गांडूळ खत म्हणजे गांडूळांचा वापर करून शेतातील काडी कचरा, पाला- पाचोळा, गोठ्यातील जनावरांचे शेण, खाऊन शिल्लक राहीलेली वैरण इ. पदार्थांचे सेंद्रिय खतामध्ये जलद रुपांतर करण्याची एक नाविन्यपूर्ण पद्धत आहे. गांडूळ खत निर्मिती पद्धत टाकाऊ कचऱ्याचे पोषक तत्वांनी समृद्ध अशा खतात रूपांतर करते. ही प्रक्रिया केवळ कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास मदत करत नाही तर मातीचे आरोग्य देखील सुधारते, ज्यामुळे ती शाश्वत शेतीमध्ये एक आवश्यक पद्धत बनते. शेती हे अनेकांसाठी प्राथमिक उपजीविकेचे साधन आहे, तेथे गांडूळ खत प्रकल्प जमिनीचा ऱ्हास आणि कचरा व्यवस्थापनावर प्रभावी उपाय देते. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील प्रगतशील युवा शेतकरी हरीचंद्र बोरसे यांनी या शाश्वत पद्धतीचा स्वतःच्या कृतीतून उत्तम आदर्श निर्माण केला आहे. ज्यामुळे त्यांना शेतीबरोबर एक शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत गाव पातळीवर तयार झाला आहे.
हरीचंद्र बोरसे (शिक्षण ९ वी पास, वय ४० वर्ष) मुळचे मु.पो. अमळथे ता. शिंदखेडा जि. धुळे येथील रहिवासी असून ते पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. त्यांची गावात १५ एकर वडिलोपार्जित जमीन आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ते कापूस, तूर, ऊस आणि मका अशी पिक घेतात. शेतीतून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. शेती करण्यासाठी घातलेला खर्चही निघत नव्हता. आपल्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी ते धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रात जाऊ लागले. तेथे डॉ. अतिश पाटील यांच्याशी जमिनीचे आरोग्य, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, शेतीयोग्य जमिनीची निवड इ. विषयांवर चर्चा करू लागले.
जमिनीच आरोग्य नीट सांभाळल तरच उत्पादन चांगलं येईल असं त्यांच्या लक्षात आलं. जमिनीला योग्य पोषण देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सुरुवातीला स्वतः एक गांडूळ खत निर्मितीचा बेड खरेदी करून व्यवसायाची सुरुवात केली. त्या गांडूळ खताचा वापर केल्याने त्यांच्या जमिनीची प्रत सुधारत आहे असे लक्षात आले. उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ व्हायला लागली. नंतर त्यांनी व्यवसायिक दृष्टिकोनातून गांडूळ खत निर्मिती करण्याचे ठरवले व पेडकाई माता गांडूळ खत निर्मिती केंद्राची उभारणी केली.

गांडूळांचे जीवन चक्र
गांडूळाच्या अंडी, अपूर्ण व पूर्ण अवस्था अशा तीन प्रमुख अवस्था असतात. गांडुळ कोरड्या मातीत अथवा पाण्यात जगू शकत नाही. गांडूळ खत निर्मितीसाठी इसिनिया फोयटीडा या जातीचा वापर केला जातो. या जातीच्या गांडुळाचे अंडीपुंज मुगाच्या दाण्याच्या आकाराचे असून हिरवट पिवळसर रंगाचे असते. त्यात २ ते ६ अंडी असतात. अंडी १५ ते २० दिवसांत उबवल्यावर त्यातून गांडूळाची पिल्ले बाहेर येतात. फक्त २ ते ३ पिल्लेच पौढावस्थेत पोहचतात. ४० ते ६० दिवसांत पिल्लांची पौढावस्था पूर्ण होते. वयात आलेल्या गांडुळाच्या तोंडापासून २ ते ३ सें. मी. अंतरावर अर्धा से. मी. आकाराचा भाग जाड होतो. या पूर्ण अवस्थेत तो प्रत्येक आठवड्यात एक अंडीपुंज या प्रमाणे अंडी घालतो. या जातीच्या गांडुळाचे आयुष्य २ ते ३ वर्षे असते.
