जळगाव : रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांमध्ये ज्वारी हे प्रमुख पीक आहे. ज्वारी हे चारावर्गीय पीक असल्याने शेतकर्यांकडून विशेषत: पशुपालक शेतकर्यांकडून त्याला प्राधान्य दिले जाते. मागील काही दिवसात वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे गहू, हरभरा, मका या पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे. ज्वारी या पिकावर देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळल्यास काय काळजी घ्यावी, काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या विषयी आपण जाणून घेवूया.
लष्करी अळीसाठी हवेतील आर्द्रता 75 टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश आणि हिवाळी वातावरण पोषक असते. पोंग्यावर लाकडाच्या भुश्शासारखी अळीची विष्ठा हे प्रादुर्भावाचे लक्षण आहे. पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लहान आकारातील अळी पानांचा हिरवा भाग खरडून खाते. त्यामुळे पानांवर पांढरे पट्टे दिसायला लागतात तर मोठी अळी पोग्यामधील पाने खाते तसेच छिद्र पाडते. पोगा खाल्ल्यामुळे पिकांची वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट होते.
असे करा व्यवस्थापन
ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. या अळीच्या प्रादुर्भावसाठी उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरणी करणे देखील फायदेशीर असते. असे केल्यास किडीच्या जमिनीतील अवस्था वर येऊन सूर्यप्रकाशामुळे त्या मरण पावतात तसेच कीटकभक्षी पक्ष्यांमुळे नष्ट होतात. आंतरपीक पद्धतीचा वापर करावा, यात ज्वारी, मूग आणि उडीद या पिकांची लागवड करावी. सापळा पीक म्हणून ज्वारीच्या बाजूने मका पिकाची लागवड करावी. पीक उगवणीनंतर एकरी 20 कामगंध सापळे लावावेत, शेतातील तण काढून टाकावे, किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच, पोंग्यामध्ये वाळूमिश्रित राख टाकावी, मोठ्या अळ्या वेचून तर अंडीपुज गोळा करून नष्ट करावे, एकरी 1 याप्रमाणे प्रकाश सापळे लावावे.
फवारणी
ज्वारीचे पीक पोंगा अवस्थेत असतांना प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यास अझाडिरेक्टिन (1500 पीपीएम) 5 मि.ली. प्रति लिटर पाणी घेवून फवारणी करावी. जैविक नियंत्रणासाठी नोमुरिया रिलाई किंवा मेटारायझीम निसोप्ली किंवा लेकॅनिलीयम लेकॅनी 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (0.5 टक्का एस.जी.) 4 ग्रॅम किंवा स्पिनोटोरम (11.7 टक्के एस.सी.) 5.12 मिलि किंवा क्लोरन्टानिलीप्रोल (18.5 टक्के एस.सी.) 4.32 मिलि किंवा क्लोरन्ट्रानिलीप्रोल (9.3 टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (4.6 टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) 5.02 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी.