एखादी कल्पना सुचायला, त्यावर मेहनत करून यशाचा टप्पा गाठायला वय हे कुठेही अडसर ठरत नाही. पंजाबमधील पटियाला शहरापासून जवळच असलेल्या बहादूरगड गावच्या दोघा शाळकरी बहिणींनी ते दाखवून दिलेय. मन्नत आणि एकनूर मेहमी या दोघी बहिणींना डेंग्यू, कावीळमुळे आलेल्या आजारपणाच्या उपचारातून शेळीपालनाची कल्पना सुचली. त्यातून त्यांनी उभा केला एक यशस्वी डेअरी स्टार्ट-अप इंडिया गोट मिल्क फार्म ! आज त्यांचे शेळीचे दूध 400 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
हा शेळी (बकरी) फार्म चार वर्षांपूर्वी वैयक्तिक आरोग्य संकटानंतर सुरू झाला. त्याची स्टोरी रंजक आहे. मन्नतला कावीळ लागणचे निदान झाले. त्यावेळी शेजारच्या एका जाणकार वृद्धाने तिला काविळीतून लवकर, ठणठणीत बरे होण्याचा पारंपरिक घरगुती मार्ग सुचवला. तो होता शेळीचे दूध पिण्याचा. मन्नतचे वडील हरभजन सिंग यांनी त्यावेळी 20,000 रुपयांत शेळीच खरेदी केली. दोघी बहिणी वरचेवर वारंवार आजारी पडायच्या. त्यामुळे बाजारातून, बाहेरून शेळीचे दूध आणण्याऐवजी घरीच शेळी पाळायचा विचार त्यांनी केला. यातूनच सुरू झाला या किशोरवयीन बहिणींचा दुग्ध-व्यवसाय.

बहादूरगड हे गाव पटियाला शहरापासून फक्त 20 किमीवर आहे. याच छोट्या पण उत्साही शहरात, मन्नत आणि एकनूर मेहमी या दोन उत्साही आणि बहादूर किशोरवयीन बहिणींनी कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा व्यवसाय उभा केला आहे. सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना मन्नत म्हणते, “आम्ही तेव्हा खूप लहान होतो. आम्हाला नेहमीच पाळीव कुत्रा किंवा मांजर घरात हवी होती. ते काही मिळत नव्हते, म्हणून आम्हाला कमीत-कमी एक बकरी तरी मिळली, याबद्दल खूप उत्सुकता होती.”
वारंवार आजारी पडणे बंद झाले
पहिल्या बकरीने मादी पिलाला जन्म दिल्यानंतर आणि नवजात शेळीला त्याचे पहिले दूध पाजल्यानंतर, सिंग कुटुंबाने ते त्यांच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करण्यास सुरुवात केली. त्यांनी घरात दररोज शेळीचे दूध वापरण्यास सुरुवात केल्यानंतर, त्यांना चांगले परिणाम दिसले. मन्नत सांगते, “त्यानंतर आम्ही पूर्वीसारखे वारंवार आजारी पडलो नाही आणि थोडेफार किरकोळ आजारपण आले तरी त्यातून लवकर बरे झालो.” मन्नत, एकनूर यांच्याकडे मुख्यतः पांढऱ्या रंगाच्या सानेन जातीच्या शेळ्या आहेत. या जातीच्या शेळया जास्त आणि उच्च प्रतीचे दूध देणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. जातीचे वैशिष्ट्य आहे.

