मुंबई : राज्यातील काही भागात पाऊस तर काही भागात उन्हाचे चटके बसत आहेत. दरम्यान, पुढील चार दिवस मुंबई, ठाणेसह कोकणात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. तर काही भागात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून म्हणजेच 29 मेपासून ते 1 जूनपर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात देखील पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या भागात उष्णतेच्या अलर्ट
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या भागात कोरडं वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, आज अकोला जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला असून तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज आहे. चंद्रपूरसह नागपूर, वर्धा जिल्ह्यालाही उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना हवामान विभागाचा सल्ला
उन्हाळी पिकांना, फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळी हलके व वारंवार पाणी द्यावे. पोल्ट्री शेडमध्ये मोकळी हवा राहिल यासाठी उपाययोजना करावी तसेच शेडच्या छतावर गोणी किंवा गवत टाकावे आणि उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यावर पाणी शिंपडावे, असा सल्ला विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हवामान विभागाने दिला आहे.