मुंबई – यावर्षी “ऑक्टोबर हीट”च्या October Hit तडाख्यापासून महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचा भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज आहे. नैऋत्य मान्सून परतल्यानंतर सहसा “ऑक्टोबरमध्ये” राज्याला कडक उष्णता सहन करावी लागते. यावर्षी त्या असह्य उकाड्याच्या, घामाघूम अस्वस्थतेतून नागरिकांची सुटका होणार आहे. याशिवाय, ऑक्टोबरमध्ये देशातील अनेक भागात पाऊस सुरूच राहण्याचीही शक्यता आहे.
IMD ने ऑक्टोबर 2025 साठीच्या त्यांच्या ताज्या पर्जन्यमान आणि तापमान अंदाजात म्हटले आहे की, देशातील बहुतेक भागांसह महाराष्ट्र राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल, त्यासोबत कमाल तापमानही सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहील.
देशातील बहुतेक भाग शीत झोनमध्ये
“मल्टी-मॉडेल एन्सेम्बल तंत्राचा वापर करून तयार केलेल्या मान्सूनोत्तर हंगामाच्या – ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर – अंदाजाकडे पाहिल्यास, महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भाग निळ्या किंवा हिरव्या शीत झोनमध्ये असल्याचे दिसून येते. या काळात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता जास्त असल्याचे यावरून दिसून येते,” असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, की “फक्त वायव्य भारतात – राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये – सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता दिसून येते.”
ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या 115% पेक्षा जास्त पाऊस
आयएमडीच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, ऑक्टोबरमध्ये संपूर्ण देशात दीर्घकालीन सरासरीच्या 115% पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. “ऑक्टोबरमध्ये भारतातील बहुतेक भाग सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल. याचा अर्थ असा की, ऑक्टोबरमध्ये देशातील अनेक भागात पाऊस सुरूच राहणार आहे. त्यातून शेती आणि पाण्याच्या उपलब्धतेला आधार मिळणार असला तरी त्यामुळे पूर येण्यासारखे धोके देखील निर्माण होतील,” असे महापात्रा म्हणाले.
दक्षिण अंतर्गत कर्नाटक, आंध्रातही पाऊस
या हंगामात ईशान्य मोसमी पावसाचा मोठा भाग दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पडतो, त्यामुळे संपूर्ण दक्षिण द्वीपकल्पीय भारतातही पाऊस सामान्यपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, तामिळनाडू, पुद्दुचेरी, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक या सर्व ठिकाणी सामान्यपेक्षा 112% पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
सतत पाऊस पडत राहिल्यामुळे तापमान घट
महाराष्ट्रासाठी, जिथे ऑक्टोबरच्या उष्णतेमुळे दिवसाचे तापमान वाढते आणि रात्री उष्णतेची लाट येते, तिथे कमाल तापमानाचा अंदाज दिलासा देणारा आहे. “सतत पाऊस पडत राहिल्यामुळे देशाच्या बहुतेक भागात कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे, जिथे ऑक्टोबरमध्ये मान्सून माघारीनंतर उष्णतेत अस्वस्थ वाढ होते.
पूर्व भारत, सौराष्ट्र-कच्छमध्ये उष्णतेचा दणका
ऑक्टोबरमध्ये फक्त पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्य भारत, लगतच्या पूर्व भारत आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, देशातील बहुतेक भागात, विशेषतः पूर्व, ईशान्य आणि पूर्व-मध्य प्रदेशात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.