पुणे : आजपासून शुक्रवारपर्यंत म्हणजे 2 ते 5 ऑगस्ट असे पुढील 4 दिवस राज्यात पाऊस राहील. पुणे वेधशाळेचा हा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संभाव्य पावसाचा अंदाज सोमवारी सायंकाळी जाहीर केला. त्यात संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. मात्र, पाहिल्या पाच दिवसात राज्यभरात पाऊस आहे. काय आहेत अंदाज ते जाणून घ्या सविस्तर…
ऑगस्ट पूर्ण महिन्यात मात्र पाऊस कमी राहणार
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी सायंकाळी ऑनलाईन पत्रकार परिषदेत मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसाचे भाकीत वर्तविले. त्यानुसार, देशभर दरवर्षीच्या सरासरीच्या साधारण 94 ते 106 टक्के पाऊस पडेल, असा आयएमडीचा अंदाज आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पाऊस कमी राहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. यात ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जरी कमी दिसत असले, तरी ऑगस्ट व सप्टेंबर महीन्यात मिळून राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त दिसत आहे, असे पुणे वेधशाळेचे के.एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे.
पुढचे 4 दिवस महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता
पुढील चार दिवस राज्यात बहुतांश भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघ गर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. महिन्याच्या 4,5 व्या दिवशी कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भात बहुतांश भागात यलो ॲलर्ट जारी
3 आणि 4 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा इशारा दिला गेला आहे. अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यात उद्या जोरदार पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा यलो ॲलर्ट विदर्भातील या भागात जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात 4, 5 ऑगस्ट रोजी पाऊस
4 आणि 5 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदाबाद, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता
कुलाबा वेधशाळेने पुढील 24 तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत 10 वर्षात जुलै महिन्यात चौथ्यावेळेस विक्रमी पाऊस झाला. तर कोकणात सरासरीच्या तुलनेत 56 टक्के पाऊस जुलै महिन्यातच झाला. दक्षिण कोकणाच्या तुलनेत यंदा उत्तर कोकणात सरासरी पावसाचे प्रमाण जास्त आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार
राज्यात पावसाच्या पुनरागमनाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, पुढील चार ते पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. राज्याचा काही भाग सोडला तर बहुतांश भागात पावसाची दडी मारलेलीच राहणार आहे. बहुतांश भागांत ऊन वाढल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे.
65 मिलिमीटर पावसाच्या निकषात सूट देण्याची मागणी
राणा जगजितसिंह यांची पावसाने नुकसानीच्या निकषात सूट देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. पर्जन्य मापकावर जरी 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस दिसत नसला तरी प्रत्यक्षात मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून नुकसानही त्याच प्रमाणात झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता सकारात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. मुसळधार पाऊस पडलेल्या अनेक ठिकाणच्या पर्जन्य मापकामध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पर्जन्याची नोंद झाली नसल्याने केंद्र / राज्य आपत्ती निवारण निकषाप्रमाणे मदत मिळणे शक्य नाही. त्या आधारे नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवण्याची सूचना त्यांनी दिली. सोयाबीन पेरणी झाल्यापासून आजपर्यंत अनियमित व विलंबाने झालेला पाऊस, गोगलगाईंचा प्रादुर्भाव, फेर पेरणी अशा विविध नैसर्गिक संकटांना शेतकरी बांधव सामोरे जात आहेत.
उत्पादनक्षम काळात कीड-बुरशी प्रादुर्भावाचा धोका
ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा बरेच कमी राहील, असा अंदाज आहे. ऑगस्ट-सप्टेंबर मिळून मात्र राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सोयाबीन-कापूस पिकांवर उत्पादनक्षम काळात कीड-बुरशी प्रादुर्भाव वाढू शकतो.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
Dairy Farming – नव्या पिढीला शेतीशी कनेक्ट करणाऱ्या डेअरी सिस्टर्स अर्थात न्यू यॉर्क फार्म गर्ल्स
तरुण उच्चशिक्षित कुटुंब रमलंय आधुनिक शेती… २० लाख नाशिककर निव्वळ उत्पन्न
Comments 4