जळगाव : अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणारे गिरणा धरण आज 100% भरले असून या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. अतिवृष्टीने खरीप हंगाम यातून गेल्यात जमा असून गिरणेच्या पाण्यामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला मात्र, संपूर्ण जुलै व ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस पडत राहिल्याने पिकांची वाढ खुंटली व मोठ्या प्रमाणात तण वाढले. कापसाचा बेल्ट असलेल्या जळगाव जिल्ह्यात फुल- पात्या लागण्याच्या काळात पाऊस सुरू राहिल्याने फुल- पात्या कमी लागल्याचे दिसून येत आहे. शिवाय मोठ्या क्षेत्रातील कापसाच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणी साचून राहिल्याने पीक नष्ट झाल्याचे आढळून आले आहे. उडीद मुगाच्या शेंगा तर झाडावरच कुजून गेल्या आहेत. एकूण खरिपाची स्थिती फारशी आशादायक नसल्याने आणि सर्वत्र चांगला पाऊस सुरू असल्याने रब्बी हंगामाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
गिरणेतून 3 आवर्तने मिळाल्यास…
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा, धरणगाव, अमळनेर व जळगाव तालुक्यासाठी गिरणा जीवनदायिनी आहे. जळगाव पाचोरा वगळता 6 तालुक्यातील शेती गिरणा धरणातून कालव्यात सुटणाऱ्या आवर्तनावर अवलंबून आहे. गिरणेचे पाणी असले तरच या भागात बागायत शक्य होते. मागील 2023 मध्ये कमी पाऊस झाल्याने गिरणा धरण फक्त 56% भरले. तेवढे पाणी पिण्यासाठी आरक्षित असल्याने सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. त्याचा परिणाम रब्बी हंगाम घेता आला नाही व या हंगामात बागायती कापसाची लागवड पाण्याअभावी घटली. यातून हे सिद्ध झाले आहे की, गिरणा धरण 100% भरणे जळगाव जिल्ह्यासाठी किती फायदेशीर आहे. या धरणातून रब्बीसाठी किमान ३ आवर्तने मिळाल्यास गहू, ज्वारी, मका व हरभरा ही पिके घेता येतील. गिरणा धरणातील उपयुक्त पाणीसाठा 18500 दसलक्ष घनफूट असून मागील वर्षी या काळात धरण फक्त 37 टक्के भरले होते. आज धरण 100% भरले असून नदीपात्रात अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रमुख धरण आता फुल होण्याच्या मार्गावर आहे. एकूण महाराष्ट्र राज्य (सर्व धरण) प्रकल्पात 29 ऑगस्ट अखेर सरासरी 76.60% टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
विभागनिहाय पाणीसाठा खालीलप्रमाणे :
नाशिक विभाग – गिरणा (85.46 %), गंगापूर (92.17 %), वाघूर (83.24 %), तापी हतनूर (32.86 %), चणकापूर (71.16 %)
छ. संभाजीनगर – जायकवाडी (33.66 %),
पुणे – कोयना (98.49 %), खडकवासला (93.31%), पानशेत (98.48%)