मुंबई : Mulching Paper Subsidy… राष्ट्रीय फलोउत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान किती मिळेल ?, आवश्यक पात्रता काय ?, आवश्यक कागदपत्रे कोणती ?, अर्ज कुठे करता येईल ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय फलोउत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी ५० टक्के अनुदान दिले जाते.
प्लास्टिक मल्चिंग पेपरमुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते. तसेच पिकामध्ये तणांची वाढही कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्टर रुपये ३२,००० असून या खर्चाच्या ५० टक्के याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान देय आहे. जर डोंगराळ क्षेत्र असेल तर प्रति हेक्टर हे ३६,८०० रुपये मापदंड असणार आहे. या खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच जास्तीत जास्त १८,४०० रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादितसाठी अनुदान देय असणार आहे.
कोण घेऊ शकतो लाभ
राष्ट्रीय फलोउत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेसाठी शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह, सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज
आधार कार्डची छायाप्रत, आधार संलग्न असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, ७/१२ उतारा, ८-अ प्रमाणपत्र ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क करून या योजनेसंदर्भातील अधिक माहिती तुम्ही घेऊ शकतात.
विविध पिकांसाठी वापरण्यात येणारी मल्चिंग फिल्म
५० मायक्रोन जाडीची यु व्ही प्लास्टिक फिल्म – ज्या पिकांना ११-१२ महिने कालावधी लागतो. (पपई)
२५ मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर फिल्म – ३-४ महिन्याच्या कालावधीत येणाऱ्या पिकांसाठी लागतो. (भाजीपाला, स्ट्रॉबेरी)
१०० किंवा २०० मायक्रॉन जाडीची यु व्ही स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म – जास्त कालावधी घेणारी पिके.