जळगाव : धुळ्यात कृषीमाल निर्यातीवर अशा प्रकारची ही पहिलीच कार्यशाळा होत असली तरी यापुढे अशा प्रकारच्या कार्यशाळा सातत्याने घेतल्या जातील. तसेच शेतकऱ्यांचा गट तयार करुन त्या गटामार्फत एकत्रितपणे विविध पिके थेट निर्यात कशी करता येतील, यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाईल. धुळ्यातील शेतकऱ्यांचा माल निर्यात व्हावा हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन आमदार कुणाल पाटील यांनी दिले. फिओ व अॅग्रोवर्ल्ड आयोजित धुळे येथील कृषी शेतमाल निर्यात संधी या कार्यशाळेप्रसंगी आ. कुणाल पाटील बोलत होते.
धुळे येथील कार्यशाळेत उद्घाटक म्हणून आ. कुणाल पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शांताराम मालपुरे, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे सहाय्यक संचालक अक्षय शहा, कनिष्ठ सहाय्यक संचालक निकेतन भोसले, अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण उपस्थित होते.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (फिओ) व अॅग्रोवर्ल्डच्यावतीने शेतमाल निर्यात संधी या विषयावर जळगाव (दि. ७ डिसेंबर, बुधवारी), धुळे (दि. ८ डिसेंबर, गुरुवारी) आणि शहादा (जि. नंदुरबार) (दि. ९ डिसेंबर, शुक्रवारी) येथे विनामूल्य एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत शेतकऱ्यांना शेतमाल निर्यात कसा करावा, आंतरराष्ट्रीय खरेदीदार कसा शोधावा यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
भारताचा निर्यातीतील वाटा वाढला पाहिजे – अभिजित पाटील
अमेरिकेत शेतकऱ्यांची संख्या अवघी दीड एकर शिल्लक राहिलेली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही तंत्रज्ञानाच्या जोरावर अमेरिकेतील शेती आर्थिकदृष्ट्या बळकट आहे. आपल्या शेतकऱ्यांनी देखील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम उत्पादनावर भर द्यावा. जेणेकरून निर्यात क्षेत्रातील भारताचा वाटा अधिक वाढेल व शेतकऱ्यांना देखील जास्त पैसा मिळू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांनी केले. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (फिओ) व अॅग्रोवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे 9 डिसेंबर रोजी शेतमाल निर्यात संधी कार्यशाळेच्या प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. शहादा येथील कार्यशाळेत जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, अॅड. सौ. संगीता पाटील, माजी तालुका कृषी अधिकारी जे. डी. पाटील, फिओचे सहाय्यक संचालक अक्षय शहा, अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जळगावातील कार्यशाळेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव येथील कार्यशाळेत आत्माचे उपसंचालक कुर्बान तडवी, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा महाव्यवस्थापक चेतन पाटील, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे सहाय्यक संचालक अक्षय शहा, कनिष्ठ सहाय्यक संचालक निकेतन भोसले, अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जळगावातील कार्यशाळेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेचा एकत्रित सार
या कार्यशाळेत प्रमुख वक्त्यांनी आंतरराष्ट्रीय आयातदार कसे शोधावे, बँक तसेच सरकारची भूमिका कोणत्या?, शेतमालाला कोणत्या देशात निर्यात केली जाऊ शकते, अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतमाल निर्यात संधी या कार्यशाळेत जिल्हाभरातून शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अॅग्रोवर्ल्डचे मार्केटींग हेड किरण पाटील, धुळे जिल्हा प्रतिनिधी भूषण वडनेरे, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी निलेश बोरसे यांनी परिश्रम घेतले.
शेतकर्यांना मिळाला आत्मविश्वास
कार्यशाळेच्या शेवटी वक्त्यांनी शेतकर्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे निरसन केले. आतापर्यंत अशा प्रकारच्या कार्यशाळा फक्त मुंबई, पुणे सारख्या शहरात होत होत्या, त्यामुळे धुळ्यासारख्या लहान शहर व जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल निर्यात करणे, आंतरराष्ट्रीय खरेदीदार कसा शोधावा यासारख्या बाबींपासून कोसोदूर होता. मात्र फिओ व अॅग्रोवर्ल्डने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे शेतकर्यांना हा विषय समजला आणि या कार्यशाळेत सहभागी झाल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढल्याचे शेतकर्यांनी यावेळी बोलतांना सांगितले