उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. अरबी समुद्रात निर्माण होत असलेले तेज चक्रीवादळ महाराष्ट्र किंवा गुजरातला धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे वादळ फारसे शक्तिशाली नसल्याने विध्वंसाची फारशी भीती नाही. मात्र, त्यामुळे पावसाचे दिवस येऊ शकतात. आधीच्या अनुमानानुसार, हे वादळ ओमानकडे जाण्याची शक्यता आता कमी दिसत आहे. ते हळूहळू ट्रॅक बदलण्याची शक्यता आहे. सध्या तरी मुंबईपासून केरळ किनारपट्टीपर्यंत पावसाचे क्षेत्र दिसत आहे.
सुरुवातीला हे चक्रीवादळ ओमानच्या आखाताच्या दिशेने जाण्याचा अंदाज होता. मात्र, आता हवामान अभ्यासकांची सिनोप्टिक परिस्थिती त्याचे समर्थन करत नाही. उत्तर-पूर्व चक्रीय प्रवासानंतर वादळ हळूहळू ट्रॅक बदलेल. यापूर्वीच्या बिपरजॉय चक्रीवादळाच्या अगदी विपरीत तेज वादळाची चक्रीय गती दिसत आहे. आधी उत्तर-पश्र्चिम चक्रीय हालचाल आणि आता पुन्हा उत्तर-पूर्व हालचाल दिसत आहे. त्यामुळे वादळाचा रोख मुंबई-गुजरातकडे वळून तिकडे मार्गक्रमण सुरू होऊ शकते.
या बातमीतील वादळाच्या आगामी मार्गक्रमणाच्या संभाव्य स्थितीचा वेध घेणारे छायाचित्र पाहा. त्यात 3 शक्यता दिसत आहेत. त्यात दोन शक्यता गुजरात किंवा मुंबई-कोंकण किनारपट्टीकडे वादळ येण्याचे सूचित करतात. तिसरी शक्यता गुजरातच्या लगत पाकिस्तानात वादळ धडकू शकते. वादळ गुजरातकडे वाटचाल करण्याची शक्यता सर्वाधिक, 45% सध्या तरी दिसत आहे.
गुजरात आणि महाराष्ट्राने पुढील आठवडाभर याकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कमी दाबाचा पट्टा (LPA) निर्माण झाल्यावर तपशीलवार ट्रॅक आणि तीव्रतेचा अंदाज लवकर येऊ शकेल. सोबतच्या व्हिडिओमध्येही वादळाची सध्याची चक्रीय गती आणि संभाव्य वाटचाल दाखविण्यात आली आहे.
चक्रीवादळाचा मार्ग 36-48 तासांनी उत्तर-पश्चिम फिरल्यानंतर पूर्वोत्तर दिशेकडे परत येईल. नेमके काय घडू शकते हे आत्ताच सांगता येणार नाही, कारण ते पुढील परिस्थितींवर अवलंबून असेल – 1. चक्रीवादळ तेजची तीव्रता, 2. उष्ण कटिबंधाजवळ जेट स्ट्रीमची उपस्थिती.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- राज्यात पुन्हा पावसाचे दिवस; अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीने येत्या काही दिवसांत थंड वारे वाहण्याची शक्यता
- राज्यातील ‘या’ भागात रविवारी, सोमवारी पडणार पाऊस; उकाडा झालाय कमी