येत्या काही दिवसात बटाट्याचा भाव देशातील अनेक भागात 50 रुपयांच्या वर पोहोचण्याची शक्यता आहे. देशात बटाट्याचं सर्वाधिक उत्पादन घेण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पश्चिम बंगालमध्ये यंदा उत्पादन घटल्यानं ही स्थिती उद्भवली आहे.
सध्या दक्षिण भारतात बंगालऐवजी उत्तर प्रदेशातून बटाटा जात आहे. बटाटा हे केवळ भारतातच नव्हे तर जगात सर्वाधिक खाल्लं जाणारं पीक आहे. बटाटा उत्पादनात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर देशात सर्वाधिक 29 टक्के उत्पादन उत्तर प्रदेशात होतं. त्याखालोखाल पश्चिम बंगाल सुमारे 23 टक्के, बिहार 17 टक्के, गुजरात 7 टक्के आणि मध्य प्रदेशात 6 टक्के बटाटा उत्पादन होतं.
कर्नाटकातून हसन बटाटे ऑगस्टमध्ये येतील. तोवर बटाट्याचे भाव चढेच राहतील. सध्या उत्तर प्रदेशातील 80 टक्के शीतगृहे बटाट्यानं भरली आहेत.