मुंबई : एका संकटातून बाहेर पडत नाही तोच आणखी एक संकट शेतकर्यांसमोर उभे टाकले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
मोठ-मोठ्या इमारती, कंपन्या तसेच शहरांची वाढती संख्या, कमी होत चालेली झाडे यांसारख्या कारणांमुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. परिणामी निसर्गचक्रात मोठे बदल होवून उन्हाळ्यातही पाऊस पडणे, पावसाळा असूनही पाऊस गायब होणे, वेळी-अवेळी ढगाळ वातावरण तयार होवून पाऊस पडणे यासारखे प्रकार घडत आहेत. आणि या सर्वांचा परिणाम हा शेती उत्पादनावर होत आहे.
दरम्यान, राज्यातील शेतकर्यांची चिंता वाढविणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच राज्यात पुढील दोन दिवस सौम्य थंडी जाणवण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तविली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे.
हिवाळा असूनही थंडी गायब झाल्याने त्याचा परिणाम रब्बीतील पिंकांवर झाल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाल्यास पिकांना धोका निर्माण होवू शकतो. पाऊस झाल्यास यामुळे गहू, हरभरा, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या उत्पादनात घट होणार आहे.
त्याचबरोबर मुंबईतील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. बदलत्या वातावरणामुळे रब्बीच्या हंगामातील पिकांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.