गांडूळ खत निर्मिती तंत्रज्ञान
गांडुळ पैदास करण्यासाठी इसिनिया फोयटीडा या जातीचा वापर करावा. गांडूळ खत निर्मितीसाठी तयार बेड, विटांच्या टाक्या किंवा जमिनीवर उंच गादी वाफे यांचा वापर करता येतो. सावलीसाठी छप्पर, शेडनेट किंवा गोणपाट वापरावे. गांडूळखत मिळविण्यासाठी १ मीटर लांब, ६० सें.मी. रुंद व २० सें.मी. खोलीचा बेड बनवावा. यामध्ये अर्धे कंपोस्ट खत व अर्धे अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पालापाचोळा टाकावा. हे खाद्य अंदाजे २०० कि.ग्रॅ. होते त्यावर २००० गांडुळे सोडावीत. गांडुळे सोडल्यानंतर या गादीवाफ्यावर गोणपाटाचे आच्छादन करून त्यावर दिवसातून २ ते ३ वेळा पाणी शिंपडावे.
अशाप्रकारे ५० ते ६० दिवसात उच्च प्रतीचे गांडुळ खत तयार होते. हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडुळखत बाजूला करावे. शक्यतो खत वेगळे करतांना अवजारांचा (टिकाव, खोरे, खुरपे इ.) वापर करू नये. त्यामुळे गांडुळांना इजा पोहचते. पूर्ण वाढ झालेली गांडुळे पुन्हा गादी वाफ्यात सोडावीत. गांडुळ खतामध्ये गांडुळाची अंडी, त्यांची विष्टा, कुजलेले खत व माती यांचे मिश्रण असते. हे गांडुळ खत शेतामध्ये खत म्हणून वापरता येते. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळांची इतर शेतकऱ्यांना कल्चर म्हणून विक्री करता येते. तसेच बेडच्या तळाला पाईप टाकून व्हर्मिवॉश सुद्धा मिळवता येते.

हरीचंद्र बोरसे यांचा पेडकाई माता गांडूळ खत प्रकल्प
हरीचंद्र बोरसे यांच्या प्रकल्पामध्ये एकूण दोन गांडूळ खत निर्मिती शेड आहेत. सुरवातीला त्यांनी लोखंडी पोल आणि पत्रांचा वापर करून ३६ फूट रुंद आणि ४५ फुट लांबीचे एक पक्के शेड बांधून घेतले. त्यामध्ये २० गांडूळ खत निर्मिती बेड आणि त्यापासून व्हर्मिवॉश काढण्याची सोय केली. तसेच प्रकल्पाच्या विस्तारीत क्षेत्रामध्ये बांबू आणि शेडनेटच्या आधारे ४० फूट रुंद आणि ८० फुट लांबीचे दुसरे शेड बांधले. त्यामध्ये जमिनीवर ४ फूट रुंद, ३० फूट लांब आणि २ फूट उंचीचे बेड तयार करून गांडूळ खत निर्मिती करण्यास सुरवात केली.
प्रकल्प स्थापन करण्यासाठी एकूण २,००,०००/- रुपये इतका स्थिर भांडवल खर्च सुरवातीला त्यांना आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने पक्के शेड, बॅग, ठिबक संच, कुंपण, गांडूळखत चाळणी मशीन इत्यादींचा समावेश होता. प्रत्येक संगोपन बेडची किंमत ३,०००/- रुपये होती आणि मासिक वीज खर्च जवळपास ६००/- रुपये येतो. गांडूळ खत निर्मितीसाठी एक टन क्षमतेच्या १२ फूट लांबी, ४ फूट रुंदी आणि २ फूट उंची असलेल्या प्रत्येक बॅगची किंमत १,५००/- रुपये आहे.
प्रकल्पात तयार होणाऱ्या गांडूळ कल्चर विक्रीतून प्रति किलो ४००/- रुपये आणि घरपोच दिल्यास प्रति किलो ६००/- रुपये अशी कमाई होते. तसेच व्हर्मिवॉश प्रति लिटर ४०/-, गांडूळ खत प्रति किलो १२/- आणि प्रति टन १२,०००/- रुपये इतका नफा होतो. प्रकल्पामध्ये एकूण २० गांडूळ खत निर्मिती बॅग आणि जमिनीवरील लांब बेड आहेत. प्रत्येक बेडमधून ६०-७० दिवसांनी १ टन गांडूळ खत तयार होते. ह्यामध्ये नफाची टक्केवारी लक्षणीय आहे. या प्रकल्पामध्ये दरमहा २० कामगार काम करतात. कच्च्या मालाचे कंपोस्टमध्ये रूपांतर करण्यासाठी सुमारे २.५ महिने लागतात, त्यानंतर शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी गांडूळखत चाळणी मशीनद्वारे त्यावर प्रक्रिया केली जाते.
