जळगाव : गुजरात मोरबी येथील सरदार अॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 628 शेतकर्यांचे 997.20 हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्यामुळे या कंपनीचा राज्य परवाना निलंबित करण्यात आला आहे. या सोबत जिल्ह्यातील एक घाऊक व 4 किरकोळ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विक्रेत्यांकडे असलेल्या 451 टन खत साठा विक्रीस बंदी घालण्यात आली असल्याची माहिती नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली आहे.
सरदार अॅग्रो फर्टिलायझर कंपनीचे जबाबदार व्यक्ती व संबधीत 4 खत विक्रेत्यांवर जामनेर पोलीस स्टेशन येथे कृषी विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बोगस खतामुळे बाधित झालेल्या शेतांचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून त्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येत आहे.
सरदार अॅग्रो फर्टिलायझर्सचा राज्य परवाना निलंबित
गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत जिल्हाभरात 29 नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले असून त्यापैकी 9 नमुने तपासणीत अप्रमाणित आढळून आले आहेत. अप्रमाणित खत व बियाणे विक्रीतून मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे नुकसान देखील सहन करावे लागत असते. दरम्यान कृषी विभागाने फसवणुकीचे प्रकार घडू नये म्हणून विशेष लक्ष ठेवले असून, शेतकर्यांची फसवणूक केल्यास कृषी केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.
या क्रमांकावर द्या माहिती
खरीप हंगाम 2023 मध्ये जिल्ह्यातील शेतकर्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे. जिल्हयात विनापरवाना निविष्ठांची विक्री कोणी करत असेल तर कृषी विभागाच्या भ्रमणध्वनी क्रमांक 9822446655 व दुरध्वनी क्र. 0257-2239054 वर माहिती द्यावी. बनावट बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची विक्री तथा जादा दराने कृषी निविष्ठांची विक्री करीत असल्यास किंवा कोणत्याही विक्रेत्याने शेतकर्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास अशांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा ही श्री. वाघ यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील 17 गावे बाधित
जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर शेतकर्यांनी कापूस, सोयाबीन लागवडीला सुरुवात केली होती. पिकांच्या वाढीसाठी जिल्ह्यातील काही शेतकर्यांनी सरदार अॅग्रो फर्टिलायझर प्रा. लि.च्या सिंगल सुपर फॉस्फेट खताचा उपयोग केला. मात्र, या खताच्या वापरामुळे शेतकर्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. यात जामनेर जिल्ह्यातील भादरखेडे, कुंभारी बु., तोंडापूर, मोयखेडा दिगर, तोरनाळे, ढालशिंगी यासह 17 गावांतील 997.20 हेक्टर बाधीत झाले आहे.
284 शेतकर्यांच्या तक्रारी
सिंगल सुपर फॉस्फेटच्या वापरानंतर पिकांची पाने गोळा होणे, लांबट होणे, पिकाची वाढ खुंटणे असे दुष्परिणाम दिसून लागल्याने तोंडापूर, मोयखेडा दिगर, तोरनाळे यासह इतर 17 गावातील सुमारे 284 शेतकर्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकार्यांनी बाधित शेतींची पाहणी करुन पंचनामे केले व नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
रसायनांचे प्रमाण कमी-जास्त
नाशिक येथील खत नियंत्रण प्रयोगशाळेचा प्रथम दर्शनी तपासणी अहवाल जळगाव कृषी विभागाला प्राप्त झाला असून या अहवालात सिंगल सुपर फॉस्फेट खतामध्ये रसायनांचे प्रमाण कमी-जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आल्याचे नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, हैद्राबाद येथील एनआयपीएचएम या प्रयोगशाळेचा अहवाल येणे बाकी असल्याचे जळगाव कृषी विभागाचे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक विलास बोरसे यांनी सांगितले.
विक्री बंद करण्याचे आदेश
सिंगल सुपर फॉस्फेट या खताचे जिल्ह्यातील एकूण 22 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील शिल्लक 451.00 मेट्रिक टन खत साठ्यास विक्रीबंद आदेश देण्यात आले आहेत.