जळगाव : ‘ज्याच्या शेतात (सेंद्रिय) खत त्याचीच बाजारात पत’ अशी म्हण अस्तित्वात होती. तो काळ सुमारे 50 वर्षांपूर्वीचा. ही म्हण सेंद्रिय खताचे महत्त्व विशद करायला तंतोतंत लागू होते. सेंद्रिय खताची उपयुक्तता, महत्ता पूर्वीच्या काळात फार होती. आज सेंद्रिय खताचे हे महत्त्व विज्ञानाच्या पुस्तकात बंदिस्त आहे असे वाटते, कारण सेंद्रिय खताचे महत्त्व वाढले तरी त्याच्या ज्ञानाचा उपयोग करताना शेतकरी तत्पर दिसत नाही. पूर्वीच्या काळी गोधन भरपूर होते. त्यामुळे सकाळी गावकुसाबाहेर पडणारे गोधन शिवार व्यापून असे. सायंकाळी ते परतत असताना तशीच परिस्थिती असायची. तो काळ असा होता की, गुरेढोरे शेत शिवाराच्या रस्त्याने जाताना जे शेण पाडायचे त्याचे संकलन करून रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी ढीग तयार केले जात असत. असे ढीग नंतर बैलगाडीत भरून शेतात नेल्या जात असत. हे शेणाचे ढीग जाणीवपूर्वक शेतकरी, गुराखी, शेतमजूर जमा करत. त्यातून गुराखी आणि शेतमजूर यांना दोन पैसे मिळत. शेतकर्यास शेतातील मातीची सेवा करता येत असे. ते खत शेतात एकजीव होत असे. काही मोठ्या गावच्या ग्रामपंचायती या खत विक्रीचा वार्षिक लिलाव करत असत. मक्ता घेतलेला मक्तेदार ते मजुरांच्या करवी जमा करून विकत असे आणि सारे मिळून शेतीची समृद्धी आणि सुपीकता टिकवत असत.
गोधनाच्या शेणाच्या गोवर्या (शेनी) बनवायची पद्धत ही जुनीच आहे. या गोवर्या पावसाळ्यात चूल पेटती ठेवण्यासाठी, चुलीत विस्तव निरंतर रहावा यासाठी प्रामुख्याने वापरात असत. गोवरीची राख ही हात धुणे, प्रसंगी मंजन म्हणूनही वापरली जात असे. अति पावसाच्या प्रदेशात पावसाळ्यात गोव-यांचा वापर जास्त होत असे. मात्र मानवी मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी गोवरीचा वापर कधीही केलाजात नव्हता. अंत्यविधीसाठी सरपण वापरल्या जात होते. धार्मिकदृष्ट्या तुळस, चंदनाच्या काडीचा एखादा तुकडा असल्यास वापरला जायचा. विस्तव घरून स्मशानभूमीपर्यंत न्यायसाठी गोवरीचा वापर व्हायचा. भरपूर उपलब्ध असणारे गोधन आणि त्यांचे शेण हा शेतातील खताचा प्रमुख स्रोत होता. आता तितके गोधन नाही आणि अर्थातच तितके शेणखत उपलब्ध नाही. त्यासाठी एकात्मिक शेतीतील जमिनीच्या सकसतेचा हा पाया आता कमकुवत झालेला आहे. तरीही उशीर झालेला नाही. लवकर सक्रिय होऊया आणि शेतीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करूया.
एकात्मिक शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणारी हिरवळीची खते हा एक चांगला आणि स्वस्त पर्याय आहे. तो नैसर्गिक पर्याय आहे. त्यासाठी चवळी, गवार, उडीद, मूग, धैचा या पिकांचा उपयोग होतो. या पिकांची उगवण क्षमता चांगली असते. बियाणे स्वस्त असते. यांची वाढ पटकन होते. फुलावर आल्यास उभ्या पिकाची वखरणी करून पीक जमिनीत गाडले की लवकर खत होते. पिकाचे उत्पन्न घेतल्यास या पिकांचे अवशेष जमिनीतच कुजतील असे पाहावे. याशिवाय शेवरी, ताग, सुबाभूळ, गिरीपुष्प या वनस्पतींचाही चांगला उपयोग करून घेता येतो. शेवरी, सुभाभूळ, गिरीपुष्प यांची पाने मोठ्या प्रमाणावर गळतात. त्याचा उपयोग खत म्हणून होतो. जास्त शेती असणार्या शेतकर्यांनी किमान 20 टक्के जमिनीत सुबाभूळ लागवड केल्यास जमीन सुपीक राहायला मदत होईल. अलीकडील मजुरीचा दर पाहता, मजुराची उणीव पाहता प्रसंगी शेत जमीन दोन-तीन वर्षे पडीत ठेवलेली ही परवडेल असे वाटते. त्यासाठी अधिकच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची गरज आहे.
चांगल्या सुपीक जमिनीत मातीचे प्रमाण सुमारे 45 टक्के हवा आणि पाणी याचे प्रमाण प्रत्येकी 25 टक्के तर सेंद्रिय पाच टक्के प्रमाणात असते. सेंद्रिय योग्य प्रमाणात मातीत उपलब्ध असल्यास आणि पाणी अथवा आर्द्रता चांगली असल्यास जमीन मऊ असते अन्यथा माती टणक भासते. जमिनीत सेंद्रिय वाढावे यासाठी जमिनीत पिकांची फेरपालट करावी. पिकांची फेरपालट करताना त्यात द्विदल धान्य असेल असे पहावे म्हणजे जमिनीत रायझोबियमचे जिवाणू वाढून हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण होते आणि जमीन सुपीक होते. मात्र तरीही खतांची गरज असतेच. खतांसाठी सेंद्रिय खते आणि हिरवळीची खते वापरावी.
