सध्या हवामानाचे वेगळेच चक्र सुरू आहे. संक्रांत उलटूनही थंडी कमी घेण्याचे नाव घेत नाही. सध्या विदर्भात पाऊस असून नव्याने अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. दुसरीकडे, संपूर्ण उत्तर भारत थंडीने गारठला असून येत्या 2-4 दिवसात महाराष्ट्रातही थंडीचा कडाका तीव्रतेने वाढणार आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार तसेच पंजाब व हरियाणासह उत्तर भारतातील 8 राज्यात थंडीच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य प्रदेश व राजस्थानसह महाराष्ट्रातही हाडे गोठविणारी थंडी अनुभवायला मिळत आहे. उत्तरेकडून येणारी थंडी अजून तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविला आहे.
हवामानात अचानक बदल
राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा तडाखा वाढण्यापूर्वीच अचानक हवामानात बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे शनिवारी विदर्भात पाऊस झाला. आता संपूर्ण महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट येण्याची भीती आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी बांधवांचे टेन्शन मात्र वाढले आहे. नागपूरसह लगतच्या भागात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. येत्या काही दिवसात चंद्रपूर, गडचिरोलीसह पूर्व विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक जिल्ह्यात थंडी वाढली आहे. पुणे भागात किमान तापमान २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असल्याने थंडीत वाढ होणार आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने इथेही थंडीचा पार वाढला आहे. राज्यात सर्वाधित कमी किमान तापमानाची नोंद जळगावात ११ अंश सेल्सिअस झाली आहे. तर पुण्यामध्ये १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

ढगाळ वातावरणामुळे गायब असलेली थंडी संक्रांतीपासून जोर धरत आहे. राज्यातील हवामान येत्या 3-4 दिवसात कोरडेच राहण्याची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाडा तसेच कोकणातही तापमानाचा पारा खालावण्याची शक्यता आहे. 2 ते 3 अशांनी तापमान घसरू शकते. गेल्या 24 तासांत राज्यातील सर्वात कमी म्हणजे 11 अंश सेल्सिअस तापमान जळगाव शहरात नोंद झाले. पुण्यातही तापमान 14 अंशांपर्यंत तर मुंबईत 17 अंशांपर्यंत घसरलेले आहे.
सध्याची थंडी नेमकी कशामुळे?
दक्षिण कर्नाटकापासून पूर्व विदर्भापर्यंत असलेली कमी दाबाची रेषा कायम आहे. हवेच्या वरील थरातील चक्रीय स्थिती उत्तर महाराष्ट्रावर कायम आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यातच उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. मध्य प्रदेशातील दतिया येथे 3 डिग्री सेल्सिअस आणि राजस्थानच्या चुरूमध्ये 4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
