मुंबई : ओडिशा किनारपट्टी भागातील नव्या हवामान प्रणालीमुळे गुजरात-राजस्थान परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हा पट्टा आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असल्याने आज, बुधवार, 27 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी, गणरायाच्या आगमनाला राज्यात पावसाची जोरदार सलामी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत देशभर सर्वत्र पावसाचे धुमशान सुरू राहण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार
गणेशोत्सवाच्या दिवशी, 27 ऑगस्ट रोजी, पुणे, कोकण किनारपट्टी, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड आणि धर्माबाद परिसरात पाऊस पडेल. 27 आणि 28 ऑगस्ट असे दोनही दिवस मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशामध्ये बुधवारी आणि पुढे आणखी 3-4 दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 ऑगस्ट रोजी मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 4-5 दिवसांत गुजरातसह कोकण आणि गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या किनारी भागासह कर्नाटक, तामिळनाडूतही काही ठिकाणी येत्या 4-5 दिवस मुसळधार पावासाची शक्यता आहे.
बुधवार, 27 ऑगस्ट रोजीचे पूर्वानुमानित अलर्टस्
बुधवार, 27 ऑगस्ट रोजीच्या हवामान, पावसाबाबत भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जाहीर केलेले पूर्वानुमानित अलर्टस् –
ऑरेंज: सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसर
येलो: नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना.
बुलडाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यासाठी कोणताही इशारा नाही. त्याव्यतिरिक्त संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी आहे.
सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यासाठी पावसाचा कोणताही इशारा नाही. त्याव्यतिरिक्त उर्वरित मराठवाड्यात तसेच पुणे, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसरात येलो अलर्ट.
कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता
सध्या मान्सून ट्रफ सक्रिय आहे. ओडिशा-पश्चिम बंगालच्या उपसागराच्या वायव्येस असलेल्या वरच्या हवेच्या चक्राकार अभिसरणाच्या प्रभावाखाली, ओडिशा किनाऱ्यापासून वायव्येस बंगालच्या उपसागरावर मंगळवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. तो त्याच प्रदेशात कायम असून गुरुवारपर्यंत तो पश्चिम-वायव्येस सरकण्याची आणि अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण हरियाणा आणि लगतच्या ईशान्य राजस्थानवर एक वरच्या हवेचे चक्राकार वातावरण आहे.
या प्रणालींच्या प्रभावाखाली, पुढील 4-5 दिवसांत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, पंजाब, उप-हिमालयीन क्षेत्र, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये;काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरपश्चिम भारतातील बहुतेक ठिकाणी हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. लडाख – गिलगिट – बाल्टिस्तान – मुझफ्फराबाद परिसरात गडगडाटी वादळ आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 5-6 दिवस मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्येही जोरदार पावसाचे अनुमान आहे.