सेंद्रिय खतांचा प्रमुख आधार शेणखत आहे. शेणापासूनच कंपोस्ट खत तयार केल्या जाते. शेणखत आणि कंपोस्ट खतात पोषणद्रव्यांचे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत कमी असते. परंतु ते स्वस्त असतात. शेणखत आणि कंपोस्ट खतातील पोषण मूल्यांचे विघटन होऊन पिकांना उपलब्ध होण्याचा कालावधी जास्त लागतो. तरीही जमिनीत हवा खेळती राहावी पाणी धारण क्षमता टिकावी यासाठी सेंद्रिय खते महत्त्वाचे आहेत. जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते असल्यास रासायनिक खतांचा उपयोग प्रभावीपणे होतो. सेंद्रिय खतात अधिकची पोषणमूल्य जास्त प्रमाणात असलेली खते म्हणजे हाडांचा चुरा, मासळीखत, भुईमूगपेंड, सरकी पेंड, लेंडी खत, कोंबडी खत, सोनखत, एरंडाची पेंड, लिंबोळी पेंड, करडई पेंड, इत्यादीहोत. परंतु ही सारी खते महाग पडतात. त्यामुळे आर्थिक मर्यादा सांभाळून गरजेनुसार आणि स्वस्त असेल तेव्हा त्याचा वापर करावा.
नैसर्गिक खतांमध्ये शेणखत हे नत्र, स्फुरद आणि पालाश मोठ्या प्रमाणावर पुरवते. शिवाय लोह, मंगल, तांबे, बोरॉन, जस्त आणि इतर अनेक महत्त्वाची सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवते. हाडांचा चुरा म्हणजे स्फुरद चा मोठा स्रोत आहे. सरकी पेंड मध्येही नत्र, स्फुरद, पालाश मोठ्या प्रमाणावर असते. हिरवळीच्या खतांपासून प्रति हेक्टर सुमारे 90 – 100 किलो पर्यंत नत्र मिळते. या सर्व नैसर्गिक पुरवठ्याची हानी होऊ नये यासाठी शेतात कचरा जाळू नये. कचर्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.
पूर्वीच्या एकात्मिक शेतीत रासायनिक खतांचा वापर नव्हता. आता रासायनिक खतांचा वापर काहीसा अतिरेकी होतो आहे. रासायनिक ते सारे वाईट या अंधश्रद्धेतून रासायनिक खतांनाही अप्रियता आलेली आहे. मात्र आधुनिक शेती रासायनिक खतांसह केल्यास हमखास फायदा होतो. त्याचे अर्थकारण सांभाळले पाहिजे. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य पिकास कमी पडत असल्यास तात्कालीक स्वरूपात रासायनिक खत वापरावे लागते. रासायनिक खतांचा पिकांवर होणारा परिणाम तातडीचा असतो. रासायनिक खतांमधील प्रमाण आपणास निश्चित माहीत असते. जमिनीच्या गरजेनुसार आणि पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर गरजेचा असतो. मात्र माती परीक्षणानुसार, पिकांच्या अपेक्षित उत्पादन सूत्रानुसार आणि वाढीच्या अवस्था नुसार रासायनिक खतांचा संतुलित व योग्य वापर करावा. रासायनिक खते पेरणीच्या वेळी दिल्यास अधिक फायदेशीर ठरतात. नत्रयुक्त खतांची मात्रा एकाच वेळी देऊ नये तर वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी. रासायनिक खतांचा योग्य वापर करायचा तर पाणीपुरवठा नियंत्रित असावा. अलीकडे ठिबक संचातून द्यावयाचे रासायनिक द्रव खते उपलब्ध आहेत. अधिक शास्त्रोक्त वापर करण्यास त्यांचा उपयोग होतो. काही सूक्ष्म अन्नद्रव्ये, रासायनिक खते पिकांवर फवारल्या जातात त्यांचाही वापर करावा.
आजच्या आधुनिक युगात सूक्ष्म जीवाणूंवर खूप संशोधन झालेले आहे. उपयुक्त सूक्ष्म जीवाणू खते म्हणून विकत मिळतात. त्यांचाही वापर केला पाहिजे. ते स्वस्त आणि परिणामकारक असतात. शेतातील उपलब्ध सेंद्रिय कचरा कंपोस्टमध्ये लवकर बदलावा त्यासाठी सूक्ष्म जीवाणूंचा वापर होतो. मात्र सूक्ष्म जीवाणू खते खरेदी करताना त्याविषयी अभ्यास करावा. किंमत योग्य आहे काय, उत्पादक कंपनी विश्वास पात्र आहे काय, उत्पादनाचा दिनांक व वापराच्या शिफारशीचा दिनांक लक्षात घ्यावा. सूक्ष्मजीव नाजूक असतात. त्यामुळे या जिवाणूंचा साठा योग्य तापमानात आहे काय याचाही विचार व्हावा. जिवाणू खते वापरताना इतर विषारी द्रव्ये जिवाणूंना मारक ठरतात. त्यासाठी कीटकनाशके, तणनाशके फवारताना नियोजन करावे. रासायनिक खते आणि जिवाणू खते आता एकात्मिक शेतीचा भाग आहेत. अनादी काळापासून आपल्या अनेक पिढ्यांना पोसणार्या शेतमातीला जतन करावे. पुढे शेती शाश्वत ठेवायची तर शेतात खत टाकायची खातीरदारी करावीच लागेल.
– विक्रम पाटील,
पिंपळगाव (हरे.)