मुंबई : Dragon Fruit Sheti… शेतीतून चांगले उत्पन्न यावे, यासाठी शेतकरी अनेक नवनवीन शक्कल लढवत असतात. या प्रयत्नातून ते कधी अपयशी ठरतात, तर कधी यशस्वी देखील होत असतात. अशाच एका यशस्वी शेतातील प्रयोगाची घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेने स्ट्रॉबेरी (strawberry) आणि ड्रॅगन फ्रूटची (dragon fruit) लागवड करून लाखोंची कमाई केली आहे.
मिर्झापूर येथील रहिवासी असलेल्या वंदना सिंग या ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची लागवड करून भरपूर नफा कमावत आहेत. वंदना सिंग यांच्या० म्हणण्यानुसार, त्यांनी गुगल आणि यूट्यूबच्या मदतीने शेतीचे गुण शिकले. त्या स्वावलंबी झाल्या नाहीतर इतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणा स्रोत बनल्या आहेत.
किती नफा कमवला?
वंदना सिंग यांनी अर्ध्या एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. यावर्षी त्यांना 5 लाखांचा नफा झाला आहे. याशिवाय स्ट्रॉबेरीच्या शेतीत हात आजमावून त्या चांगला नफा मिळत आहे. ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीच्या लागवडीत पहिल्या-दुसऱ्या वर्षी कमी नफा मिळतो. मात्र तिसऱ्या वर्षी हा नफा अनेक पटींनी वाढतो, असे वंदना सिंग सांगतात. त्या ड्रॅगन फ्रूटची रोपटी 50 रुपयांना विकतात. याशिवाय त्यांची फळे 400 रुपये किलो दराने विकली जातात.
शेतीची कल्पना कुठून आली?
शेतकरी वंदना सिंह सांगतात की, ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याची कल्पना त्यांना यूट्यूबवरून सुचली. चुलीच्या चौकातून स्वतंत्रपणे शेती करूनही महिला आता स्वावलंबी होऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. यूट्यूबच्या माध्यमातून मिळालेली माहिती आणि कृषी विभागाच्या मदतीने ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करणं शक्य झालं आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती महिलांसाठी उत्तम आहे, कारण घर सांभाळत महिला काही काळ शेतात काम करुन चांगले पैसे कमवू शकतात.
ड्रॅगन फ्रूट शेतीच्या माध्यमातून दुप्पट नाही तर चौपट उत्पन्न मिळवलं जाते. वंदना सिंह यांना ड्रॅगन फ्रूट लागवडीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. आता अतिरिक्त उत्पन्नासाठी वंदना सिंह या हळद लागवडीकडे वळल्या आहेत. त्या आपल्या परिसरातील महिलांसाठी तसेच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. जिद्द असेल तर कोणत्याही कामात यश मिळू शकते याचा पुरावा वंदना सिंग यांची मेहनत आहे.