- रितेश निकम – सागर भुतकर
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा कोंबड्यांवर विपरीत परिणाम होत असतो. अधिक तापमानामुळे कोंबड्यांच्या खाद्य खाण्याच्या व शरीरवाढीचा दर कमी होतो. कोंबड्यांमध्ये अंडी देण्याची क्षमता कमी होते. उन्हाच्या अधिक ताणामुळे कोंबड्यातील मृत्यूदर वाढण्याची शक्यता असते. यामुळे आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
कोबड्यांत उष्णतेची आढणारी लक्षणे
- कोंबड्या शांतपणे उभ्या राहतात व त्यांच्यामध्ये सुस्तपणा येतो.
- कोंबड्या पाणी ज्यास्त पितात व खाद्य कमी प्रमाणात खातात.
- कोंबड्या तोंडाची सतत उघडझाप करून धापा टाकतात.
- कोंबड्यांच्या वजनात अचानकपणे घट होते.
- कोंबड्यांची त्वचा रखरखीत होते व रंगामध्ये फरक दिसून येतो.
सर्वसामान्य उपाययोजना
- कोंबड्याना उष्माघातापासून वाचविण्यासाठी शेडचेे छत आच्छादीत करावे. छताची साफसफाई व डागडुजी करुन त्याला पांढर्या रंगाने रंगवून घ्यावे यामुळे उन्हाची तीव्रता कमी होईल. छतावर वाळलेल्या गवताच्या पेंढया, गव्हाचा किंवा भाताचा कोंडा टाकावा. दिवसातून दोन ते तीन वेळेस छतावर पाण्याची फवारणी करावी.
- शेडच्या एका बाजूला पोत्याचे पडदे लावून त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळेस
पाणी शिंपडल्याने शेडमध्ये थंडावा निर्माण होईल. शेडमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. यासाठी पंख्यांचा वापर करावा त्यामुळे आत असलेली उष्ण हवा बाहेर टाकण्यास मदत होईल. - कोंबड्यांच्या आहारमध्ये अचानक बदल करू नये. पिण्यासाठी स्वछ, थंड आणि मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.
बाष्पीभवन पद्धतीचा वापर
प्रचलित बाष्पीभवन पद्धतीमध्ये हवा व उष्णता यांच्या ऊर्जेचा वापर केला जातो. यामुळे थंड हवेची निर्मिती होते. या तंत्राचा कोंबड्यांच्या शेडमध्ये वापर केल्यास उष्णतेचा तान कमी होण्यास मदत मदत होते. 30 अंश से. पेक्षा ज्यास्त तापमान असणार्या व कोरडी हवा असलेल्या निवारा पद्धतीत या तंत्राचा वापर करता येतो.
पक्ष्यांची संख्या कमी करणे
शेडमध्ये पक्ष्यांची घनता ज्यास्त ठेवल्यास उष्णतेची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि पक्षी एकमेकांची उष्णता ग्राह्य करतात. यासाठी शेडमधील पक्षांची घनता कमी करुन पक्ष्यांतील उष्णतेचा ताण कमी करता येतो.
आहाराचे नियोजन
उष्णतेचा ताण वाढल्याने पक्षी पाणी मोठ्या प्रमाणात पितात. शरीराच्या तापमानपेक्षा थंड पाणी पिल्याने पक्ष्यांना शरीराचे तापमान कमी करण्यास मदत होते. थंड पाण्यात इलेक्ट्रोलाइट मिसळून पक्ष्यांना दिल्यास पक्ष्यांचा रक्ताचा सामु नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. दिवसाऐवजी रात्री खाद्य दिल्यास पक्षी मोठ्या प्रमाणात सेवण करतात. संध्याकाळी सहा ते आठ व पहाटे पाच ते सात या कालावधीत खाद्य देणे अधिक योग्य ठरते.