Velanga Home Stay… सर्व काही व्यवस्थित सुरु असतांना एखादी घटना, प्रसंग किंवा जे काही असेल ते… त्याने त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून जाते. अशी अनेक उदाहरणे आपण पाहीली असतील. आंध्रप्रदेशातील चित्तुर येथील कार्तिक रामराज या तरुणाच्या आयुष्यात देखील एक वेळ अशी आली की, त्यांचे आयुष्यच बदलले. त्यांनी चक्क न्युझीलँडमधील नोकरी सोडली आणि गावी परतले. एका पुस्तकाच्या वाचनातून मिळालेल्या प्रेरणेतून कार्तिक यांनी नापीक जागेवर आंब्याची बाग फुलवून दाखविली. निसर्गाच्या या सानिध्याचा नागरिकांनाही आनंद घेता यावा, यासाठी या ठिकाणी वेलंगा होम स्टे देखील उभारला आहे.
बँगलोर येथील रहिवासी असलेला कार्तिक रामराज एका सर्वसामान्य कुटूंबातील असून त्यांनी उच्च शिक्षण घेवून न्युझीलँड येथे मार्केटींग प्रोफेशनल म्हणून नोकरी स्विकारली. सर्व काही व्यवस्थित सुरु असतांना त्यांच्या आयुष्यात एक वळण आले आणि ते विदेशातील नोकरी सोडून आपल्या देशात, आपल्या गावी परतले. या ठिकाणी त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात एक फार्म उभे केले आहे.
पुस्तकाने बदलले आयुष्य
कार्तिक रामराज यांना वाचनाची आवड असल्याने नोकरीतून मिळालेल्या वेळेत पुस्तक वाचन करीत असे. असेच एकदा मासानोबू फुकुओका यांनी लिखान केलेले द वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन (The One Straw Revolution) हे पुस्तक वाचत असतांना या पुस्तकाने कार्तिक यांच्या आयुष्यात एक वेगळेच वळण आणले. त्या पुस्तकातून मिळालेल्या प्रेरणेतून त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि 2009 साली ते आपल्या मायदेशी परतले.
ओसाड जागेबर फुलविली बाग
निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी न्युझीलँड येथील नोकरी सोडून गावी परतल्यानंतर कार्तिक यांनी आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे जमिन विकत घेतली. कार्तिक यांना सफरचंद तसेच बागेतील कामाचा चांगलाच अनुभव असल्याने या ठिकाणी त्यांनी आंबा, नारळ यांसारखी रोपांची लागवड करुन एक सुंदर बाग तयार केली. तसेच एक फार्म स्टे उभारण्याचा निर्णय घेतला.
बागेच्या मधोमध उभारले वेलंगा फार्म
कार्तिक यांनी नापीक आणि ओसाड जमिनीवर त्यांच्या पत्नीच्या मदतीने आंब्याची बाग फुलविली आणि बागेच्या मध्यभागी वेलंगा होम स्टे (Velanga Home Stay) उभारला. कार्तिक आणि त्यांची पत्नी निकिता दावर यांच्या मालकीचे हे वेलंगा होमस्टे वापरलेले रूफ टाइल्स, जुने फर्निचर आणि इतर टिकाऊ वस्तूंनी बनवलेले आहे. या ठिकाणच्या निवासस्थानात आता दरमहा किमान 25 पाहुण्यांचे स्वागत करावे लागते. नैसर्गिक सानिध्य लाभत असल्यामुळे अल्पावधीच वेलंगा होम स्टे प्रसिध्द झाले आहे.
बोटींग, सायकलींगसह बरेच काही
कार्तिक आणि निकीता यांनी वेलंगा होम स्टेमध्ये अनेक नवनविन मनोरंजनात्मक उपक्रम देखील राबवित असतात. या ठिकाणी सुट्टी घालविण्यासाठी येणार्यांना निसर्गाच्या सानिध्याबरोबर जंगलात सायकल चालवणे, पोहणे, बोटींग यासारख्या मनोरंजक कायक्रमांबरोबर मातीपासून वस्तू बनविण्याची कार्यशाळा देखील आयोजित केली जाते. त्यासाठी ग्राहकांना त्या वेगवेगळ्या ऑफरर्स देत असतात. त्यामुळे ग्राहकांचा ओढा वेलंगा फार्मकडे दिवसेंदिवस वाढत आहे.
30 एकर जागेवर लागवड
वेलंगा फार्म हे एकुण 50 एकर जागेवर पसरले आहे. या 50 एकरांपैकी 30 एकर जमीन विविध प्रकारच्या फळांची झाडे आणि भाजीपाला लागवडीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. होम स्टेसाठी लागणारा भाजीपाला, फळे यासारख्या अन्नाची 40 टक्के गरज ही याच 30 एकरात केलेल्या शेतीतूनच भागवली जाते. या ठिकाणी येणार्या नागरिकांना नैसर्गिक आनंदासोबत ताज्या भाजीपाल्यापासून बनविलेले अन्न मिळत असल्याने ग्राहक देखील खुश होत असतात.
कोणतेही निर्बध नाही…
वेलंगा फार्मविषयी बोलतांना निकिता दावर सांगतात की, या ठिकाणी येणार्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. ते या ठिकाणी आल्यानंतर कुठेही मुक्तपणे फिरु शकतात, आराम करू शकतात, कुंभारकामाच्या स्टुडिओमध्ये येऊ शकतात आणि स्वच्छ हवा आणि स्वच्छ आकाशासह निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. जर पाहुणे तहानलेले असतील, तर त्यांना एक ग्लास ताजी ताडी उपलब्ध असल्याचेही त्या सांगतात.
शिकण्याचीही संधी
या ठिकाणी येणार्या पाहुण्यांना काही नवीन शिकता यावे यासाठी निकीता या या ठिकाणी मातीपासून बनवल्या जाणार्या भांड्यांचे प्रशिक्षण वर्ग देखील चालवतात. यामुळे पाहुण्यांना या ठिकाणी राहण्याबरोबर काही तरी शिकण्याची देखील संधी मिळते.
फळांचे जंगल उभारण्याचे नियोजन
कार्तिक आणि निकीता या जोडप्याने या जागेला फळांच्या जंगलात रूपांतरित तसेच 20 पेक्षा जास्त प्रकारची फळझाडे लावण्याचे नियोजन केले आहे. या ठिकाणी येणार्या पाहुण्यांना अधिकाधिक समाधान लाभावे यासाठी भविष्यात आणखी काही बदल करण्याची योजना हे जोडपे आखत आहे.