विदर्भातील नागपूरसह इतर शहरे जलमय ,४ मेट्रोचे लोकार्पण पुढे ढकलले.
नागपूर – मुसळधार पाऊस आल्यामुळे नागपूरची शुक्रवारी दाणादाण उडाली. शुक्रवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत विक्रमी ७७.२ मिमी इतका पाऊस झाला. प्रादेशिक हवामान खात्याने उद्या शनिवार ७ व रविवार ८ रोजीही अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द झाल्याचे मेट्रो प्रशासनाने कळवले आहे. या संदर्भात मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. लोकमान्यनगर ते सीताबर्डी या मेट्रो रेल्वेच्या अॅक्वा लाइनला सीएमआरएस (मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त) यांचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे उद्या शनिवार, ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण होणार होते.
हवामान विभागाने शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता त्यानुसार अतिवृष्टी झाली असून विक्रमी ७७.२ मिमी इतका पाऊस झाला. शहरात बहुंताश भागात वस्त्यांमध्ये पाणी घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान विभागाने आज व उद्या रविवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भातील गडचिरोली,चंद्रपूर,भंडारा,ब्रम्हपुरी येथे देखील अतिवृष्टी झाली आहे. ग्रामीण भागात पिके पाण्याखाली असून ही स्थिती रविवार पर्यंत कायम असण्याची शक्यता आहे.
आज दि. ०७/०९/२०१९ रोजी मा.पंतप्रधानांच्या हस्ते होणारे विविध विकासकामांचे उद्घाटन व इतर कार्यक्रम यामुळे रद्द करण्यात आले आहेत. बंगाल व अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्राच्या उर्वरित भागातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.