वापरल्या जाणाऱ्या खतात गायीचे शेण आणि वाळलेल्या पानांचा समावेश असतो, जे सेंद्रिय कचऱ्याचे प्रभावी पुनर्वापर दर्शवते. ह्या प्रकल्पामध्ये इसिनिया फोयटीडा ह्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्याच्या कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या गांडूळ प्रजातींचा वापर केला जातो. जे यशस्वी गांडूळ खत निर्मितीमध्ये व उच्च-गुणवत्तेसाठी महत्वाचे आहे. अशा प्रकारे वर्षाकाठी व्हर्मिवॉश विक्रीतून ५०,०००/-, गांडूळ कल्चर विक्रीतून ४,५०,०००/- आणि गांडूळ खत विक्रीतून ५,००,०००/- असे एकूण १०,००,०००/- रुपये मिळतात. प्रकल्प उभारणीसाठी लागलेला स्थिर भांडवल खर्च आणि वार्षिक अस्थिर भांडवल खर्च असे ३,६०,०००/- वजा करता हरीचंद्र बोरसे यांना निव्वळ ६,४०,०००/- रुपयांचा वार्षिक नफा होत आहे.
विक्री व्यवस्थापनासाठी कृषि विज्ञान केंद्राची मदत मोलाची
कृषी विज्ञान केंद्र, कृषि विभाग, आत्मा, तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून धुळे येथे किंवा जिल्ह्याच्या बाहेर आयोजित कृषी प्रदर्शनांमध्ये हरीचंद्र बोरसे सहभाग नोंदवतात. कृषि प्रदर्शनांमध्ये निशुल्क स्टॉल उभारण्याची परवानगी मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गांडूळ खताची विक्री आणि प्रसार होत आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने विविध कृषि योजना, शेतकरी उत्पादक संस्था, सेंद्रिय शेतकरी, रोपवाटिका, खाजगी संस्था यांना गांडूळ खत आणि व्हर्मिवॉश पुरवठा करण्याची संधी मिळते.
विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन
परिसरातील विविध शाळा – कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्या प्रकल्पाला भेट देऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून अभ्यास करत आहेत. भागातील शेतकरी सुद्धा गांडूळ खत निर्मितीतील बारकावे समजून घेण्यासाठी त्यांचा तसेच प्रकल्पाला भेट देत आहेत. शेतीबरोबर अर्थार्जनासाठी गांडूळ खत हा सुद्धा एक उत्तम पूरक व्यवसाय होऊ शकतो या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून सल्ले घेत आहेत. शेतकरी बांधवांनी फक्त शेतीतील उत्पन्नावर अवलंबून न राहता त्याला पूरक धंद्याची जोड द्यायला पाहिजे. ज्यामुळे गांडूळ खत वापरातून जमीन समृद्ध होईल आणि सोबतच गांडूळ खत विक्रीतून स्वतःही आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल असे हरिचंद्र बोरसे सर्वाना सांगतात.

कृषि तज्ञांचे मत
“गांडूळ खत प्रकल्प म्हणजे कमी जागेत, कमी पाण्यात, कमी भांडवल गुंतवणुकीतून अधिक उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा एक शाश्वत पर्याय आहे. गांडूळ खतामुळे जमिनीचे चांगले पोषण होते, पिकांचे उत्पादन वाढते, सोबतच शेतीला एक चांगला पूरक व्यवसाय मिळतो जो शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक आहे.”
– डॉ. अतिश पाटील, विषय विशेषज्ञ, मृद विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, धुळे
“कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्तर वाढवण्यासाठी शेतीपूरक विविध व्यवसायांबद्दल मार्गदर्शन केले जाते. कौशल्य विकास आधारित व्यवसायिक प्रशिक्षणाचा फायदा युवा शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक प्रगती साधली पाहिजे.”
– डॉ. दिनेश नांद्रे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, धुळे
गांडूळखत प्रकल्प स्थापनेसाठी उपलब्ध योजना आणि मदत
१. महा डीबीटी पोर्टल (कृषी विभाग, महाराष्ट्र शासन)
२. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA)
३. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH)
४. RKVY-RAFTAAR (कृषी आणि संबंधित क्षेत्र पुनरुज्जीवनासाठी फायदेशीर दृष्टिकोन)
५. नाबार्ड (नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट)
६. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (NHM)
संपर्क :
श्री. हरीचंद्र बोरसे,
मु.पो. अमळथे ता. शिंदखेडा जि. धुळे
मो. 8888398650
















