, उत्पादन पुण्याच्या गुलटेकडी आणि वाशी बाजारपेठांमध्ये पाठवले जात आहे. प्रत्येक वांग्याचे वजन ३०० ते ४०० ग्रॅम असते. वांग्याच्या शेतीतून लाखोंचा नफा मिळवणारे जगताप कुटुंब हे नक्कीच भविष्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.