आधी समाजसेवा, नंतर व्यवसाय
मेहमी भगिनींच्या गुणकारी सानेन शेळी दुधाची ख्याती लवकरच परिसरात पसरली आणि लोक त्यांच्याकडे शेळीच्या दुधासाठी येऊ लागले. मन्नत सांगते, “आमच्या शेळ्यांबद्दल ऐकलेले कोणी दूध विकत घेण्यासाठी आले, तर सुरुवातीला आम्ही ते मोफतच द्यायचो, अनेकांना दिले.” नंतर बरीच माहिती मिळविली, व्हिडिओ पाहिले आणि बरेच संशोधन केले. शेळीच्या दुधाची वाढती मागणी ओळखल्यानंतर, त्यांनी त्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. आधीच एक लहान घरगुती व्यवसाय होता, त्याला मोठी क्षमता असलेल्या पूर्णतः व्यावसायिक स्वरूपात का बदलू नये? असा विचार या भगिनींनी केला.. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला निर्णायक वळण मिळाले. त्यांनी गावालगत असलेल्या त्यांच्या अर्धा बिघा पडीक जमिनीचा वापर नव्या व्यवसायासाठी करण्याचा निर्णय घेतला.
बहिणींना साथ आईची अन् आजीची
मन्नत मेहमी, एकनूर मेहमी, त्यांची आई रवींदर कौर आणि आजी ही सर्व लेडीज गँग आता कौटुंबिक शेळीपालन व्यवसाय सांभाळत आहेत. स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीच्या व्यवसायाचा आणि लेकीच्या यशाचा सासू-सुनेला आनंद अन् अभिमानही आहे. त्यांनी सुरुवातीला बांबूपासून बंदिस्त शेळीपालन रचना केली होती, पण हिवाळ्यात ती अकार्यक्षम ठरली. गोठ्याचे किमान तापमान कधीही 25 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यानच राहायला हवे, त्यापेक्षा कमी नको आणि जास्तही नको. सुरुवातीला त्यांना ते माहितच नव्हते, त्यामुळे दुर्दैवाने पहिल्या वर्षी त्यांच्याकडे शेळी मृत्यूदर जास्त होता. पण नंतर ते हळूहळू व्यवसाय शिकत आहेत आणि चुकांपासून शिकून, त्या सुधारून व्यवसाय वाढवत आहेत. त्यांनी आता अधिक टिकाऊ काँक्रीटची रचना बांधली आहे, जी शेळ्यांसाठी स्थिर वातावरण प्रदान करते.
स्वित्झर्लंडमधील सानेन शेळीचा फायदा
अनुभव वाढत असताना, मेहमी भगिनींना त्यांच्या व्यवसायात विशेष कौशल्य मिळवायचे होते. भारतीय संकरित जातीच्या शेळ्यांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी, त्यांनी स्वित्झर्लंडमधील सानेन शेळ्या निवडल्या, ज्या त्यांच्या उच्च दूध उत्पादनासाठी जगभरात ओळखल्या जातात. त्यांनी पाच सानेन शेळ्यांपासून सुरुवात केली, ज्या भारतात दुर्मिळ आहेत; आता त्यांच्याकडे त्यापैकी सुमारे 60 आहेत, इतर काही संकरित जातीच्या आणि काही शेळ्याही आहेत.
कमी किंमतीत विक्रीने होतोय फायदा
इंडिया गोट मिल्क फार्मच्या यशामागील एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांच्या उत्पादनांची किंमत. ते शेळीचे दूध फक्त 400 रुपये प्रति लिटर दराने विकतात, जे मोठ्या शहरांमधील किमतीपेक्षा खूपच कमी आहे. बकरीच्या दुधाची किंमत चंदीगडमध्ये 500 रुपये, बेंगळुरूमध्ये 600 रुपये आणि पुण्यात 900 रुपये. मेहमी बहिणींच्या आकर्षक किमतीने एक निष्ठावंत ग्राहक वर्ग आकर्षित केला आहे, विशेषतः डेंग्यूच्या हंगामात जेव्हा मागणी जास्त असते.

फ्युचर टायकॉन्स स्टार्टअप चॅलेंज विजेता
मन्नत आणि एकनूर यांनी फ्युचर टायकॉन्स स्टार्टअप चॅलेंज स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्यांच्या उद्योजकीय यशाचा आनंद संपूर्ण गावाने साजरा केला. ग्रामपंचायतीत त्यांचा पुरस्कार ठळकपणे प्रदर्शित केल्याचा मेहमी कुटुंबाला अभिमान आहे. मन्नत सांगते, “कलेक्टर ऑफिसच्या बाहेर, आमच्या समुदायात उत्तम काम करणाऱ्या लोकांना समर्पित प्रसिद्धीची एक भिंत आहे आणि त्या भिंतीवरही आमचा फोटो आहे. यापेक्षा आनंद काय असू शकतो?” शैक्षणिक जबाबदाऱ्या सांभाळून, मन्नत आणि एकनूर यांच्या डेअरी फार्मिंगमधील व्यावहारिक दृष्टिकोनामुळे, त्यांना त्यांच्या समुदायात व्यापक आणि योग्य ओळख मिळाली आहे. 2022 मध्ये पहिल्या फ्युचर टायकॉन्स स्टार्टअप चॅलेंजचे विजेते म्हणून त्यांना 51,000 रुपयांचे बक्षीसही मिळाले.
आई, रवींदर कौर मेहमी, यांना त्यांच्या मुलींचा खूप अभिमान आहे. त्या सांगतात, “माझ्या मुलींनी कोणताही संकोच न करता आणि इतक्या आत्मविश्वासाने हे काम केले याचा मला आनंद आहे. त्यांनी स्वताला गुंतवून घेतले आहे आणि फक्त मोबाईल फोनवर टाईमपास करत राहण्याऐवजी, त्यांच्या आवडीनुसार त्या वेळेची योग्य गुंतवणूक करून त्यातून चांगल्या मार्गाने कमाईही करत आहेत, हे चांगले आहे. या वयात, त्या स्वतः कमावलेल्या पैशाचे मूल्य देखील शिकत आहेत.”














